महापालिकेतील नवी वर्ग (की वर्ण?) व्यवस्था!

भारतीय समाजात, समाजगाडा व्यवस्थित चालावा म्हणून आणि कामांचे वाटप करता यावे म्हणून चातुर्वर्ण निर्माण करण्यात आले. मात्र, या देशातील वर्चस्ववादी ब्राह्मणांनी ही चातुर्वर्ण्य व्यवस्था भारतीय समाजाच्या बोडक्यावर घट्ट बसवून टाकली आणि आपला वर्चस्ववादी पगडा समाजमनावर थोपला. या ब्राह्मणी चातुर्वर्ण्य व्यवस्थेने जातीची एक उतरंड तयार करून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, पुढे त्या शूद्रांमध्येही अतिशूद्र अशी वर्गवारी तयार केली. या चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे माणसे ओळखता यावीत म्हणून ब्राह्मणांनी जानवे हा प्रकार अस्तित्वात आणला. त्यातही वर्गवारी करून नुसत्या गाठीचे जानवे वापरतो तो ब्राह्मण, गाठीला सोन्याचे पदक असलेला क्षत्रिय, चांदीच्या अगर रूप्याच्या पदकाने गाठ झाकलेला वैश्य आणि लोहपदक वापरणारा शूद्र अशी ओळख निर्माण करण्यात आली. अतिशूद्र आणि स्त्रियांना द्विज होण्याचा म्हणजेच जानवे घालण्याचा अधिकार नाही, अशी ही वर्ण व्यवस्था. 

ही पाच हजार वर्षांपूर्वीची व्यवस्था आता चर्चेला आणल्यामुळे बुचकाळ्यात पडल्यासारखे होईल. कारण भारतीय संविधान अस्तित्वात आल्यापासून ही चातुर्वर्ण व्यवस्था मोडकळीस आली असली तरी आणि ही व्यवस्था बंद व्हावी म्हणून संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्नातून तरतुदी करूनही वर्चस्ववादी चातुर्वर्ण व्यवस्था भारतीय समाजाच्या बोडक्यावरून अजून उतरली नाही, हे सध्याच्या समाजातील भेदभवांमुळे आणि त्या भेदभवांच्या आडून पसरवण्यात आलेल्या धर्मभेद, जातीभेद यांच्या अराजकतेमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, आता ही चर्चा करण्याचे प्रयोजन काहीसे गंमतीदार तरीही गंभीर असे आहे आणि विशेष म्हणजे या प्रयोजनाचा उगम पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरू झाला असल्याचे नुकतेच दृष्गोचर झाले आहे. 

पूर्वीच्या विविध वर्णांसाठी विविध धातूंची पदके लावलेल्या अगर नुसत्याच गाठींच्या जानव्याप्रमाणे, आपली ओळखपत्रे गळ्यात घालण्यासाठी विविध वर्गांच्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना विविध रंगांच्या फिती या महापालिकेत वापरण्यात येत आहेत. आपल्या ओळखपत्राला निळ्या रंगाच्या फिती वर्ग १ आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठी देण्यात आल्या आहेत. गडद जांभळ्या रंगाच्या फिती आपल्या ओळखपत्राला लावलेले वर्ग २ व ३ चे अधिकारी, कर्मचारी आहेत आणि वर्ग ४ च्या कर्मचारी, कामगारांसाठी गडद हिरव्या रंगाचा फिती वापरण्याचे नक्की करण्यात आले आहे. आता ही व्यवस्था म्हणजे वर्ग १, वर्ग २ व ३ आणि वर्ग ४ चे अधिकारी, कर्मचारी, कामगार लांबूनच ओळखू यावेत, असा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. 

थोडक्यात, जानव्यावरून जसे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ओळखण्याची सोय करण्याची ब्राह्मणी व्यवस्थेने सक्ती केली होती, तद्वतच पिंपरी चिंचवड महापालिकेतही विविध रंगांच्या फिती लावून ओळखपत्र वापरण्याची पद्धत अवलंबण्यात आली आहे काय, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पण मग अशा प्रकारे अधिकारी, कर्मचारी, कामगार ओळखायची पद्धत वापरायचीच असेल तर, प्रतिनियुक्तीच्या अधिकाऱ्यांसाठी एखादा रंग, आयुक्तांना आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्यांसाठी वेगवेगळे रंग, विविध राजकीय बापांच्या आश्रयाखाली असणाऱ्यांसाठी अजून वेगळे रंग आशा विविध रंगांची उधळण करण्यासही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने अनमान करू नये.

पुरातन वर्ण व्यवस्थेप्रमाणे वर्ग व्यवस्था करण्याची अक्कलहुषारी वापरल्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेचे शतशः आभार!

——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×