कृष्ण प्रकाश बदनामी, किती खरी, किती खोटी?
स्थापना होऊन अवघ्या पंचेचाळीस महिन्यांचाही कालावधी अजून पूर्ण झाला नसतानाच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चौथे पोलीस आयुक्त पाहिले. पद्मनाभन, बिष्णोई, कृष्ण प्रकाश आणि आता अंकुश शिंदे. नवीन चौथे आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारून अजून एक महिनाही पूर्ण झाला नाही, तेव्हढ्यातच जुने आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदनामी करणारे एक पत्र समाज माध्यमांमधून फिरले. ते पत्र कोणी लिहिले, असे सकृत दर्शनी निदर्शनास येतानाच ते पत्र ज्यांची सही असल्याचे दिसते, त्यांनी म्हणजेच सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी तसे पत्र लिहिल्याचे नाकारले देखील. शिवाय “आपल्याला पत्र लिहिल्याचे नाकारण्यासाठी दबाव येईल” असा उल्लेख त्या पत्रातच करण्यात आला आहे, हे आणखी विशेष. पत्रात काय मजकूर आहे, तो कितपत खरा किंवा खोटा, हा पोलिसी तपासाचा भाग आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि एकूणच पोलीस यंत्रणा त्याच तपास करतीलही. महत्त्वाचे की, आतापर्यंतच्या तीनही पिलीस आयुक्तांना पिंपरी चिंचवड शहरात या ना त्या कारणाने बदनाम व्हावे लागले आहे आणि या बदनामीचीच कारणमीमांसा होणे आगत्याचे आणि क्रमप्राप्त आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत पिंपरी चिंचवड शहर असताना, शहरात पुण्यातून लक्ष ठेवणे शक्य नाही म्हणून, पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय हवे, ही मागणी होती. अनेक प्रयत्नांतून मग पिंपरी चिंचवड शहराचे स्वतःचे पोलीस आयुक्तालय सुरू झाले. मात्र, अगदी सुरुवातीपासून म्हणजे नव्याचे नऊ दिवस संपण्यापूर्वीच या पोलीस आयुक्तालयाच्या एकंदर कामकाज पद्धतीबाबत अनेक आक्षेप निर्माण होऊ लागले. त्यातील सर्वात मोठा आक्षेप म्हणजे, पोलीस आयुक्तालय पोलीस यंत्रणेपेक्षा इतरांच्याच हस्तक्षेपाने चालते, हा आहे. कधी याबाबत राजकीय हस्तक्षेपाची चर्चा झाली, कधी सामाजिक कार्यकर्त्यांच्या कलाने पोलीस काम करतात, असे म्हटले गेले, तर कधी काही पत्रकार या पोलीस यंत्रणेला हाताळत असल्याचे आरोप झाले. थोडक्यात काय, तर पोलिसांना, पोलिसांच्या पद्धतीने या शहरात कामच करता आले नाही, असा एकूणच आक्षेप नोंदवला गेला. नवीन पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यावर पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी कमी होईल आणि सामान्यजनांना आपले जीवन सामान्यपणे व्यतीत करता येईल, ही सार्थ आणि साधी अपेक्षा मात्र, नवीन पोलीस आयुक्तालयाने पूर्ण केली नाही, हे नक्की.
हस्तक्षेप कोणाचा आणि कशासाठी?
पिंपरी चिंचवड शहराचे नवीन पोलीस आयुक्तालय धनदांडगे, मातब्बर राजकारणी, व्यापारी, मोठमोठे बांधकाम व्यावसायिक यांच्या दावणीला बांधले गेल्याची भावना शहरातील सामान्यजनांना आहे. या सर्व मंडळींनी आपापल्या हितासाठी पोलीस यंत्रणा राबविली असे बोलले जाते. सामान्य गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा पोलिसांनीही आपले हात ओले करण्यासाठी स्वतःला ठरवून या मंडळींच्या दावणीला बांधून घेतले असल्याचे चित्र आहे. त्यासाठी पोलिसांना आयतेच काही मध्यस्थ दलाल शहरात उपलब्ध झाले, हे एक विशेष. या दलालांमध्ये काही सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, राजकारणी आणि पत्रकारही असल्याची वदंता आहे. यातील प्रत्येकाने आपापल्या हितांचे संरक्षण करून शहर पोलिसांना माया गोळा करून दिली, असे चर्चेत आहे. एकीकडे अवैध दारू, मटका, जुगार, वेश्या व्यवसाय, यांच्यावर आळा घातल्याचा आव आणतानाच लक्ष्मी प्रसन्न करून घेण्याचे वेगळे मार्ग शहर पोलीस यंत्रणेने तयार केले आणि त्यासाठी मध्यस्थ दलालांनी आपली पूर्ण शक्ती खर्ची पाडली.
कृष्ण प्रकाश यांची प्रसिद्धीलोलुपता अडचणीची ठरली?
तशातच कृष्ण प्रकाश यांच्यासारखे आयर्न मॅन, अल्ट्रा मॅन शहराचे पोलीस आयुक्त झाले. समाजमाध्यमी, दृक्श्राव्य आणि मुद्रित प्रसिद्धिमध्यमांना काहीतरी चालवून जागा भरण्याच्या कामी असेच व्यक्तिमत्व हवे असते. त्यामुळे कृष्ण प्रकाश यांच्या मिशीच्या केसांसह इतरत्रच्या केसांची लांबी मोजून त्याची बातमी करणेच या प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी म्हणजेच पत्रकारांनी बाकी ठेवले, एव्हढी प्रसिद्धी कृष्ण प्रकाश यांना देण्यात आली. आपल्याला मिळालेल्या अतिरिक्तच्या आणि अवास्तव प्रसिद्धीला भुलून पोलीस आयुक्त या माध्यमी मंडळींच्या कच्छपी लागले. आपली छवी कायम प्रसिद्धीच्या झोतात राहावी म्हणून मग अनेक गंमतीदार चेष्टा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केल्या अगर बातमीच्या सोसापायी त्यांच्याकडून करून घेतल्या गेल्या. त्यातूनच मग माध्यमी मंडळींची दुकानदारी चालू राहिली, असे बोलले जाते.
आता त्या बदनामी करणाऱ्या तथाकथित पत्रविषयी…..
सहायक पोलिस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या सहीने असलेल्या या पत्रात अनेक गंभीर आरोप पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर करण्यात आले आहेत. यातील प्रमुख आरोप, कृष्ण प्रकाश यांनी शहरातील जमिनींच्या व्यवहारात काही बांधकाम व्यावसायिकांना अवाजवी मदत करून शेकडो कोटींची माया गोळा केली असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आपली छवी स्वच्छ राहावी म्हणून प्रसिद्धी माध्यमींना आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा ठराविक मेहनताना दिल्याचा उल्लेख आहे. काही आरोप सरळ कृष्ण प्रकाश यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणारे आहेत. वस्तुतः पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर असे आरोप होणे, लांच्छनास्पद तर आहेच, त्याहीपेक्षा पोलीस यंत्रणेची एकूणच विश्वासार्हता गोत्यात आणणारे आहे. त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमांवरही सवाल उठविणारी ही बाब आहे. त्यामुळे या पत्राची, हे पत्र पाठविणाऱ्या व्यक्तीची, यात ज्यांच्या नावांचा समावेश आहे, त्यांची, अशा सर्वांचीच चौकशी आणि तीही निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. पत्र लिहिणाऱ्यानेच आपल्यावर हे पत्र लिहिलेच नाही असे सांगण्यासाठी दबाव येण्याची शक्यता वर्तवली आहे आणि तसे हे पत्र नाकारण्यातही आले आहे.
याबरोबरच पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांचेही एक नेमके याच आशयाचे पत्र समाजमाध्यमांद्वारे फिरविले जात आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत सखोल आणि बाबवार चौकशी करणे गरजेचे आहे. त्यातून तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि एकूणच प्रसिद्धीमाध्यमे यांची विश्वासार्हता तावून, सुलाखून आणि सत्यदर्शी निघेल. समान्यजनांच्या माहितीसाठी आणि पोलीस यंत्रणेसह सगळ्यांच्याच हितासाठी हे होणे गरजेचे!
——————————————————-