आता महापालिकेतही “मी, पुन्हा येणार”?
“मी पुन्हा येणार” या घोषवाक्याच्या कंठशोषाची सध्या काय अवस्था झाली आहे, ते उभ्या महाराष्ट्राच्या समोर आहे. असल्या दर्पोक्तीने काही साधता येत नाही, हे आता स्वयंस्पष्ट सत्य आहे. तरीही ही “पुन्हा येणार” ची दर्पोक्ती वापरून पिंपरी चिंचवड महापालिकेतील चालू गाडीची खीळ काढण्याचा प्रयत्न एक महाभाग करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाचे प्रमुख म्हणून सहशहर अभियंता या पदावर काम करणारे राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अशोक भालकर सध्या आता मीच या महापालिकेचा शहर अभियंता होणार अशी दर्पोक्तीपूर्ण घोषणा करीत हुंदडत आहेत. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन शहर अभियंता सेवानिवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर असताना, महापालिकेतील सत्ताधारी आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाईंच्या आशीर्वादाने आणि तत्कालीन आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या इच्छेने अशोक भालकर या महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले. त्यांना त्यावेळी शहर अभियंता व्हायचे होते, मात्र हे पद इथल्या अभियंत्यांमधून पदोन्नतीने भरावयाचे असल्याची जाणीव आयुक्तांना करून दिल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी स्मार्ट सिटीचा सवतासुभा अशोक भालकरांना आंदण देऊन सहशहर अभियंता केले.
सध्या कार्यरत असलेले पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता येत्या मे महिनाअखेर सेवानिवृत्त होताहेत. त्या जागेवर आपली वर्णी लागावी म्हणून काही महाभाग “एडी चोटीसे” प्रयत्न करीत आहेत. त्यातील प्रमुख नाव या अशोक भालकरांचे आहे. तीन वर्षांपूर्वी महापालिकेत येताना मीच शहर अभियंता होणार ही त्यांची घोषणा होती. राज्य शासन आणि तत्कालीन आयुक्त याला राजीही झाले होते. मात्र, त्यावेळी या भालकरांना दुधाची आस ताकावर भागवणारे स्मार्ट सिटीचे प्रमुखपद बहाल करण्यात आले होते. वस्तुतः सवतासुभा असतानाही या भालकरांना स्मार्ट सिटी विभाग व्यवस्थित सांभाळत आला नाही. अनेक राजकीय आणि सामाजिक मंडळींच्या, त्यांच्याबाबत गंभीर तक्रारी आहेत. स्मार्ट सिटीचा कारभार ठेकेदार पोसण्यासाठी आहे की, शहर विकासासाठी याचाच प्रश्न पडावा, अशी या भालकरांची गेल्या तीन वर्षांतील कामकाजाची पद्धत राहिली आहे. त्यांच्या या पद्धतीमुळेच एका सत्ताधारी भाजपाई नगरसेविकेला “नीट सांभाळता आले नाही” म्हणून महापालिका आयुक्तांवर काळिखमय प्रयोग झाला होता, हे विशेष.
आता हे अशोक भालकर राज्य शासनदरबारी मोठ्या प्रमाणात खेट्या मारताहेत, राज्य शासनातील एका सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत पिंपरी चिंचवड महापालिकेत शहर अभियंता पदावर आपली वर्णी लागावी म्हणून ते साकडे घालत आहेत. मात्र, नव्याने शासनाकडून मंजूर झालेल्या नियुक्त्या आणि पदोन्नत्यांच्या नियमानुसार शहर अभियंता हे पद पदोन्नतीने भरावयाचे आहे. शिवाय महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये सध्या त्या पदासाठी उमेदवारही आहे. मग अशोक भालकरांच्याच नाकात काही वेगळा मोती असण्याची गरज नक्कीच नाही. शहर अभियंता हे एक सन्मानित आणि वैधानिक पद आहे. या पदावर वर्णी लागावी म्हणून आणखीही महाभाग प्रयत्नरत आहेत. आता या पदावर पदोन्नती मिळण्यासाठी योग्य असलेल्या उमेदवारांच्या बरोबरीने अजून एक सध्या सहशहर अभियंता पदावर असलेले उमेदवारही आहेत, ज्यांचे म्हणणे आहे, की ते आताच्या उमेदवाराच्या तीन वर्षे अगोदर सेवानिवृत्त होताहेत. म्हणून त्यांना शहर अभियंता व्हायचे आहे आणि त्यांच्या निवृत्तीनंतर पुन्हा मग त्या लायक असलेल्या उमेदवाराला पदोन्नतीने शहर अभियंता पद द्यावे, अशी त्यांची मागणी आहे आणि ती पुढे रेटण्याचा मनस्वी प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. थोडक्यात शहर अभियंता पद म्हणजे भोजन आहे, मला भूक लागली, मला द्या, ताटावर बसलेल्यांचा विचार नंतर करा, अशा स्वरूपाची ही बालिश मागणी आहे.
आता, “पुन्हा मीच” म्हणणाऱ्यांविषयी, वस्तुतः अभियंता पदावर होणाऱ्या पदोन्नत्या या महापालिका सेवेतील अभियंत्यांमधूनच व्हाव्यात, त्यावर योग्य उमेदवार असताना प्रतिनियुक्तीवर व्यक्ती नेमु नयेत, असा दंडक असताना, केवळ तत्कालीन राज्य शासन आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपाई, त्याहीपेक्षा जास्त तत्कालीन आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या इच्छेखातर अशोक भालकर यांना स्मार्ट सिटीचा सवता सुभा देऊन, इथल्या अभियंत्यांच्या बोकांडी बसवण्यात आले. आता पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि प्रशासक राजेश पाटील यांनी हा चुकीचा पायंडा मोडीत काढून, भालकरांना पुन्हा, त्यांची तीन वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून, त्यांच्या मूळ स्थानी, म्हणजेच राज्य शासनात परत पाठवावे. चुकीच्या पायंड्याचे समर्थन न करता निर्णय होणे, महापालिका आयुक्त प्रशासक राजेश पाटील यांच्याकडून अपेक्षित आहे.
———————————————————-