“कृष्ण”लीला संपल्या, आता “अंकुश” येणार?

आयर्न मॅन, अल्ट्रा मॅन म्हणून खिताब मिळवलेले कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तपदावरून गच्छंती झाली. त्या जागी आता अंकुश शिंदे यांची वर्णी लागली आहे. आपल्या प्रसिद्धिलोलुपते वरून कायम वादात आणि चर्चेत असलेले कृष्ण प्रकाश अर्थात केपी यांची बदली शिक्षा स्वरूपात झाल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असतानाच, कोणा एका सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या बदलीला राजकीय वास असल्याची बाब पुढे आणली आहे. वस्तुतः एव्हढ्या मोठ्या पदावरच्या बदल्या आणि नियुक्त्या राजकीय हितसंबंधांतुनच होतात, हे एक उघड गुपित आहे. फक्त प्रश्न निर्माण होतो तो हा की, अवघ्या दीड वर्षात केपींची बदली का झाली. नव्याने रुजू होणाऱ्या अंकुश शिंदे यांनी याचा धांडोळा घेतला तरी, त्यांचा पुढचा कार्यकाळ सुकर आणि सफल ठरेल. अवघ्या पावणेचार वर्षात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चौथे आयुक्त रुजू होताहेत आणि त्या मानाने केपींना बऱ्यापैकी मोठा काळ या शहरात काम करता आले, हे यातील विशेष. 

मात्र, इतर पोलीस आयुक्तांपेक्षा जास्त काळ काम करता आलेल्या केपींना या शहरातील गुन्हेगारीला म्हणावा तसा आळा घालता आला नाही. ज्या मूळ बाबींसाठी पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले, त्यातच या शहरातील पोलीस आयुक्तालय सपशेल नाउमेद करणारे ठरले आहे. १५ ऑगस्ट, २०१८ रोजी या शहरातील पोलीस आयुक्तालयाचे उदघाटन करण्यात आले. या पावणेचार वर्षात पोलीस आयुक्तालयाची घडी सुरळीत करण्यासाठी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या आयुक्तांनी वेगवेगळे प्रयोग केले. मात्र शहरातील  गुन्हेगारी पूर्णतः रोखण्यात कोणत्याही पोलीस आयुक्तांना फारसे यश मिळाले नाही आणि ते शक्यही नाही. मात्र, त्यासाठी शहराची जडणघडण आणि गरज ओळखून सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे ठरते. आतापर्यंतच्या पोलिस आयुक्तांनी त्यासाठी शक्य ते प्रयत्न केलेही आहेत. मात्र, त्याचबरोबर या शहरातील धनदांडगे, बांधकाम व्यावसायिक, राजकारणी यांच्या कच्छपी लागून काही “वेगळेच”  करण्याचाही प्रयत्न या मंडळींनी केला आहे. त्यात पुरते गुंतून गुरफटले ते कृष्ण प्रकाश.

जमिनींवर ताबे मिळविण्यासाठी पोलिसांचा वापर?

पिंपरी चिंचवड शहरात राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिक यांचे साटेलोटे आहे, त्याचबरोबर अनेक राजकारणीच बांधकाम व्यावसायिक आहेत. केपींची कारकिर्दीत अशा बांधकाम व्यावसायिकांनी आपली चांदी करून घेतली. कोर्टकचेऱ्या करण्यापेक्षा पोलिसी यंत्रणा हाताशी धरून अनेक धनदंडग्यांनी मिळत नसलेल्या अगर एखादा देत नसलेल्या जमिनींवर ताबे मिळवले. पोलिसच ताबा घ्यायला मदत करतात म्हटल्यावर, ज्यांना असे व्यवहार करायचे नव्हते, ते हतबल झाले. केपींच्या राज्यात कोणत्याही जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी “पाच खोक्याची” सरळ बोली होती. ज्यांना परवडते, त्यांनी पोलिसी दडपशाही वापरून जमिनी ताब्यात घेतल्या, अशी माहिती काही बांधकाम व्यवसायिकांच्याच तोंडून नाव न घेण्याच्या अटींवर सांगण्यात येते आहे आणि तसे काही न्यायालयीन खटलेही दाखल झाले आहेत.

मागासवर्गीय कार्यकर्त्यांवर आकसाने कारवाई?

काही कार्यकर्त्यांवर, ते केवळ मागासवर्गीय आहेत म्हणून पोलिसी कारवाई झाल्याचा आरोप पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांवर म्हणजेच कृष्ण प्रकाश यांच्यावर केला जातो आहे. काही लोकांना नको असलेले आणि वैयक्तिक ताकद असलेले मागासवर्गीय कार्यकर्ते, केपींच्या कारकिर्दीत जाणूनबुजून छळले गेल्याच हा आरोप खोडून काढणे, केपींसह पोलीस आयुक्तालयाला शक्य झालेले नाही. त्यातूनच दलीत अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायद्याचा न्यायालयीन बडगा केपींवर चौकशीच्या स्वरूपात उगारला गेला आहे. काही विशिष्ट लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी पोलिसी यंत्रणेचा “रोखीने” वापर करण्याची पद्धतच केपींची मुळावर आली असल्याची आणि त्यातूनच त्यांची बदली झाल्याची चर्चा शहरात आहे.

गुन्हेगारीला राजकीय वरदहस्त, राजकीय आणि वर्चस्ववादी संघटित गुन्हेगारी, त्यासाठी सामूहिक रित्या तोडफोड, दहशत माजविणाऱ्या वाढदिवस आणि तत्सम कार्यक्रमांच्या दंडेल्या, अल्पवयीन गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, गुन्ह्यांची उकल करण्यात आणि न्यायालयापर्यंत गुन्हेगार पोहोचविण्यातील अपयश, पोलिसी यंत्रणेचा नको तिथे वापर, पोलीस विकत घेता येतात, ही बाळावलेली भावना, राजकीयदृष्ट्या सोयीच्या पोलिसी कारवाया यांमुळे पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय बदनाम झाले आहे. तशातच प्रसिद्धी माध्यमांच्या काही ठराविक प्रतिनिधींचा आणि सामाजिक कार्यकर्ते या नावाखाली वावरणाऱ्या दलालांचा पोलिसी कामात वाढता हस्तक्षेप एकूणच शहरातील शांतता आणि सुव्यवस्था गोत्यात आणणारा ठरत आहे. 

अशा परिस्थितीत चौथे पोलीस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. प्रसिद्धी टाळणारे अधिकारी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. मात्र,  शहरातील प्रसिद्धी माध्यमींनी भल्याभल्या अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे, हेही तितकेच खरे आहे. अशा प्रकारची सवंग प्रसिद्धी टाळून शहरावर किती आणि कसा “अंकुश” ठेवण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना कितपत यशस्वी होतात, हे कालदर्शीच आहे.

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×