विजयस्तंभाला शासकीय मानवंदना, ब्राह्मणी भाजपाई राजकारणाला चपराक!
भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी मानवंदना दिली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आदी शासकीय अधिकारीही उपस्थित होते. राज्य शासनाच्या वतीने समस्त मागासवर्गीयांच्या सन्मान आणि अस्मितेच्या विजयाचा प्रतिक असलेल्या विजयस्तंभास दिली गेलेली ही मानवंदना फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराला दिली गेली, अशी भावना समस्त पुरोगामी महाराष्ट्राने व्यक्त केली आहे. दुस्वास आणि भेदभावाच्या ब्राह्मणी, किंबहुना भाजपाई राजकारणाला महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारने लागवलेली ही चपराक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
भीमा कोरेगावचा हा ऐतिहासिक विजयस्तंभ तमाम बहुजनांनी ब्राह्मणी वर्चस्व असलेल्या समाजरचनेला दिलेल्या धक्क्याचा प्रतीक आहे.इंग्रज सरकारच्या पाचशे महार सैनिकांसह घोडदळ, तोफकरी मिळून आठशे सैनिकांनी पेशव्यांच्या सुमारे सत्तावीस हजार घोडदळ, पायदळाला पराभूत केले. या पराभवामुळे बहुजनांसाठी अन्यायकारक असलेली पेशवाई संपुष्टात आली, असे मानले जाते. काही खरोखरच लढवय्ये आणि सामाजिक अभिसरणाची सत्ता राबविणारे पेशवे सोडले तर, पेशव्यांचा अगदी राजर्षी शाहू यांच्यापर्यंतचा इतिहास पाहता, बहुजनांना अहितकारकच ठरला आहे. ब्राह्मणी पगडा असलेली समाजरचना आणि त्यातून निर्माण झालेला ब्राह्मणी वर्चस्ववाद आजही बहुजन समाजाच्या मानगुटीवर घट्टपणे बसला आहे. १जानेवारी, १८१८ ची ही लढाई पेशवे म्हणजेच ब्राह्मणी वर्चस्ववाद विरुद्ध महार आणि बहुजन सैनिक अशाच दृष्टिकोनातून पहिली जाते. लौकिकार्थाने भीमा कोरेगावची ही लढाई ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीला विजय मिळवून देणारी आणि भारताची सार्वभौम सत्ता ब्रिटिशांना देणारी असली तरी, समस्त बहुजनांना ब्राह्मणी जुलुमातून मुक्ती देणारी आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीत अनेकवेळा या विजयस्तंभाला मानवंदना दिली आहे.
यापूर्वी अनेक मंत्री, आमदार, खासदारांनी वैयक्तिक पातळीवर या विजयस्तंभास भेटी दिल्या आहेत. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या समाजासाठी तर, हे प्रेरणास्थानच आहे. मात्र, आता या विजयस्तंभास शासकीय मानवंदना देण्यात आली असल्याची भावना बहुजनांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने या परिसराच्या विकासासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर जवळच वढू येथे असलेल्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचे, संभाजीराजांचे समाधीस्थळ विकसित करण्याचा मानसही स्पष्ट केला आहे. बहुजनांची मानके असलेल्या या दोन्ही ठिकाणचा विकास करण्याचे शासनाच्या वतीने ठरविण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दस्तुरखुद्द उपस्थित राहून विजयस्तंभाला मानवंदना दिली. यावेळी, भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाचा इतिहास, आपल्या पराक्रमाची आणि शौर्याची साक्ष देणारा असल्याचे गौरवोद्गार काढले. महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने दिलेली ही शासकीय मानवंदना म्हणूनच अभिनंदनीय आहे. भेदाभेदाच्या आणि समाजघातक राजकारणाला त्यातल्यात्यात भाजपच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या राजकारणाला दिलेली ही चपराक असल्याची भावना आता बहुजनांमध्ये निर्माण झाली आहे.