शहर भाजपाईंच्या पायाखालची वाळू खरेच सरकली आहे?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आजीमाजी भाजपाई शहाराध्यक्षांनी स्वतःचा एक वेगळा फतवा जारी केला आहे. या फतव्यानुसार कोणत्याही भाजपाई उमेदवाराने या आजीमाजी शहराध्यक्षांच्या परवानगीशिवाय काहीही करायचे नाही. सर्व भाजपाई उमेदवारांचा अगदी उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम भरण्यापासून, थेट विजयी मिरवणूक काढेपर्यंतचा खर्च आजीमाजी भाजपाई शहराध्यक्ष करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण निवडणूक काळात परीचयपत्रापासून जाहिरनाम्यापर्यंत कोणतीही बाब वैयक्तिक पातळीवर करायची नाही. जे काही करायचे, ते आजीमजी भाजपाई आमदार शहराध्यक्ष करणार आहेत. हा सर्व प्रकार पाहता, आता कोणावर विश्वास ठेवून  भागणार नाही, आपल्या दृष्टीसमोरच सगळे काही करून घेण्याची आवश्यकता आणि जाणिव, या आजीमाजी शहराध्यक्ष आमदारांना झाली असावी. याचाच दुसरा अर्थ असा की, येत्या महापालिका निवडणुकीत सत्ता जाऊ शकते, या भीतीने या पिंपरी चिंचवड शहराच्या माजीआजी शहराध्यक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे काय, असा सवाल उत्पन्न होतो आहे.

या फतव्याची माहिती प्रसूत झाली ती एक चर्चेतून. विविध पक्षांचे अगर एकाच पक्षातील विविध गटांचे लोक एकत्र बसणे आणि त्यांच्यात आपापल्या नेत्यांबद्दल चर्चा होणे, ही एक नित्याचीच बाब आहे. या चर्चेत काहीवेळा अनेक चमत्कारिक आणि गंभीर तसेच काही वेळा अनेक गमतीदारही बाबी ऐकायला मिळतात. त्यांच्या चर्चेमधून काही वेळा अनेक गुप्त अगर पक्षांपूरत्या मर्यादित बाबीही स्पष्ट होतात. अशाच एका चर्चेत अस्मादिक हजर असताना भाजपाई आजीमाजी शहाराध्यक्षांनी काढलेल्या या फतव्याची माहिती मिळाली. चर्चेत अनेक गमतीजमती झाल्या, असेच गमतीत एक नगरसदस्य दुसऱ्या नगरसदस्याला विचारता झाला की, मग, निवडणूक काळात हगण्या, मुतण्याला अगर “घरी जायलाही” आजीमाजी शहराध्यक्षांची परवानगी घ्यावी लागणार आहे काय? 

या सर्व चर्चेतील गमतीचा भाग बाजूला काढून, या सर्व प्रकारातील विदारकता, अपरिहार्यता आणि भीती किती मोठी आहे, हे महत्त्वाचे! असा फतवा काढण्याची गरज या उभयता माजीआजी भाजपाई शहराध्यक्षांना का पडली असावी,याचे संशोधन केले असता, या माजीआजी शहराध्यक्षांची सत्तालालसा आणि त्यासाठीची आगतिकता दृष्गोचार होते. उद्यापासून बरोबर चार आठवड्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाईंचा सत्ताकाळ संपतो आहे. या सत्ताकाळात भाजपच्या या माजीआजी शहाराध्यक्षांनी आपल्याकडे असलेली निरंकुश सत्ता अक्षरशः वापरली. ही सत्तासुंदरी आपल्या अंकित राखून ठेवताना तिचा सरळसरळ वारांगणे प्रमाणे वापर केला. या माजीआजी शहराध्यक्षांच्या ताब्यात असलेल्या या सत्तासुंदरीचा त्यामुळे अनेक भाजपाईंना देखील उपभोग घेता आला नाही. एखाद्याने स्वतःहून धाडस दाखवून या सत्तासुंदरीच्या कसोट्यात हात घालायचा प्रयत्न केलाच, तर त्याचे हात कलम करण्यास या उभयतांनी मागे पुढे पाहिले नाही.

त्यामुळे ज्या भाजपाईंना या सत्तासुंदरीचा उपभोग घेता आला नाही, ते आता येत्या महापालिका निवडणुकीत या आजीमाजी शहराध्यक्षांना सोडचिठ्ठी देणार आहेत. या सोडचिठ्ठी देणारांची किमान संख्या वीस आणि कमाल माहीत नाही अशी अवस्था आहे. मग आता या सोडून जाणाऱ्यांना थोपवायचे कसे, यावर चर्चा करून, हा उपाय या माजीआजी भाजपाई शहराध्यक्ष आमदारांनी शोधून काढला आहे. प्रत्येक भाजपाई उमेदवाराचा खर्च आता हे माजीआजी भाजपाई शहराध्यक्ष आमदार करणार आहेत. खर्चाची ही तरतूद सर्वच म्हणजे गडगंज श्रीमंत असलेल्या उमेदवारासाठी देखील करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेप्रमाणे गेल्या निवडणुकीत हा खर्च पक्षाच्या खर्चासह चार लाख रुपयांपर्यंत करण्याची मुभा होती. या वर्षी वाढली तरी, जास्तीत जास्त पाच लाख रुपयांच्या खर्चाची अनुमती निवडणूक आयोग देईल. अर्थात या कायदेशीर खर्चाव्यतिरिक्त बेहिशोबी खर्च जवळपास या मर्यादेच्या किमान विसपट आणि कमाल पन्नासपट देखील असू शकतो. केवळ कायदेशीर खर्च हे उभयता शहराध्यक्ष करणार असतील तरी, साडेपाच ते सात कोटी रुपये एव्हढा कायदेशीर खर्च या उभयतांना करावा लागणार आहे. यात बेहोशोबी रकमेचाही विवहर केला तर, किमान सव्वाशे कोटी आणि कमाल तीनशे कोटी रुपये एव्हढा हा खर्च आहे.

याचाच अर्थ असा की, या माजीआजी भाजपाई शहराध्यक्षांकडे साडेपाच ते सात कोटी हिशोबी रोख रक्कम आणि किमान सव्वाशे कोटी बेहिशोबी रोख रक्कम नक्कीच उपलब्ध असावी. अर्थातच एव्हढी माया या उभयतांनी आपल्या सत्ताकाळात या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीतून आणि या शहरातील सामान्य जनतेच्या खिशातून ओरबाडली आहे. मग पुन्हा या भाजपाई माजीआजी शहराध्यक्षांना परत सत्ता केवळ महापालिका आणि पिंपरी चिंचवड शहरवासीयांना नागवे करण्यासाठी द्यायची काय, हे आता या शहरातील सूज्ञ मतदारांनी स्वतःच ठरविले पाहिजे हे नक्की.

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×