शरद पवार यांची शहर भेट तर झाली, पुढे काय?

सुमारे सवा वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली. नुसती भेट दिली, एव्हढेच नव्हे, तर दोन दिवस सुमारे बारा तास शहरातील राष्ट्रवादीच्या आजीमाजी पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांना मनसोक्त वेळ देऊन जाहीर मेळावाही झाला. अगदी यांत्रिक हातांनी, म्हणजे क्रेनने काहीशे किलोंचा हारही घालून झाला. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे सरदार, सुभेदार, शिलेदार, दरकदार, भालदार, चोपदार या सर्वांचे शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे, खेड शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर नाचून बागडूनही झाले. आता पुन्हा प्रश्न उभा राहतो तो हा की, पुढे काय? पिंपरी चिंचवड महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांना उपलक्षून असलेले सर्व निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील घेतील, असे स्पष्ट करून शरद पवार यांनी पुन्हा सगळा तामझाम जागेवर नेऊन ठेवला.

अजित पवार, आपले ऐकतील की नाही, याची शंका असलेल्या राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी सरळ शरद पवार यांना साकडे घालून शहरात आणले, त्यांच्या पिंपरी चिंचवड शहर भेटीचा गाजावाजा केला. शरद पवार यांनीही आपल्या दोन दिवसांच्या भेटीत दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकारणावर टीका टिप्पणी केली. केंद्रातील भाजपाई सरकारने, सामन्यांचे जगणे कसे अडचणीत आणले आहे, शेतकरी, कामगार, उद्योजक यांसह देशातील सर्वच समाजघटक या भाजपाईंवर कसे नाराज आहेत, याचा पत्रकार परिषदेतून आणि चर्चा, जाहीर भाषणातून उहापोह शरद पवार यांनी केला. स्थानिक पातळीवर दुकाने नव्हे, तर व्यापारसंकुल, म्हणजेच मॉल उघडून धंदा करणाऱ्या भोसरी आणि चिंचवडच्या भाजपाई आमदारांवर तोंडसुखही शरद पवार यांनी घेतले. मात्र, या भाजपाई आमदारांच्या मॉलचे गाळाधारक आणि लाभार्थी असलेल्यांबाबत शरद पवार यांनी कोणतीही टिप्पणी अगर कान उघडणी केली नाही.

राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसदस्य, पदाधिकारी आणि आपले ऐकले जाईल किंवा कसे, यावर संशय असलेल्या काही मंडळींनी, शरद पवार यांच्या समक्ष, शहरातील सांप्रतच्या पदाधिकारी आणि काही नगरसदस्य यांच्या कार्यपद्धतीवर कोरडे ओढल्याची चर्चा आहे. मात्र, या कोरडे ओढण्याचा कार्यक्रमानंतर शरद पवार यांच्या प्रतिक्रिया बाहेर आल्या नाहीत. जर, या प्रकारावर शरद पवार यांनी काही प्रतिक्रिया दिली नसेल, तर शहर राष्ट्रवादीतील, भाजपाई सत्ताधाऱ्यांच्या लाभार्थींना बळ मिळेल आणि तशा प्रतिक्रिया आल्या असतील, तर पुढे काय हा प्रश्न आहेच.

वेळेत झाल्या तर, येत्या चार महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. या चार महिन्यात राज्यात महाविकास आघाडी करून सत्तेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि सहकारी पक्ष एकत्रित निवडणूक लढतील किंवा कसे, एकत्रित निवडणुका लढायचे झाल्यास जागावाटपाचे सूत्र काय, एकत्रित कार्यक्रम अगर निवडणुकीची रणनीती काय, सत्ताधारी भाजपला धक्का देण्यासाठी कोणते तंत्र अगर मंत्र वापरायचा, यावर खरे म्हणजे शरद पवार यांच्या उपस्थितीत चर्चा आणि मसलत होणे शहरवासीयांना अपेक्षित होते. सत्ताकांक्षी राष्ट्रवादी आणि त्यांच्या बरोबर येऊ पाहणारे लोक, यांबाबत धोरण ठरविणारी शरद पवार यांची ही शहरभेट असावी असा कयास शहरवासीयांनी मांडला होता. मात्र, हा कयास आणि अपेक्षा फोल झाल्या काय, यावर आता पिंपरी चिंचवड शहरवासी चर्चा करताहेत. हे असेच चालणार असेल, तर पुढे काय, हा प्रश्न आता शहरवासीयांच्याही मनात घर करून आहे.

सत्ताधारी भाजपाईंनी पिंपरी चिंचवड शहरात वारेमाप भ्रष्टाचार केला, प्रशासकीय कामकाजात आपमतलबी हस्तक्षेप केला, राजकीय आणि प्रशासकीय अनागोंदी, अनाचार, अराजकता निर्माण केली हे आरोप सध्या बेंबीच्या देठापासून केले जात आहेत. मात्र, या आरोपांचे नक्की पुढे काय करायचे, की नुसतेच आरोप करून सोडून द्यायचे, यावर अजूनही शहर राष्ट्रवादीत कोणतीही चर्चा अगर धोरण ठरल्याचे ऐकिवात नाही. वस्तुतः या आरोपांवर गहजब निर्माण करून शहरवासीयांना, आम्ही आहोत, हे दाखवण्याची कितीतरी मोठी संधी राष्ट्रवादीला आहे. या संधीचे सोने करायचे की माती, त्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा, भाजपाई सत्ताधाऱ्यांना कोणी, किती आणि कसे अंगावर अगर शिंगावर घ्यायचे, यावर खरे म्हणजे आतापर्यंत निश्चितीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, त्या आघाडीवर कोणताही ठोस कार्यक्रम, राष्ट्रवादी आणि संबंधितांकडून आखला गेलेला नाही, हे गंभीर, चमत्कारिक आणि नाकर्तेपणाचे असले तरी, सत्य आहे. यच्चयावत राष्ट्रवादीसाठी श्रध्येय, आदरणीय, प्रेरणादायी, अभिमानास्पद असलेले शरद पवार शहरात येऊन गेले. त्यांच्या येण्याने खरे म्हणजे शहर राष्ट्रवादी धगधगुन उठायला हवी. चार महिन्याचा कालावधी फारसा मोठा नाही, सत्ताधारी भाजपला नामोहरम करून सत्ता खेचण्यासाठी, तर हा कालावधी अगदीच थोडा आहे. थोडक्यात, राष्ट्रवादीला फार मोठी सोंगे उभी करायची आहेत, मात्र त्यासाठी शिल्लक रात्र, थोडीशीच आहे. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते, काय, कशी आणि कधी सोंगे उभी करणार, की नुसतेच शिमग्याच्या सोंगावारी ठरणार, हे आता केवळ कालसापेक्ष आहे.

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×