सांप्रदायिकता, आरएसएस, मनुवाद, भाजप, नरेंद्रजी मोदी आणि तुकोबारायांची पगडी!
काळ मोठा गंमतीदार असतो, हेच खरे. मंगळवार दि. १४ जून, २०२२, ज्येष्ठ पौर्णिमा, शालिवाहन शके १९४४, विक्रम संवत २०७८, शिवराज शक ३४९ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना संत तुकोबारायांची पगडी घालून त्यांचा तुकोबारायांच्या जन्म आणि कर्मभूमीत सत्कार करण्यात येत आहे. वारकरी सांप्रदायिक परंपरेचे संतश्रेष्ठ म्हणून नाव घेतले जाणाऱ्या तुकोबारायांची प्रतिकात्मक पगडी त्यासाठी खास तयार करून घेण्यात आली आहे. त्या पगडीवर “भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ।।” हे तुकोबारायांच्या अभंगातील एक पद उधृत करण्यात आले आहे. आता यातील भले कोण, कासेची लंगोटी कोणाची आणि कोणाला द्यायची, नाठाळ कोण, काठी कोणाची आणि कोण हाणणार, याचा संशोधनात्मक उहापोह होणे गरजेचे आहे.
हा संशोधनात्मक उहापोह करताना, सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देहू संस्थानच्या निमंत्रणावरून तुकोबाराय ज्या शिळेवर बसत त्या शिळेच्या प्रतिकात्मक मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येताहेत. या प्रतिकात्मक शिळा मंदिराच्या जागी कोणे एके काळी, तिथे असलेल्या शिळेवर बसून तुकोबारायांनी आपल्या विठुमाऊलीला आर्जवे केली असतील, साकडे घातले असेल, त्याच प्रतिकात्मक शिळेचे हे मंदिर आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सत्कारासाठी देहू संस्थानने ही खास पगडी बनवून घेतली असल्याचे सांगितले जाते आहे.
या संपूर्ण सोहळ्याच्या नियोजनाचा विचार करताना सर्व प्रथम वारकरी संप्रदाय आणि या वारकऱ्यांची सांप्रदायिकता याच्यावर प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते. ज्ञानदेवांपासून सुरू झालेला हा भक्तीच्या सगळ्यात सहज आणि सोप्या मार्गावर चालणारा हा संप्रदाय. विठुमाऊलीला भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीत विठुमाऊलीचे प्रतिक पाहणाऱ्या आणि एकमेकांच्या पायावर डोके ठेऊन, कोणत्याही भेदभावाला तिलांजली देणाऱ्या वारकरी मंडळींचा हा संप्रदाय. अनिष्ठ रूढी परंपरांना त्यागून सत्य आणि सत्वनिष्ठ समाज निर्मितीचा वसा घेतलेला हा संप्रदाय. अशा या वारकरी संप्रदायात संतश्रेष्ठ ठरलेल्या, आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ भक्तिमार्गावर चाललेल्या, तुकोबारायांच्या डोक्यावरच्या पगडीचे, त्यांच्याच “नाठाळाचे माथी हाणू काठी” या शब्दांनी सुशोभित केलेले प्रतीक, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या डोक्यावर ठेवण्यात येणार आहे.
ज्या तुकोबारायांनी आपली आख्खी हयात सनातनी ब्राह्मणवादावर आणि ब्राह्मणी वर्चस्ववादावर कोरडे ओढण्यात घालविली, ज्या तुकोबारायांनी भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय जनसमान्यांसाठी सोपा करून सांगितला, ज्या तुकोबारायांनी सामाजिक संवेदना जपणारा गाथा सर्वश्रुत केला, त्याच तुकोबारायांचा गाथा बुडवून सनातनी वैदिक धर्माने भागवतास आणि भागवती वारकरी संप्रदायास रसातळाला नेण्याचा प्रयत्न केला. मनुवाद नाकारणारी समाजव्यवस्था उभी करून ब्राह्मणी वर्चस्ववादाला आव्हान देणाऱ्या तुकोबारायांच्या डोक्यावरची प्रतिकात्मक का होईना, पगडी कोणाच्या डोक्यावर ठेवायची याचा सारासार विचार कोणी केला किंवा कसे, यावर खरे म्हणजे संशोधन व्हायला हवे.
मनुवादाचे आणि ब्राह्मणी वर्चस्वाचे खुले समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या विचारासरणीतून निर्माण झालेला भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप आणि त्या पक्षाचे संसदीय नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या डोक्यावर तुकोबारायांची पगडी ठेवण्याचा हा अजागळ प्रकार आहे. ब्राह्मणी वैदिक धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आणि त्यांचे अनुयायी यांच्याशी सतत दोन हात करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ज्या वारकरी संप्रदायाने आपल्या विठुमऊलींच्या चरणावर श्रद्धापूर्वक माथा टेकला आहे, त्या वारकरी संप्रदायाचे संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या माथ्यावरची ही पगडी. या पगडीला स्वतःचा एक सन्मान आहे, एक स्वाभिमान आहे. त्याच बरोबर ही पगडी एकाचवेळी ” मेणाहून मऊ” आणि तरीही “कठीण वज्रासही भेदण्याची” धमक ठेवते, हे या पगडीचे विशेष.
अशी ही पगडी तुकोबारायांच्याच अभंगातील “भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ।।” या ओळी धारण करून, नरेंद्रजी मोदी यांच्या माथ्यावर बसणार आहे!
भल्या मानसिकतेच्या जनसामान्यांची लंगोटीही काढून घेणाऱ्या व्यवस्थेच्या प्रमुखांच्या माथी लोकजागृतीची, सत्य आणि सत्वाची काठी हाणण्याची धमक असलेली ही प्रतिकात्मक पगडी, कोणाला द्यावी, याचे भान आणि ज्ञान बहुदा हा कार्यक्रम संयोजित आणि आयोजित करणाऱ्या मंडळींना नसावे. ते भान आणि ज्ञान मिळविण्यासाठी कार्यक्रमाच्या संयोजक आयोजकांनी तुकोबारायांच्या त्या पूर्ण अभंगाचे मनन, पठण आणि आकलन करून देणारे कीर्तन एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसमवेत बसून ऐकणे गरजेचे आहे. त्यासाठी तो पूर्ण अभंग येथे उधृत करीत आहोत.
“मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु ||
मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ ||
भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि काठी देऊं माथां || २ ||
मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ ||
अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ ||
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ ||”
ताजा कलम ::
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार देहू संस्थानने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना घालण्यात येणाऱ्या पगडीवरचे “भले तर देऊ………” हे शब्द बदलले आहेत. आता नव्याने “विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म| भेदाभेद भ्रम अमंगळ||” असे शब्द टाकले आहेत. खरे म्हणजे तुकोबारायांचे विचार आणि “अमंगळ भेदाभेदाचा भ्रम” निर्माण करूनच आपले राजकारण साधणारे भाजपाई नरेंद्रजी मोदी हे सुत्रच “अमंगळ” आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा उपद्व्याप करून देहू संस्थान तुकोबारायांच्या विचारांनाच तिलांजली देत आहेत काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे. या सगळ्या प्रकारावरून देहू संस्थानला या कार्यक्रमात मदत करणारे “इव्हेंट मॅनेजर” अयोग्य आणि चुकीचे आहेत काय, असाही प्रश्न निर्माण होतो आहे. अगर देहू संस्थान पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना आणि त्यांच्या एकूणच राजकारणाला तुकोबारायांच्या विचारांची चपराक देताहेत काय, असाही मूळ प्रश्न निर्माण होतो.
——————————————————