जुने भाजपाई, आता उरले सत्कारापूरते!

नवे चेहरे येत राहणे, हे काळसापेक्ष असले तरी, ज्यांनी आपल्यासाठी इथपर्यंत संघटन आणून दिले, त्यांचे उपकार स्मरणे आणि त्यांना सन्मानित करणे, अगत्याचे असते. पिंपरी चिंचवड शहर भाजपचे विद्यमान सरचिटणीस, स्वीकृत नगरसदस्य मोरेश्वर शेडगे यांनी असाच एक हृद्य सोहळा चिंचवडगावात साजरा केला. जनसंघापासून समाजाला योगदान दिलेल्या आणि पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद भूषविलेल्या पूर्वसूरींचे सत्कार घडवून आणले. भाजपचे प्रथम शहराध्यक्ष, डॉ. बाळकृष्ण नाईक, मामनचंद आगरवाल, दादाराम ढवाण, प्रतिभाताई लोखंडे, मधू जोशी यांच्यासह काही कालवश असलेल्या मान्यवरांच्या कुटुंबियांचे देखील सत्कार या कार्यक्रमात करण्यात आले. ज्या पूर्वसुरींनी पक्ष जतला, आपापल्या परीने वाढवला, त्यांच्या योगदानामुळेच आपण सांप्रतला पक्ष पाहू शकतो आहोत, या अंतस्थ जाणिवेतून हा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. त्याबाबत खरे म्हणजे मोरेश्वर शेडगे यांचे कौतुक करणे क्रमप्राप्त आहे. दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त “सुशासन दिवस” साजरा करण्याचा कार्यक्रम म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सुशासन दिवसाला उपलक्षून, आणिबाणी, मिसामध्ये अटक झालेल्या भाजपाईंचे सत्कारही करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन आणि नियोजन करणारे मोरेश्वर शेडगे, यासाठी अभिनंदनास नक्कीच पात्र आहेत. आज पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी म्हणून मिरविणाऱ्यांनी या पूर्वसुरींनी केलेल्या त्याग आणि दिलेल्या योगदानावर आपला इमला उभा असल्याचे विसरू नये, यासाठी हा कार्यक्रम होता, हे ध्यानात घेतले तरी पुष्कळ, असे म्हणावे लागेल. मात्र, त्याचबरोबर या पूर्वसुरींनी आपले योगदान देताना ठाम ठेवलेले निष्ठा, नीती, नियम आपण पाळतो आहोत काय, हेही एकदा तपासून पाहिले पाहिजे.

कालवश अंकुशराव लांडगे यांचा विसर पडला की, टाळले?

२००२ च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत चारचे बारा नगरसदस्य निवडून आणणारे कालवश अंकुशभाऊ लांडगे यांचा उल्लेख मात्र, या कार्यक्रमात झाला नाही. मग एकट्या भोसरीत पाच नगरसदस्य निवडून आणणाऱ्या अंकुशभाऊंचे कार्य कौतुकास्पद नव्हते काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे. अंकुशभाऊंचे पुतणे, भाजपचे विद्यमान नगरसदस्य, रवी लांडगे आपल्या कंपूत नाहीत, म्हणून त्यांना या कार्यक्रमात स्थान नाही, किंबहुना तसे स्थान दिले, तर कोणीतरी आपल्यावर नाराज होईल, आपण अडचणीत येऊ, म्हणून अंकुशभाऊंचे उल्लेखही या कार्यक्रमात टाळण्यात आला काय, असाही प्रश्न निर्माण होतो आहे. थोडक्यात काय तर, शहर भाजपाईंच्या निष्ठा, नीती, नियम सोयीप्रमाणे आहेत, आणि व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे त्या बदलतात, हे खरे सत्य आहे. मग, शहरभर चालू असलेला सुशासनाचा सोहळा केवळ पोकळ धकोसला आहे काय, हाही प्रश्न निर्माण होतो आहे.

दादा, भाऊ, “सुशासन” म्हणजे काय हो?

दिल्लीपासून गल्लीपर्यंत समस्त भाजपाई कालवश अटलबिहारी वाजपेयींच्या स्मरणार्थ “सुशासन दिवस” साजरा करताहेत. मात्र, हा सुशासन दिवस साजरा करताना, अटलजींच्या कारभारातील सुशासन आणि जिवनशैलीतील निष्ठा, नीती, नियम सध्याच्या भाजपमध्ये आहे काय, हा प्रश्न प्रत्येक भाजपाईंनी स्वतःला विचारला पाहिजे. दूरचे बाजूला ठेऊन, अगदी, या पिंपरी चिंचवड महापालिकेचा आणि शहराचा विचार करताना सुशासन म्हणजे शहर भाजपाईंना नक्की काय अभिप्रेत आहे, हे सांगणे तसे मुश्किलीचेच म्हणावे लागेल. ज्या पूर्वसुरींनी खऱ्या अर्थाने पक्षाची, स्वतःची प्रतिमा जपून पक्ष तारला, ते तर आता केवळ सत्कारापूरतेच मर्यादित राहिले आहेत. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंनी चालविलेला कारभार म्हणजे “सुशासन” असेल, तर “कुशासन” किती विदारक असू शकेल याची कल्पनाच करणे नको. शहरातील भाजपाई आमदार आणि आजीमाजी दादा, भाऊ शहराध्यक्ष त्यांची सुशासनाची व्याख्या शहरवासीयांना विषद करून सांगतील अशी अपेक्षा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×