शहर भाजपाईंची किरीट सोमय्यांच्या खोट्या पत्राची नवी भोकाडी!
सत्ताकाळ संपल्यावर आणि येत्या महापालिका निवडणुकीत सत्ता येणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहर भाजपाई भंजाळल्यासारखे झाले आहेत. नवनवीन भोकाड्या पसरवून आपले भंजाळलेपण आणि उद्विग्नता हे भाजपाई लक्षात आणून देत आहेत. असाच एक नवीन प्रकार नुकताच लक्षात आला आहे, तो म्हणजे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे आणि राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची चौकशी करण्याची मागणी करणारी दोन वेगवेगळी पत्रे पिंपरी चिंचवड महापालिकेला प्राप्त झाले आहे. मात्र ही पत्रे खरोखरच किरीट सोमय्या यांच्याकडून आली आहेत काय, याबाबत साशंकता निर्माण झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने या पत्रांची चौकशी केली. या चौकशीत सदरची पत्रे किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातून आलेले नाहीत अगर या पत्रांशी सोमय्या यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहर भाजपाईंनीच हा खोटा पत्रांचा प्रकार करून शहर राष्ट्रवादी समोर भोकाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
आपण आपल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेला भ्रष्टाचार, टक्केवारीचे ओरबाडणे, अनागोंदी, अनियमितता शहरवासीयांना कळून चुकली असल्याचे शहर भाजपाईंच्या लक्षात आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शहर भाजपला, नुकतेच माजी झालेले नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते सोडचिठ्ठी देत आहेत. निवडणुकांचा खर्च माजीआजी भाजपाई शहाराध्यक्षांनी स्वतःच्या खिशातून करण्याची तयारी दाखवूनही पक्षातून होणारी गळती थांबत नाही, यामुळे शहर भाजपाईंची उद्विग्नता वाढू लागली आहे. त्यामुळे काहीतरी वेगळे कुभांड उभे करण्याचा प्रयत्न शहर भाजपाई करताहेत. मात्र, किरीट सोमय्या यांच्या नावाचा वापर करून खोटी पत्रे महापालिकेला पाठविण्याचा हा प्रकार म्हणजे शहर भाजपाई पुरते भंजाळले असल्याचे लक्षण आहे. काहीतरी कुभांड रचून चौकशीची भोकाडी निर्माण करणे आणि संबंधितांना खोट्या आरोपात अडकवणे, हा समस्त भाजपाईंचा सर्वमान्य खेळ पिंपरी चिंचवड शहरातही निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा मात्र, या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांना भाजपच्या विरोधकांवर आरोप करण्याचेच काम सोपविण्यात आले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर येण्याइतकी त्यांची लायकी खाली पाडून पिंपरी चिंचवड शहर भाजपाई आपले भंजाळलेपणच उघड करीत आहेत. किरीट सोमय्या यांच्या संशयास्पद पत्रांमध्ये २००७-०८ या अजित गव्हाणे यांच्या आणि प्रशांत शितोळे यांच्या २०१०-११ या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या कालावधीत काही घोळ आहेत काय, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पिंपरी चिंचवड भाजपाईंना माजीआजी शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात स्थायी समिती अध्यक्ष होते, शिवाय गेल्या पाच वर्षांच्याया भाजपाई सत्ताकाळात पाच स्थायी समिती अध्यक्ष झाले, याचा बहुतेक विसर पडला असावा. त्याही पुढचा भाग म्हणजे, भाजपाई सत्ताकाळातील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत अनेक मोठाली भ्रष्टाचाराची, अनियमिततेची, वाढीव टक्केवारीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या चौकशी बरोबरच, भाजपाई माजीआजी शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे यांचीही चौकशी करण्याची मागणी आता पुढे येत आहे. त्याचबरोबर भाजपाई सत्ताकाळातील सर्वच स्थायीसमिती अध्यक्षांच्या चौकशीची मागणीही जोर धरीत आहे. गव्हाणे, शोतोळे यांच्या चौकशीतून काय साध्य होईल माहीत नाही, मात्र भाजपाई सत्ताकाळातील स्थायीसमिती अध्यक्षांची चौकशी झाली तर, शहर भाजपाईंवर नक्कीच आपले तोंड लपविण्याची वेळ येईल असे मत शहरातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
————————————————————-