राष्ट्रवादीचा मोर्चा बघून भाजपाईंची अक्षरशः फाटली, ……………. …………….. “नजर”!

धडाकेबाज, मोठा मोर्चा काढून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि तो मोर्चा पाहून पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंची अक्षरशः नजर फाटली आहे. भाजपाईंच्या गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात, त्यांनी मिंधी करून ठेवलेली राष्ट्रवादी अशी अचानक उभारी घेऊन उठली, हे शहर भाजपाईंना न पचणारे ठरले आहे. भाजपाईंना झालेल्या या अपचनाचे कारण ठरले आहे, शहर राष्ट्रवादीत नुकताच झालेला खांदेपालट. अजित गव्हाणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाल्यापासून तसाही शहर राष्ट्रवादीत काही प्रमाणात उत्साह संचारला होता. काहीतरी वेगळे आणि सकारात्मक घडेल या आशेवर असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आदल्याच दिवशी वसंत बोराटे या भाजपाई नगरसेवकाच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशामुळे काहीसे आश्वस्थ झाले होते. तशातच हा मोर्चा काढला गेल्याने, राष्ट्रवादीच्या छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. भाजपाईंची महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यापासून आपल्या तुकड्यांवर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते पदाधिकारी खुश आणि म्हणूनच निर्धास्त आणि निद्रिस्त ठेवण्यात सत्ताधारी भाजपाईंना बऱ्यापैकी यश आले होते. मात्र, या खांदेपालटाने आता शहर राष्ट्रवादी खडबडून जागी झाल्यामुळे सत्ताधारी भाजपाई टरकले असल्यास नवल वाटायला नको.

राजू लोखंडे गेम स्टार्टर, तर वसंत बोराटे गेम चेंजर!

मुळात वसंत बोराटे हे राष्ट्रवादीच्या दृष्टीने खेळ बदलणारे म्हणजेच गेम चेंजर ठरेल आहेत. माजी भाजपाई शहराध्यक्ष यांच्या जवळचे विश्वासू आणि भाजपाई नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पिंपरी चिंचवड शहर भाजपची गेम वाजवायला सुरुवात केली. त्यानंतर भाजपाई नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे, अपक्ष म्हणून निवडून आलेले भाजपचे सहयोगी कैलास भालचंद्र तथा बाबा बारणे यांनी या राजकारणाच्या खेळात म्हणजेच गेम मध्ये राष्ट्रवादीला अग्र गुणांकन केले आणि आता या खेळाला राष्ट्रवादीच्या बाजूने फिरविण्याचा  आणि गेम चेंजर होण्याचा मान वसंत बोराटे यांना मिळाला आहे. राजकारणाच्या या खेळात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी, शहर भाजपवर या घडीला तरी सरस ठरली आहे. तशातच सत्ताधारी शहर भाजपच्या भ्रष्टाचारावर उघड आणि जाहीर हल्ला करणारा हा राष्ट्रवादीचा मोर्चा, शहरातील पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आणि मतदारांना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाबद्दल विश्वास निर्माण करणारा ठरला आहे.आजीमाजी भाजपाई शहराध्यक्षांच्या मनमानी आणि स्वहिताच्या राजकारणाला कंटाळलेले आणि तिथून बाहेर पडू इच्छिणारे अनेक जण आतापर्यंत कुंपणावर बसून कुठे उडी मारायची याचा विचार करीत शांत बसले होते. त्यांनाही या मोर्चामुळे राष्ट्रवादीची किंमत आणि हिम्मत कळली असल्याने निर्णय घेणे सोपे होणार आहे.

शहर राष्ट्रवादीला हाच वेग कायम ठेवावा लागेल.

पक्षात झालेला बदल आणि नवीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी जुन्या नव्याची मोट बांधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिवंतपणा आणण्याचा केलेला प्रयत्न स्पृहणीयच आहे. मात्र, येत्या महापालिका निवडणुकीपर्यंत हा वेग कायम राखण्याची जबाबदारी या नवनियुक्त मंडळींवर आली आहे.महत्वाचे म्हणजे, राष्ट्रवादीच्या काही जुन्या खोडांना चालत्या गाडीची खीळ काढण्याची सवय आहे. याचबरोबर आपल्याच लोकांच्या पायात साप सोडण्यातही काही मंडळी विशेष वाकबगार आहेत. पक्षांतर्गत खोडी करणाऱ्या आणि आपल्या स्वहिताच्या राजकारणासाठी पक्षाला वेठीस धरणाऱ्या या मंडळींपासून चार हात लांब राहणे या नवनियुक्त गव्हाणे, शेख आणि आल्हाट यांना कसे जमेल, यावर पक्षाचा वेग वाढतो की खुंटतो हे अवलंबून आहे. कोणत्याही अतिशर्तींशिवाय पक्षकार्यासाठी कार्यरत राहणारे लोक, कार्यप्रवण करणे आणि दाताखाली येणारे खडे बाजूला फेकणे हे या नवनियुक्त मंडळींच्या पहिल्या परीक्षेचे धडे असणार आहेत आणि त्यात ते कसे उत्तीर्ण होतात, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची वाटचाल कशी आहे, हे निश्चितपणे अवलंबून असणार आहे!

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×