शहर राष्ट्रवादीत खांदेपालट नक्की, उशिरा सुचलेले शहाणपण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संरचनेत अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे निश्चित केले आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर आणि युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर या तिघांनीही आपापले राजीनामे प्रांताध्यक्षांकडे द्यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अवघे तीन महिने अगोदर हे राजिनामे देण्याचा निरोप आल्यामुळे शहर राष्ट्रवादीत मोठीच खळबळ उडाली आहे. शहराच्या राजकारणाचा आता नवा अध्याय सुरु होण्याची ही चिन्हे असली तरी, हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण तर ठरणार नाही ना, अशी चर्चा राजकीय तज्ज्ञ करीत आहेत. अर्थात उशिरा का होईना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हा बदल करण्याचे शहाणपण सुचले, याबाबत शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.

महापालिका निवडणूक तोंडावर असतानाही शहरवासीयांनी राष्ट्रवादीला मतदान का करावे, याचे कारण निर्माण करण्यात शहर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अपयशी आणि अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक संरचनेत बदल करण्याचे मंतव्य, राज्य पातळीवरून स्पष्ट करण्यात आले आहे. मार्च २०१७च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची मेहनत धुळीस मिळवून भाजपने अक्षरशः सत्ता हिसकावली. आतापर्यंतच्या छपन्न महिने आणि वर काही दिवसांच्या सत्ताकाळात भाजपाईंनी शहरात आणि महापालिकेत शब्दशः धुडगूस घातला. भ्रष्टाचाराची आणि अनागोंदी कारभाराची अनेक प्रकरणे समोर येऊनसुद्धा याचा फायदा उठविण्यात शहर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अपयशी ठरले. नाही म्हणायला दत्ताकाका साने यांचा विरोधी पक्षनेते म्हणूनचा कालावधी, तेव्हढाच काय तो अपवाद.

न घडलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती घोटाळ्याचा बाऊ करून भाजपाईंनी राष्ट्रवादीचे पानिपत घडवले. मात्र, भाजपाई सत्ताकाळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येऊनही राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, हा भ्रष्टाचार आम मतदारांपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरले आहेत. आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी पूर्वीच्या शेवटच्या टप्प्यात तरी काही काम होईल, या आशेने मुख्य, युवक आणि महिला शहराध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, नवे गडी कोण आणि त्यांचा खेळ कसा असेल, हे अजूनही गुलदस्तात असल्याने, बदल कितपत यशस्वी होईल, यावर भाष्य करणे अवघड ठरले आहे. तशातच आता रात्र थोडी आणि सोंगे फार अशी अवस्था नव्याने डाव मांडणाऱ्या गड्यांची होणार आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत सत्ता हातातून गेल्यावर नामदार अजितदादा पवार यांनी शहराच्या राजकारणाकडे ठरवून दुर्लक्ष केले. शहर राष्ट्रवादीचे काही बोटावर मोजण्याएव्हढे स्थानिक नेते आणि पदाधिकारी सोडले, तर प्रत्येकाला चघळायला एक तुकडा टाकून सत्ताधारी भाजपाईंनी राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष म्हणून असलेला दमखम मोडून काढला. अनेक संधी मिळूनही, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड महापालिकेत आपला प्रभाव राखू शकली नाही. तशातच काय करायचे, कसे करायचे आणि कधी करायचे हे ठरविण्यातच वेळ घालविणारी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची कार्यपद्धती, अगदी केलेले कामही नीटसे मांडू न शकलेल्या महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांची पडखाऊ भूमिका यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरते खुळखुळे झाले. युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी काही प्रभावी कार्यक्रम हाती घेतले, मात्र नात्यागोत्यात अडकल्यामुळे शहराध्यक्षांच्या पुढे जाऊन काम करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे पक्षीय संघटन आणि पक्षासाठी कार्यक्रम यामध्येही राष्ट्रवादीचे स्थानिक नेते फारसे प्रभावी ठरले नाहीत. अगदी राष्ट्रवादीचे अध्वर्यू शरद पवार यांची शहरभेटही या मंडळींनी निष्फळ ठरविली, मोठ्या पवारांना सभास्थान भरेपर्यंत वाट पाहात थांबण्याची नामुष्की या स्थानिक नेत्यांनी आणली.

अगदी ऐनवेळी हा बदल करण्याचे ठरवून राष्ट्रवादीच्या पक्षाश्रेष्ठींनी काही प्रमाणात का होईना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करू इच्छिणाऱ्या मतदारांना दिलासा दिला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता येणारी नवी माणसे नक्की कोण आहेत आणि ते काय करू शकतील, यावर अलाहिदा चर्चा करावी लागेल. या नवीन लोकांपुढे आव्हाने मात्र, मोठी असणार आहेत. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आन8 अनेक प्रश्नांवर या मंडळींना काम करावे लागेल. सर्वप्रथम पक्ष संघटन करून, आहेत त्या लोकांमध्ये हिम्मत आणि धाडस निर्माण करून आपण भाजपाईंना हरवू शकतो याची खात्री पटवून द्यावी लागेल. त्यानंतर पक्षात येऊ इच्छिणाऱ्या मंडळींना, त्यांचा योग्य सन्मान होईल आणि त्यांच्या गरजा पूर्ण होतील असा दिलासा द्यावा लागेल. त्याचबरोबर नव्याने राष्ट्रवादीत येऊ इच्छिणाऱ्या मंडळींमध्ये तंबूत शिरणारे उंट तर नाहीत ना, हेही तपासून घ्यावे लागेल. थोडक्यात सर्वसमावेशक, तरीही चिकित्सक राजकारण करणारी मंडळी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींना शोधावे लागतील. आता असे लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सापडोत आणि त्यांनी, पिंपरी चिंचवड शहरवासीयांनी राष्ट्रवादीला मतदान का करावे, याचे कारण निर्माण करणारे ठरोत, याच साध्यासुध्या अपेक्षा!

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×