स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यापुढे खुले आव्हान!
सुमारे सात तास चाललेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बुधवार दि.२०ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी प्रकल्पाचे वाभाडे निघाले. या संपूर्ण प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याची सर्वपक्षीय ओरड झाली. महापलिकेतील सत्ताधारी भाजपची ही मोठी दुकानदारी असल्याची चर्चा सर्वसाधारण सभेत झाली, मात्र, चर्चेनंतर पुढे काय, यावर सत्ताधारी भाजप अगर महापालिका प्रशासनाने कोणताही खुलासा केला नाही. वस्तुतः केंद्र शासनाच्या या प्रकल्पाचे वहन राज्य शासन आणि महापालिकेच्या खास उद्देश वहन कंपनीद्वारे केले जात आहे. या खास उद्देश वहन पद्धतीत स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय मंडळींचे संचालक आणि कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुखांचा समावेश असलेल्या या खास उद्देश वहन म्हणजेच स्पेशल परपज व्हेईकल कंपनीच्या कारभाराची चौकशी करण्याचे खुले आव्हान आता राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकार आणि महापालिकेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेनेच्या समोर आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणि त्याच बरोबरीने स्थायी समितीसह इतर समितींच्या कामकाजात विरोधी पक्षांचा आवाज सत्ताधारी भाजपाई दाबून टाकतात, अशी ओरड होत होती. नक्की काय होते आहे, हे पाहण्यासाठी शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार, डॉ. अमोल कोल्हे, दस्तुरखुद्द महापालिका सभेला उपस्थित राहिले. अत्यंत चिकाटीने त्यांनी सुमारे सात तास चाललेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अवलोकन केले. खासदार डॉ. कोल्हेंच्या उपस्थितीत आपली कामगिरी दिसावी म्हणून, गेले छपन्न महिने आपले मुस्कट बंद ठेवणाऱ्या, राष्ट्रवादी, शिवसेनेसह काही भाजपाईंनी देखील या सर्वसाधारण सभेत आपले वाक्चातुर्य दाखविण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटी प्रकल्पात घोटाळा झाला, सत्ताधारी भाजपाई आणि त्यांचे बगलबच्चे, यांनी महापालिकेची तिजोरी आणि केंद्र व राज्य शासनाच्या निधीवर खुला डल्ला मारला, असे सर्वपक्षीय उघड आरोप करण्यात आले. आता प्रश्न निर्माण होतो, तो हा की, राज्यातील आघाडी सरकार, या संपूर्ण सभेतील चर्चेला किती गांभिर्यपूर्वक घेते. अर्थातच ही जबाबदारी पार पाडण्यासाठी, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी, शिवसेनेचे स्थानिक नेते, किती नेटाने यावर काम करतात, तेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
स्पेशल परपज व्हेईकल, एक भ्रष्टाचारी लफडं!
स्मार्ट सिटी प्रकल्पात महापालिकेच्या नियमित कार्यपध्दतीला तिलांजली दिली गेली, असाही आरोप सर्वसाधारण सभेत झाला. सुमारे सवाहजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प, अनेक प्रचलित मान्यता टाळून करण्यात येतो आहे, असा हा आरोप. मात्र, याचे मूळ शोधण्यापेक्षा भुई धोपटण्यातच सर्वपक्षीय नागरसदस्यांनी धन्यता मानली. वस्तुतः स्मार्ट सिटी प्रकल्पाचे पूर्ण कामकाज खास उद्देश वहन अर्थात स्पेशल परपज व्हेईकल कंपनी द्वारे चालते. कंपनी कायद्याने अस्तित्वात आलेले हे खास उद्देश वहन, हेच यातील भ्रष्टाचाराचे मूळ लफडे आहे. कंपनी कायद्यात कार्यकारी मंडळ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह बॉडी जे विषय मांडतात, त्यावर संचालक मंडळाची मंजुरी घेतली जाते. यात महापालिका अधिनियमांचा कोठेही संबंध येत नाही, महापालिकेची प्रशासकीय प्रणाली केवळ खर्च किती करायचा, यावर निर्णय घेऊ शकते, तो कसा आणि कुठे करायचा, यावर फक्त आणि फक्त, कार्यकारी मंडळ आणि संचालक मंडळ यांची मक्तेदारी असते. महापालिकेच्या तांत्रिक मंजुऱ्या, विषय समित्यांच्या मंजुऱ्या अशा नियमित कार्यपद्धतीचा या खास उद्देश वहन प्रकारात कोणताही संबंध येत नाही. ही कार्यप्रणालीच स्मार्ट सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे.
हे खास उद्देश वहन पद्धतीचे लफडे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारात आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण, महापालिकेने नव्याने हातात घेतलेले नदी सुधार, परिवहन आखणी म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट हे प्रकल्पदेखील खास उद्देश वहन म्हणजेच स्पेशल परपज व्हेईकल प्रणालीनुसार करण्याची मान्यता देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी प्रमाणे हे देखील सवते सुभे आता पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरू झाले आहेत. हे सवते सुभे, निश्चितपणे पुढच्या काळात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ उठण्यास कारणीभूत होणारे आहेत. मग, हे खास उद्देश वहन, खास पद्धतीने काही मंडळींच्या मर्जीनुसार चालणारे होण्यापूर्वीच नाकारण्याचे धारिष्ट्य पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन, राज्यातील आघाडी सरकार दाखविणार आहे काय, हा खरा प्रश्न आहे. अर्थात सुमारे सात तासांचा आपला बहुमूल्य वेळ घालवून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी, शिवसेनेचे स्थानिक नेते, यावर नक्की काय करणार आहेत, हेही पाहणे, तितकेच महत्त्वाचे आणि कालसापेक्ष ठरणार आहे.
(हेही अवश्य वाचा,
स्मार्ट सिटीत दोनशे कोटींचा घोटाळा, समन्वयक पोबारा करण्याच्या तयारीत? https://navnayak.com/?p=3387)
——————————————————–