सरकार आलं तरी, भाजपमध्ये “इतना सन्नाटा क्यों है भाई”?

राज्यात भाजप प्रणित शिवसेनेतील बंडखोरांची सत्ता आली. भाजपच्या केंद्रीय शिर्षस्थ नेतृत्वाच्या सहाय्याने आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेलच, याची सतत बोंब मारणाऱ्या देवेंद्र फडणवीस कंपूच्या इच्छेने हा महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातील अभूतपूर्व, मात्र विदारक सत्ताबदल झाला. मोठी सदस्यसंख्या असतानाही दुय्यम स्थान स्वीकारून भाजपने, मुख्यमंत्री होण्याची इच्छा तुंबून राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेऊन, बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची वस्त्रे बहाल केली. पक्षादेश मानून देवेंद्र फडणवीस यांनी “ताकावर तहान भागवून” उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. असे असले तरी अगदी बद्धकोष्ठ झाले अगर अतिसार झाला तरी तो जल्लोषात साजरा करणाऱ्या भाजपने हा सत्ताबदल अजिबात साजरा केला नाही. मुंबईतील भाजप मुख्यालयात महाविकास आघाडी सरकार पडल्याच्या दिवशी फडणवीसांच्या अनुपस्थितीत काही प्रमाणात आनंदोत्सव झाला, मात्र त्यानंतर भाजपच्या गोटात अक्षरशः स्मशानशांतता आहे. ही अनोखी शांतता पाहून राज्यातील समस्त भाजपाईंना शोले स्टाईल “इतना सन्नाटा क्यों है भाई?” असा प्रश विचारावासा वाटतो आहे.

कोणत्याही बाबीची इव्हेंट करणाऱ्या भाजपाईंना एव्हढ्या मोठ्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करावासा का वाटला नसावा, हे समस्त आम जनतेला पडलेले कोडे आहे. अगदी तिकडे झारखंडात एखादा सरपंच अगर पंचायत समितीचा साधा सदस्य निवडून आला तरी आमच्या पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रासात आणि गदारोळात टाकणारे भाजपाई एव्हढे शांत कसे, याचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न केला असता, काही बाबींच्या धसक्याने हा आनंदोत्सव रोखून धरण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. काय आहेत या बाबी? पहिली आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, “पुन्हा येणार” चा घोषा लावलेले देवेंद्र फडणवीस नीटसे “पुन्हा आलेच नाहीत.” जसे आले, तो प्रकार काही आनंदोत्सव साजरा करण्याच्या अजिबात लायकीचा नव्हता. देवेंद्रजींचे या वेळचे येणे म्हणजे, द्विपदवीधारकास दहावीच्या वर्गात बसविण्यासारखे आहे. त्यामुळे राज्यातील समस्त भाजपाई, ज्यांना राज्यात देवेंद्रजी शिवाय दुसरे कोणी दिसतच नाहीत आणि जे अगदी कशाचाही उत्सव करण्यात माहीर आहेत, त्यांना उत्सवाचा उत्साहच राहिलेला नाही. आता देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास भाग पाडणे म्हणजे, त्यांच्या एकंदरच चढत्या वाटचालीला खीळ घालण्याचा प्रकार आहे काय, अशी शंका राज्यातील समस्त भाजपाईंच्या मनात उद्भवली असल्यास वावगे ठरू नये. ही शंका रास्त ठरली तर, शिर्षस्थ भाजपाई नेतृत्वाला आनंदोत्सव साजरा झाला नाही, याचे दुःख नसणार. मात्र, आपल्या पदावनतीचा उत्सव साजरा होतो आहे, असे चुकून देवेंद्रजींच्या मनात आले तर, आपल्या चालत्या गाडीला खीळ बसेल, ही भीती होतीच.

कारण देवेंद्रजींना रस्त्यात आडव्या येणाऱ्या चालू गाड्यांची खीळ काढून, त्यांना मोडकळीस आणून भंगारात काढण्याची सवय आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यास अगर आनंदोत्सवाचा विचारही करण्यास भाजपाई गोटात शिरशिरी निर्माण करणारे ठरू शकते. नुकतेच भाजपाई प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात आली. त्यातील मजकुरानुसार राज्यातील समस्त भाजपाईंनी “उतू नये, मातू नये आणि घेतला वसा टाकू नये”, असे सांगून कोणत्याही प्रकारे विजय साजरा करायचा नाही, असा संदेश दिला आहे. सौम्यपणे पेढे, मिठाई वाटप वगैरे पर्यंतच आपला आनंद समस्त  भाजपाईंनी सीमित ठेवावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. त्यासाठी प्रदूषण, अपघात वगैरेंसारखी फुटकळ कारणे देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. हे चंद्रकांतदादांंचे शब्द ऐकून सर्वसामान्य जनतेची किती काळजी या मंडळींना आहे, असा विचार मनात आल्यावाचून राहणार नाही. मात्र हाच सामान्य जनतेचा विचार घरगुती स्वयंपाकाचा गॅस अकराशे रुपयांना टेकायला आला आणि पेट्रोल सव्वाशे पार जायला लागले यावर का होत नाही माहीत नाही. थोडक्यात प्रदूषण, अपघात वगैरेंपासून वाचलेली जनता महागाईने मारायची असा हा विचार दिसतो आहे.

पुन्हा मूळ विषय, आनंदोत्सव का नाही. कदाचित आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ अजून आली नाही, अगर हा सत्ताबदल आनंदोत्सव साजरा करण्याचा लायकीचा नाही, त्यामुळे समस्त भाजपाईंनी आपला वेळ, वित्त वाया घालवू नये, यापेक्षा मोठा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ते राखून ठेवावे असा काहीसा छुपा संदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे काय, यावर संशोधन करावे लागेल. शतप्रतिशत भाजप अजून येणे बाकी आहे, असा कयास यामागे बांधला जातो आहे. हा कयास खरा असेल तर, स्वतःला अजूनही शिवसैनिक म्हणविणारे फुटीर एकनाथ शिंदे यांची गच्छंती नक्की, फक्त कधी, ते नागपुराहून प्रसारित केले जाईल. त्यामुळे आनंदोत्सवाचा आपला कंड समस्त भाजपाईंनी अगदी जपून ठेवावा, असेच सुचविण्याचा उद्देश यामागे असावा, असे बोलले जात आहे.

कोणत्याही गोष्टीची “इव्हेंट” करण्याची खोड असलेल्या, आमच्या पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंना जणू “सांप सुंघ गया हो|” इतकी घनघोर शांतता सध्या शहरात आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडताच, भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या समावेशाने असलेल्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी शहर भाजपच्या अतिहुशार आणि काळाच्या पुढे एक पाऊल असलेल्या प्रसिद्धी यंत्रणेने समाजमाध्यमांद्वारे प्रसूतही करून टाकली होती. एव्हढेच नव्हे तर, “हत्तीवरून साखऱ्या वाटण्याच्या” इव्हेंटची तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे मेजचर्चेच्या (टेबल डिस्कशन) पुढे जायचे नाही, असा आतल्या गोटातील संदेश प्राप्त झाल्याने सगळे बेत रहित करण्याची नाउमेदी आणि नामुष्की पिंपरी चिंचवड शहर भाजपवर आली आहे. आता आपल्या अंगभूत आनंदोत्सवाला लगाम घातलेल्या भाजपाईंना तो कधी साजरा करण्यास मिळतो, याची वाट भाजपाई इव्हेंट मॅनेजर प्रमाणेच समस्त जनसामान्य पाहतो आहे एव्हढेच! 

———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×