अखेर राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे !

अनेक दिवस प्रलंबित असलेले पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद आज १२ फेब्रुवारी रोजी जाहीर झाले आहे. त्याचबरोबर युवक शहराध्यक्ष म्हणून इम्रान शेख आणि महिला शहराध्यक्ष म्हणून कविता आल्हाट यांची वर्णी लागली आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शहराध्यक्ष बदलला. युवक महिला आणि प्रमुख शहराध्यक्षपद देताना राष्ट्रवादी काँग्रेसने समाजिक समीकरणच विचार करून शहराध्यक्ष मराठा, युवक शहराध्यक्ष मुस्लिम आणि महिला शहराध्यक्ष म्हणून माळी समाजाचा विचार केला आहे. सोशल इंजिनिअरिंगचा हा प्रयोग आता शहरात कितपत चालतो, हे कालदर्शी आहे. अजित गव्हाणे अध्यक्ष होणार हे गेले अनेक दिवसांपासून बोलले जात होते, मात्र त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. इम्रान शेख आणि कविता आल्हाट ही नावे शहरासाठी नवखी असली तरी राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेत या दोघांचेही काम आहे. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिलेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा बदल झाला असल्याने त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला काय आणि कसा फायदा होणार आहे, याबाबत शहरात मतभिन्नता आहे.

महापालिका निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला हा बदल मरगळलेल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जान आणण्यात यशस्वी होईल किंवा कसे, हे येत्या काळात कळेलच. मात्र, २०१७ पूर्वी सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीकडून सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजपकडून पुन्हा सत्ता मिळवणे हा सोपा प्रकार नक्कीच नाही, याची जाणीव या नव्या तीनही शहाराध्यक्षांनी ठेवावी लागेल. प्रमुख विरोधीपक्ष म्हणून पिंपरी चिंचवड शहराच्या आणि महापालिकेच्या राजकारणावर फारसा प्रभावी ठरलेला नाही. शांत आणि वैचारिक पातळी असलेले अजित गव्हाणे आता शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय बदल घडवतील आणि शहरातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान का करावे याचे कारण निर्माण करण्यात यशस्वी होतील किंवा कसे, हे कालदर्शी आहे.

शहर भाजपशी व्यावसायिक संबंध असलेल्या आणि पक्षात महत्त्वाचे स्थान असलेल्या राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी आतापर्यंत भाजपकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी फारसा प्रयत्न केलेला नाही. आता शहराध्यक्षपदी शांत आणि संयमी व्यक्तिमत्वाचे, आतापर्यंत चार वेळा नगरसेवक असलेले अजित गव्हाणे, तारुण्याची सर्व वैशिष्ट्ये असलेले युवक शहराध्यक्ष इम्रान युसूफ शेख, आणि बराच काळ महिलांचे संघटन करण्यात कार्यरत असलेल्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांना राष्ट्र्रावादी काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांनी नेमणुका दिल्या आहेत. आतातरी शहर राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागतील अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×