अजित गव्हाणे शहर राष्ट्रवादीला पुन्हा जिवंत करतील?

शांत, संयमी आणि मितभाषी अजित गव्हाणे यांच्याकडे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले आहे. कालकथीत दत्ताकाका साने यांचा विरोधी पक्षानेतेपदाचा कालावधी सोडला तर, विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या आणि महापालिकेच्या राजकारणात फारशी प्रभावशाली ठरलेली नाही. सत्ताधारी भाजपाईंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना सत्तेचे लाभधारक केल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधाचे आपले काम ही राष्ट्रवादीची मंडळी विसरून गेली होती. पिंपरी चिंचवड शहर भाजपाई शहराध्यक्ष यांचे अंगावर येणारे राजकीय डावपेच थोपविणे, त्यामुळे शहर राष्ट्रवादीला कधीच जमले नाही. आता पिंपरी चिंचवड महापलिकेच्या निवडणुकांच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीने शहराध्यक्ष बदलला आहे. चार वेळा नगरसेवक असलेले आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले अजित गव्हाणे, आपल्या वीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एक अभ्यासू आणि खोली असलेले राजकारणी म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांना शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती दिल्याने आता शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकंदर कार्यपद्धतीत बदल होईल काय, हे पाहावे लागेल.

शहराध्यक्षांसाह महिला आणि युवक शहराध्यक्ष देखील राष्ट्रवादीने बदलले. इम्रान शेख आणि कविता आल्हाट ही शहराला नवी असलेली नावे त्यांनी दिली. आता ही नवी मंडळी पक्ष संघटन करून पुन्हा निवडणुकीला सामोरी जाणार आहेत. पक्षाचे शहरभरचे कार्यकर्ते आणि तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकांचे इच्छुक उमेदवार जाणून आणि त्यांचा वकूब ओळखून घेणे या नव्या मंडळींना कितपत साध्य होते यावर या नव्या मंडळींचे यश अवलंबून आहे. अर्थात, जुने तीनही शहराध्यक्ष या नवीन शहराध्यक्षांना मदतीला उभे राहिले तर, हे सहज शक्य आहे. त्यातही या जुन्या मंडळींनी आपली मदत या नव्यांना दिली नाही तर, पुन्हा नव्याने सुरुवात करून लोक जाणून घेणे, वेळ खाऊ ठरणार आहे आणि नेमकी वेळच आता राष्ट्रवादीकडे नाही. ज्यांच्याकडून राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता हस्तगत करायची आहे, त्या भारतीय जनता पक्षाची पक्षबांधणी करण्यासाठी विविध पातळ्यांवर सतत काम सुरू असते. सत्ताकारण आणि पक्षसंघटन यासाठी वेगवेगळी मंडळी असतात. त्यामुळे अध्यक्ष अगर पदाधिकारीकितीही आणि कधीही बदलले तरी, पक्षसंघटन आणि त्यासाठीची जुळणी कायम असते.

राष्ट्रवादीचे सवते सुभेदार कामाला लावणे, महत्त्वाचे!

पक्ष पातळीवर कार्यकर्ते आणि इच्छुक जाणून घेणे आता राष्ट्रवादीची खरी गरज आहे. दुर्दैवाने राष्ट्रवादीकडे सवत्या सुभेदारांची जादा चलती आहे. पक्षाचे म्हणण्यापेक्षा या सुभेदारांचे कार्यकर्ते जास्त आहेत. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील सुभेदार संघटनेत वापरणे गरजेचे आहे. हे गटांमध्ये विभागलेले सुभेदार पक्षाच्या कामाला लावणे हा तसा अवघड भाग आहे आणि तो या नवीन मंडळींना कितपत हाताळता येईल हे पाहणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात ही सगळी यंत्रणा मृतप्राय होती. तिच्यात जान आणण्यासाठी शहर राष्ट्रवादीच्या या नवीन तीनही शहराध्यक्षांना विशेष लक्ष देऊन काम करावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सवत्या सुभेदारांनीच यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाला गोत्यात आणले आहे. आता या सुभेदारांना गोंजारत बसण्याइतका वेळ या नवनियुक्त मंडळींकडे नक्कीच नाही. त्यामुळे येतील त्यांच्यासह आणि येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढची लढाई लढायची आहे.

हातात घड्याळ बांधण्याची इच्छा असलेलेही काही महाभाग आहेतच, त्यांचा पक्षात येण्याचा मूळ हेतू आणि त्यांना पक्षात आणण्यास उत्सुक असलेल्याचे मनसुभे देखील तपासणे, या नवनियुक्त मंडळींसाठी आता गरजेचे ठरणार आहे. हेतुपूर्वक पक्षांतर करण्यास तयार असलेल्यांना आणि गेल्या निवडणुकीत, सत्ता येणार नाही या भीतीने पक्ष सोडून गेलेले आणि आता पुन्हा राष्ट्रवादीची आस असणाऱ्यांना, त्यांचा हेतू हा कुहेतु तर नाहीना, हे पाहून जवळ करणे, राष्ट्रवादीसाठी गरजेचे आहे. नाहीतर भाजपसह इतर ठिकाणी घाण पसरवल्यामुळे तेथून बाहेर पडणारी आणि आता पुन्हा राष्ट्रवादी मैली करण्यासाठी उत्सुक असलेली मंडळी केवळ सत्तेसाठी म्हणून पक्षात येतील.

थोडक्यात, रात्र थोडी आणि सोंगे फार, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट आणि युवक अध्यक्ष इम्रान खान यांची सध्याची अवस्था आहे. त्यामुळे कोणती सोंगे बेमालूमपणे वठवायची आणि कोणती इतरांवर लादायची, हे या नवनियुक्त मंडळींना ठरवावे लागेल. यात ते कितपत यशस्वी होतील यावर, पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता पुनर्स्थापित होईल किंवा कसे हे अवलंबून आहे.

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×