विलास लांडे म्हणतात, अजित गव्हाणेच माझे राजकीय वारसदार!
“गेली वीस वर्षे अजित गव्हाणे राजकारणात आहेत, २००२ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी राष्ट्रवादीने मला आणि अजित गव्हाणेंना दोघांनाही पक्षाची उमेदवारी दिली नाही, तरीही मी दुसऱ्या पक्षात न जाता अपक्ष निवडणूक लढवली. १९८६ च्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत, अजित गव्हाणे यांचे वडील दामोदर गव्हाणे यांचा झालेला पराभव आम्हा सर्वच कुटुंबियांना टोचत होता. काहीही करून आता अजित गव्हाणे नगरसेवक झालेच पाहिजेत या माझ्या आग्रहापायी अजित गव्हाणे यांनी नाईलाजाने भाजपची उमेदवारी स्वीकारली. त्यानंतर गेली पंधरा वर्षे अजित गव्हाणे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. वीस वर्षांपूर्वी माझे राजकीय वारसदार म्हणून मी अजित गव्हाणे यांचे नाव जाहीर केले आहे आणि आजही ते माझे राजकीय वारसदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्षपद त्यांना मिळाल्यामुळे मी समाधानी आहे.” ही प्रतिक्रिया आहे, माजी आमदार विलास लांडे यांची.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद मिळवण्यास अतीव इच्छुक असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांना डावलून त्यांचे राजकीय वारसदार अजित गव्हाणे यांना शहर राष्ट्रवादीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. त्यामुळे आता विलास लांडे यांचे राजकारण संपले, अशी वावडी उठली आहे. अर्थात या वावडीचे खरे प्रसूतकर्ते, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंची काही पगारी प्रसिद्धी माध्यमे आहेत, हे उघड गुपित आहे. वस्तुतः अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद स्विकारल्यामुळे भाजपला पिंपरी चिंचवड महापालिकेची येती निवडणूक अवघड ठरणार आहे. कोणाशीही मिळवून आणि जुळवून घेण्याचा स्वभाव असलेले अजित गव्हाणे, निवडणुकही मिळवून आणि जुळवून हाताळतील आणि हीच बाब राष्ट्रवादीला तारक आणि सत्ताधारी भाजपला मारक ठरणार आहे.
माजी आमदार विलास लांडे हे राजकारणाचे धूर्त खेळीया आणि मुरलेले पुराने चावल असल्याचे बोलले जाते, किंबहुना, ते तसे आहेतही. त्यामुळे विलास लांडे यांचे धूर्त राजकारण आणि अजित गव्हाणे यांचे शांत, संयमी राजकारण यांचा मिलाफ झाला, तर भोसरी हातातून जाईल, या भीतीने भाजपाई शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार आणि त्यांची पिलावळ हतबल आणि हतप्रभ झाली आहे. हे साडगे जुळू नये म्हणूनच पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष आणि त्यांचे बगलबच्चे, या साडग्यात फट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी आपल्या चाकर प्रसिद्धी माध्यमांना सुपारी देऊन विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांचे सुतगुत तोडण्याचा प्रयत्न भाजपाई करताहेत.
आता विलास लांडेंचे राजकारण जोमात आणि भाजपाई कोमात?
यावर भाजपाई प्रसिद्धी यंत्रणेने चालविलेला हा उद्योग फळास येणार नाही, असे स्पष्टीकरण, विलास लांडे यांनी दिले आहे. ते म्हणतात, आता त्यांच्याकडे कसलीही जबाबदारी नसल्यामुळे, त्यांना पूर्ण वेळ भोसरीत भाजपाईंच्या बुडाखाली आग लावण्याची संधी आहे. आता हा एकमेव कार्यक्रम हाती घेऊन आपले खेळ त्यांना निश्चितपणे दाखवता येतील. त्यांच्यातल्या मुरब्बी राजकारण्याला अशी मोकळीक मिळाली तर शहरात आणि त्याहीपेक्षा भोसरीत भाजपाई गड खिळखिळा करण्याचे काम ते ठामपणे करतील.
समस्त शहर भाजपाईंना माजी आमदार विलास लांडे यांचा वकूब आणि कर्तृत्व माहीत आहे. असा माणूस आपल्या करणीवर उतरला, तर भाजपच्या गडाला नक्कीच भगदाड पडू शकेल, याची खात्रीही शहर भाजपाईंना आहे. म्हणून मग चाकरीत असलेल्या प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांच्यात बेबनाव निर्माण करण्याचा प्रयत्न, केला जात आहे, अशी चर्चा सध्या शहरात सुरू झाली आहे. विलास लांडे यांच्याकडे आता राजकारणाचा खेळ खेळण्यासाठी वेळच वेळ आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, माजी आमदार विलास लांडे देखील हा खेळ करण्यात विशेष उत्सुक आणि तयारीत आहेत. त्यामुळे विलास लांडे यांचे जोमाने सुरू होणार राजकारण, पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाईंना या पिंपरी चिंचवड शहरात आणि त्यातल्या त्यात भोसरीत, कोमात घालविणारे ठरणार आहे, हे नक्की!
————————————————————-