भाजपचे मनुवादी हिंदुत्व आणि शिवसेना!

भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी देऊन शिवसेनेचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर देवेन्द्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदी शपथ घेण्यास भाग पाडून पक्षाच्या धोरणांपुढे व्यक्ती महत्वाचा नाही, कोणीही महत्त्वाकांक्षी होऊ नये, असाही संदेश पक्षांतर्गत अतिमहात्त्वाकांक्षी लोकांना दिला आहे. या सगळ्या सत्ताबदल नाट्यामागे हिंदुत्वाची मक्तेदारी केवळ भारतीय जनता पक्षाकडेच राखण्याचा आटापिटा असल्याची बाब दृष्गोचर होते आहे. देशात हिंदुत्व आणि तेही मनुवादी हिंदुत्व केवळ भाजपकडेच आहे हे नक्की करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक असल्याने सामान्यांना जास्त भावणारे आहे आणि तेच नेमके भाजपला मोडून काढायचे आहे, हा यामागील खरा उद्देश आहे. ठाकरे कुटुंबीय आणि त्यांच्याशी प्रामाणिक असलेले शिवसैनिक सर्वसमावेशक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत. म्हणून मग आपल्या दबावाखाली अगर अंमलाखाली शिवसेना आणण्यासाठी शिवसेनेत उभी फूट पडून मोठा गट आपल्याकडे येणे ही भाजपची गरज एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे.

मात्र, शिवसेना म्हणजे केवळ विधिमंडळातील आमदार नव्हे, तर अगदी गल्लीबोळातील सर्वसामान्य माणसांपर्यंत शिवसेनेची पाळेमुळे आहेत, हे भाजपच्या आकलनापालिकडे आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे आमदार आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचेच सैनिक आहोत, असा टाहो फोडताहेत. या कंठारवात हे सरकार अगदी अडीच वर्षे टिकले तरी आणि आगोदर विधानसभा निवडणूक झाल्या तरी मते मागायला याच सर्वसमावेशक हिंदुत्व मानणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकांकडेच जायचे आहे, ही भीती सामावलेली आहे. आतापर्यंत भाजपाई शिर्षस्थ नेतृत्वाने वैदिक हिंदुत्वाची कास धरून आणि उच्चभ्रू जातींमधल्या वर्चस्ववादी हिंदुत्वाला गोंजारून देशात उचनीचतेचे आणि भेदभावाचे राजकारण केले आहे. उच्च जातींमधल्या हिंदूंचा जातीय अभिनिवेश कुरवाळून स्त्रियांसह इतर जातींना दबावाखाली ठेवण्याचे मनुवादी षडयंत्र, हाच मूळ हेतू आतापर्यंत भाजपने ठेवला आहे.

म्हणून मग शिवसेनेचे सर्वसमावेशक हिंदुत्व आणि त्याचे महाराष्ट्रातील मराठी मनांवरील गारुड संपविण्याचा हेतूने भाजपाई शिर्षस्थ नेतृत्वाने किंबहुना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेल्या विचाराने एकनाथ शिंदे यांच्या बंडाला हवा आणि रसद दिली आहे. त्यातूनच मूळ शिवसेना आणि ही तथाकथित बंडखोर शिवसेना एकमेकांत झगडतील उरलेल्याला आपण संपवू, असे नियोजन यामागे आखण्यात आले आहे. शिवाय महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना मिळणारी अतिरिक्तची सरकारी रसद तोडण्याचाही वेगळा फायदा भाजपला मिळाला आहे. आता या सर्व प्रकरणात एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय हा पुढचा प्रश्न निर्माण होतो. यावरचे सरळसोपे उत्तर म्हणजे त्याविषयी भाजपाई शिर्षस्थ नेत्यांना काहीही देणेघेणे नाही. शिवसेना फोडल्याचा जनक्षोभ निवळेपर्यंत हे सरकार टिकले तरी खूप झाले असा एकंदर होरा यामागे बांधण्यात आला आहे.

म्हणून मग शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदेंचे सरकार जास्तीतजास्त काळ टिकावे, यासाठीचे राजकीय आणि न्यायिक डावपेच लढले जातील, त्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यासाठी बदललेले विधानसभा अध्यक्ष, तेही राहुल नार्वेकरांसारखे संधीसाधू व्यक्तित्व, ज्यांना कसलीही निष्ठा, नीती नाही, उभे करण्यात आलेच आहे. अगदी गल्लीतल्या मंडळालाही तातडीची बैठक बोलावण्यासाठी बाहत्तर तास मुदत देण्याची सक्ती असतानाही विधानसभेच्या अविश्वास ठरावावर केवळ चोवीस तासांची मुदत देणाऱ्या राज्यपालांच्या पत्राला मान्यता देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रकारही करण्यात आला. त्यात पुन्हा एकनाथ शिंदेंसह सोळा फुटीर आमदारांच्या निष्काशनाचा खटला प्रलंबित असताना ठाकरे सरकारवर अविश्वासाचा ठराव आणला गेला. उद्धव ठाकरे यांनी स्वतः राजीनामा देऊन आपला सन्मान वाचवला हा भाग अलाहिदा!

आता येत्या काही काळात छत्रपती शिवशंभू, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहार सारखे जातीय ध्रुवीकरण करून भाजपाई मनुवादी हिंदुत्वाचे गोडवे गाण्यास सुरुवात झाली तर, कोणी नवल वाटून घेऊ नये. पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल गोळवलकर, हेगडेवार, नथुराम गोडसेंचा महाराष्ट्र होण्याकडे झाली तरीही कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये.

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×