या शहरात भाजपची सत्ता आहे, पण सत्तेत भाजप नाही!
काही दिवसांपूर्वी एका कट्टर भाजपाईशी संवाद साधण्याचा योग आला. कामाची चर्चा संपल्यावर, शहरातील सत्ताधारी भाजपच्या पुढील धोरणांबाबत माहिती मिळविण्याचा मोह आवरता आला नाही. भाजपच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असलेल्या त्या भाजपाईंनी मात्र, शहरातील सत्ताधारी भाजपबद्दल एकाच वाक्य उच्चारले, ते म्हणजे, “पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे, मात्र, या सत्तेत भाजप कणभरही नाही!” या वाक्यावर नंतर बराच काळ मंथन केल्यावर आणि पिंपरी चिंचवड शहरातील काही महत्त्वाच्या भाजपाईंशी चर्चा केल्यावर या विधानाचा उलगडा झाला. शहरात नक्की सत्ता कोणाची, भाजपची, की दादा, भाऊंची? यावर उत्तर मिळते ते असे की, या शहराच्या सत्तेत भाजपचा तिळमात्रही संबंध नाही. सत्त्याहत्तर भाजपाई नगरसदस्यांमध्ये, मूळ भाजपाई मोजताना दोन हातांची बोटेही पुरून उरतात, अशी अवस्था आहे. मग, बाकीचे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले लोक कोण आहेत? तर, ते सत्तेचे लाभार्थी आहेत आणि त्यांचा भाजपशी कवडीचाही संबंध नाही. ही बाकीची मंडळी दादा, भाऊ पक्षाची आहेत, भाजपची नाहीत.
अस्मादिक, या शब्दाचे आकलन बऱ्याच मंडळींना होत नाही, असा आक्षेप आहे. अस्म म्हणजे आम्ही स्वतः आणि आदी म्हणजे आमची यंत्रणा, क हा त्यासाठीचा प्रत्यय आणि सर्व मिळून “अस्मादिक” हा शब्द. तर, अस्मादिक या निष्कर्षापर्यंत पोहोचले त्याला अनेक व्यक्तींच्या करतुती आणि त्यांनी वेळोवेळी केलेली विधाने कारणीभूत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील गेल्या छपन्न महिन्यांच्या भाजपाई सत्ताकाळात महत्त्वाचे पद उपभोगलेले एक महाभाग अगदी उघडपणे, “आमचा काय संबंध भाजपशी? आमचा पक्ष म्हणजे, दादा! उद्या दादा, वंचित मध्ये गेले, तर आम्हीही वंचितचे!” असे विधान करून आपली दादा भक्ती उजागर करतात. हाच प्रकार भाऊंकडेही आहे. किंबहुना, भाऊंचा प्रकार त्याही पुढचा आहे, असे म्हणावे लागेल. कारण भाऊंची मंडळी, भाऊंना विचारल्याशिवाय शी सू लाही जात नाहीत. थोडक्यात, पिंपरी चिंचवड शहरातील भाजप आणि भाजपची सत्ता पूर्णतः दादा, भाऊंच्या दावणीला आहेत.
अजितदादा पवारांचा ढोल दोहो कारांनी बडवून झाल्यावर, या दादा, भाऊंनी आक्खी भाजप आपल्या नादाला लावली. राज्य पातळीवरील भाजपाईंनी, अजितदादा पवारांना शह देण्याच्या नादात, या दादा, भाऊंना शहरातील सर्व निर्णयांची खुली छूट बहाल केली. ही छूट मिळाल्यावर बेछूट झालेल्या दादा, भाऊंनी मग, शहरातील भाजपाईंचे यथास्थित श्राद्ध करून टाकले. जे काही मूळ भाजपाई शहरात तग धरून आहेत, ते दादा, भाऊंचे लाभार्थी आणि अथवा आश्रित आहेत. लाभार्थी आणि आश्रितांना स्वाभिमान, स्वत्व, स्वमत, स्वाधिकार, अस्मिता, गर्व पाळता येत नाही, या न्यायाने, हे बचेखूचे मूळ भाजपाई शहरात तग धरून आहेत. शहरातील ज्या भाजपाईंना आश्रित असणे आणि म्हणूनच लाभार्थी असणे जमत नाही, असे मूळ भाजपाई मग खड्यांसारखे बाजूला फेकले गेले आहेत.
दादा, भाऊ हे दोघेही तसे मूळचे अजितदादा पवार यांच्या राजकारणाचे उत्पादन. शह काटशह देण्याच्या राजकारणातील हमखास वापराची शस्त्रे. पण शस्त्रे स्वतः चालत नसतात, त्यांना त्यामागील मुठीमागच्या मनगटाच्या इशाऱ्यावर वार करावे अगर झेलावे लागतात. मग, मुठीचे आणि मनगटाचे हित साधण्यापेक्षा या शस्त्रांनी स्वतःच लढाया मारण्याचे ठरवून अजितदादा पवार यांच्या मुठ आणि मनगटाला अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. अर्थात या दादा, भाऊंनी मग स्वतःची शस्त्रे तयार केली, किंबहुना काही मंडळी स्वतःहून शस्त्रे बनण्यासाठी त्यांच्या मुठीत आली. मात्र, भाजपच्या खेळीयांनी या दादा, भाऊ शस्त्रांचा वापर करून अजितदादा पवारांवर चाल केली. या दादा, भाऊ शस्त्रांना खुली छूट देऊन त्यांनी पिंपरी चिंचवड शहराची सत्ता आपल्या झेंड्याखाली आणली. दांडा यांचा वापरून आपला झेंडा फडकावण्यात भाजपाई पुरती यशस्वी झाली असली तरी, दांडेच झेंडे म्हणून वावरू लागले.
मात्र, यात भाजपच्या मूळ धेय्यधोरणांचा आणि पक्ष प्रेरणांचा कोठेही संबंध नव्हता. पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता या दादा, भाऊंनी काबीज केली खरी, मात्र, ही भाजपच्या झेंड्याआड यांच्याच अखत्यारीत राहिली. २०१४ च्या आमदारकीच्या निवडणुकीनंतर या दादा, भाऊंनी भाजपच्या नावाखाली आपली स्वतःची पिलावळ तयार केली. या पिलावळीच्या आणि बगलबच्च्यांच्या हातात भाजपचा झेंडा देऊन, दादा, भाऊंनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहराची पूर्ण सत्ता काबीज केली. त्यामुळे भाजपची सत्ता शहरात स्थापन झाली खरी, पण, त्या सत्तेत भाजप कोठेही आणि कधीही, नव्हता आणि नाही.
आता, या दादा, भाऊंचे मूठ आणि मनगट नाकारणारे लोक शहरात तयार झाले आहेत. रवि लांडगे, संजय नेवाळे, नवनाथ जगताप आणि आता तुषार कामठे, ही आणि अशी उदाहरणे सांप्रतला तयार झाली आहेत. दादा, भाऊंच्या हातीचे शस्त्र होण्यास नकार देणारी ही मंडळी म्हणजे, आता दादा, भाऊंना, आपण केले, तेच आपल्या नशिबी आले, असे म्हणण्याची पाळी आणणारे आहे. कारण या दादा, भाऊंनी पिलावळ, भुतावळ जमा केली, यात निष्ठा, नीती आणि नियमांचा मागमूसही नाही. या पिलावळ आणि भूतावळीला भाजपशी काहीही देणे, घेणे नाही. म्हणूनच या शहरात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी, सत्तेत भाजप कोठेही नाही, हे निखालस, निर्विवाद सत्य आहे!
——————————————————