राजकारणातील स्मशान आणि उद्यानातील राजकारण!
“जावे मरणादारी अगर जावे तोरणादारी!” ही एक गावरान म्हण आहे. कोणतेही हेवेदावे सोडून, अगदी टोकाचे वादविवाद बाजूला सारून, झालेगेले विसरून एखाद्याच्या मृत्योपरांत प्रवासाला स्मशानापर्यंत साथ देण्याची मानवी पद्धत आहे. स्मशानात सगळे वादविवाद, हेवेदावे, कज्जेखटले, अगदी टोकाची दुष्मनी जाळून अगर गाडून टाकली जाते. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या या शेवटच्या प्रवासाला सगळे विसरून साथ द्यायची पद्धत आहे. पण मग हे स्मशानच वादविवाद, राजकारण आणि भेदाभेदाचे कारण ठरत असेल तर? प्रश्न तसा गंभीर आहे आणि हा प्रश्न सध्या पिंपरीगावातील स्मशानाबाबत निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. गावकिभावकीच्या वादात सापडलेले हे पिंपरीगावतील पारंपरिक स्मशान, त्यामुळे विकासापासून वंचित राहिले आहे.
एकापेक्षा जास्त आणि तेही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नगरसेवक एकाच प्रभागाचा कारभार पाहात असतील, तर जे वाद होतात, त्या वादात सध्या पिंपरीगावातील स्मशान सापडले आहे. दोन हजार चौरस मिटर क्षेत्रफळाचे हे स्मशान आणि त्याच्या दोनहि बाजूला सहा हजार आठशे चौरस मिटर क्षेत्रफळाचे उद्यान असल्याचे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरक्षण क्रमांक १६६ मध्ये नमूद आहे. सांप्रतला हे स्मशान दुरावस्थेचे झाले असून, गेली सुमारे तीस वर्षे किरकोळ डागडुज्जी करून वापरले जात आहे. पिंपरीगावातील चार नगरसदस्यांपैकी एकाने या स्मशानाच्या पुनर्निर्माणाचा प्रस्ताव महापालिकेत दाखल केला. स्मशानाच्या दोन्ही बाजूला महापालिकेचेच उद्यानाचे आरक्षण असल्याने, एका बाजूला नव्याने स्मशानाची उभारणी करून सलग उद्यान करण्याचा हा प्रस्ताव आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पारित केलेल्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या कलम ३.१.३ नुसार निळ्या व लाल पुररेषेत स्मशान आणि उद्यान उभारणे अनुज्ञेय असल्याने, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी उद्यान आणि स्मशानभूमीचा हा प्रस्ताव मान्य केला. त्याचबरोबर महापलिकेच्या शहर विकास आराखड्यात किरकोळ दुरुस्ती करण्याच्या आणि कोणतेही आरक्षण दोनशे मिटरपर्यंत हलवण्याचा आपल्या याच नियमावलीत तरतूद २.३.(vii) मधील अधिकाराचा वापर करून महापालिका आयुक्तांनी सदरच्या आरक्षणात दुरुस्ती केली आहे. आता डाव्या बाजूला दोन हजार चौरस मिटरची स्मशानभूमी आणि उजव्या बाजूला सलग सहा हजार आठशे चौरस मिटर उद्यान तयार करणे शक्य झाले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या परवानगीने एक बाजूला नव्याने स्मशानभूमी तयार करण्याची एक कोटी एकुणपन्नास लाख रुपयांची निविदा स्थापत्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. येत्या २९नोव्हेंबर पर्यंत निविदा भरण्याची मुदत असून १डिसेंबर दरम्यान निविदा उघडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर ठेकेदार कायम होऊन नव्या स्मशानभूमीचे काम सुरू होईल.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थापन होऊन एकुणचाळीस वर्षे आणि पहिली लोकनियुक्त सदस्यांची निवडणूक होऊन छत्तीस वर्षे होत आली. या मोठ्या कालावधीत पिंपरीगावाचा म्हणावा तसा विकास झाल्याचे दिसून आले नाही. मूळ गावठाणातील गर्दी आणि पिंपरी कॅम्प मधील एकही इंच जागा वाया जाऊ न देण्याची व्यापारी प्रवृत्ती यामुळे या परिसराचा विकास खुंटला अशी चर्चा आहे. मात्र, निमित्त काही असले तरी पिंपरीगाव एकंदरच विकासापासून वंचित राहिले हे निश्चित. काही शाळा इमारती, रस्त्यांची डागडुज्जी याव्यतिरिक्त कोणताही मोठा प्रकल्प गावात झाला नाही. याचे मूळ कारण म्हणजे गावातील गावकीभावकीचे राजकारण. एकाने विकासाची भाषा करायची आणि दुसऱ्याने त्यात खोडा घालायचा, ही खेकडा प्रवृत्ती या पिंपरीगावातही आहे.
पिंपरीगावात वाघेरे, नाणेकर, शिंदे, कापसे, गव्हाणे, कुदळे, कांबळे ही मूळ सर्वजातीय आडनावे. यात पाव्हनेरावळे आणि पिंपरी कॅम्प मधील सिंधी समाज यांची भर पडून आणि यांच्या भोवतीच या गावचे राजकारण सातत्याने फिरत राहिले आहे. वस्तुतः १९७० साली पिंपरी चिंचवड नवनगरपालिका स्थापन झाल्यावर शहरात रूपांतरित होऊनही या गावाचा विकास का झाला नाही याचे आत्मपरीक्षण या गावातील यच्चयावत राजकारण्यांनी करणे गरजेचे आहे. गेल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या शहरीकरणात आपण आपला विकास साधू शकलो नाही याची सलज्ज उपरती व्हावी की, आपण आपली गावकीचा सांभाळली, याचा मिथ्याभिमान बाळगावा, हे खरे म्हणजे पिंपरीगावातील राजकारण्यांनी आता ठरविले पाहिजे. ज्यांना काही करायचे नाही, त्यांनी गपगुमान बसावे आणि जे कोण काही करताहेत, ते पाहावे, एव्हढे झाले तरी गावचा विकास होऊ शकेल.
आता सांप्रतला सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या कामाबद्दलच सांगायचे झाल्यास, गावकीचा खेकडा प्रवृत्तीचे दर्शन होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी या स्मशानाची जागा सरकावून सलग उद्यान तयार करण्याची योजना महापालिकेकडे सादर करण्यात आली होती. नियमात बसवून हे काम तेव्हांच सुरू झाले असते, तर आज पूर्णही झाले असते. थोडक्यात काय तर या मंडळींच्या डोक्याने राजकारणातील स्मशान अवस्था निर्माण झाली आहे, तर उद्यानाचे राजकारण करण्यात आले आहे. गावात काहीतरी चांगले होत आहे म्हणून, सर्वच गाववाल्यांनी एकत्रित विचार केला असता, तर हे सहज शक्य होते. पण तो करतोय, त्याला श्रेय मिळेल, त्याचे नाव होईल, म्हणून विरोध करण्यातच आपली शक्ती ही मंडळी वाया घालवीत आहेत. त्याचबरोबर “मीच” केले म्हणून डांगोरा पिटण्याची प्रवृत्तीही विकासाच्या आड येते, हेही तितकेच खरे. गेल्या पाचएक वर्षात गावात काही वेगळे होते आहे, हा बदल सकारात्मक असा आहे. या सकारात्मक बदलाला सामोरे जाऊन तो स्वीकारणे महत्त्वाचे आहे. मात्र “तुला न मला, घाल कुत्र्याला” या कुपमंडुक वृत्तीमुळे ठिकठिकाणी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला खोड बसला आहे. शहर म्हणून विचार करण्याची पद्धत या शहरात गेल्या पन्नास वर्षातही निर्माण होऊ शकली नाही, हे खरे या शहराचे आणि शहरवासीयांचे दुर्दैव!
———————————————————