राष्ट्रवादीचा विजय काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय होणे नाही!

नाना काटे हे चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पूर्ण महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत सक्रिय झाल्याशिवाय ही निवडणूक जिंकणे दुरापास्तच नाही तर अशक्य आहे. आता शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली, तर महाविकास आघाडीतील शिवसेना हा घटक सरळसरळ दोन हिश्श्यात वाटला जाईल. त्यामुळे आघाडीतील दुसरा महत्त्वाचा भाग राष्ट्रीय काँग्रेस या निवडणुकीत व्यवस्थित कामाला लावणे, राष्ट्रवादीसाठी अत्यावश्यक ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला गृहीत धरून अनुल्लेखाने मारण्याचा जाहीर कार्यक्रम केला असला तरी आता काँग्रेसकडे असे दुर्लक्ष करणे, राष्ट्रवादीला महागात जाईल एव्हढी ताकद आजमितीस काँग्रेसकडे नक्कीच आहे. गेल्या सव्वा वर्षात काँग्रेसने ज्या पद्धतीने उभारी घेऊन शहरात जनाधार मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, ते स्पृहणीय आणि अभिनंदनियच आहे. 

गेल्या सव्वा वर्षात म्हणजेच डॉ. कौलास कदम यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी इथल्या स्थानिक आणि राहदार यांच्यात ताळमेळ साधून काँगेसला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. वस्तुतः या शहरात काँग्रेसचा पारंपरिक मतदार फार मोठ्या प्रमाणात आहे. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर योग्य निर्णयक्षम नेता अगर कार्यकर्त्यांची फळी नसल्याने हा मतदार काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे, तर काही प्रमाणात शिवसेनेकडे सरकला होता. मधल्या काही काळात हा मतदार पुन्हा काँग्रेसकडे परत येण्याची शक्यता कमी झाली होती. मात्र, गेल्या सव्वा वर्षात काँग्रेसने कात टाकली असल्याचे निदर्शनास आले आहे. अर्थात यासाठी डॉ. कैलास कदम यांनी शहराध्यक्ष म्हणून घेतलेली मेहनत कारणीभूत आहे.

शेकड्याने बैठका आणि कार्यक्रम यांच्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांवर केवळ बातमीसाठी नव्हे तर खऱ्याखुऱ्या प्रश्नांवर खरीखुरी आंदोलने काँग्रेसने या सव्वा वर्षात केली आहेत. त्यामुळे शहरात काँग्रेस पुन्हा एकदा नव्याने लोकांसमोर आली आहे, असे म्हणता येईल. महत्त्वाचे म्हण्जे काँग्रेसचा पाइमपरिक मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळविण्यात डॉ. कैलास कदम नक्कीच यशस्वी झाले आहेत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे कामगार चळवळीत त्यांनी घेतलेली मेहनत पक्षबांधणीसाठी उपयोगी ठरली आहे. या शहरात भारताच्या कानाकोपऱ्यातून येऊन स्थायिक झालेला कामगार कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. हे शहर कामगार नगरी म्हणूनच नावारूपाला आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सह सर्वच पक्षांनी या शहरातील कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना दुय्यम स्थान दिले आहे. स्थानिक गाववाले आणि त्यांचे पैपाहुणे यांच्यातच गुरफटलेले राजकारण या सर्व पक्षांनी आतापर्यंत केले आहे. मात्र सामान्य मतदार जो सुमारे ऐंशी टक्के आहे, त्याबद्दल विचार करण्याची फुरसत या मंडळींना कधी मिळालीच नाही. कामगार चळवळीशी नाळ जोडलेली असल्याने कैलास कदम यांनी ही पोकळी भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे सामान्य कष्टकरी कामगारांचे आणि या शहरातील सर्वाहारांचे प्रतिनिधी म्हणून आता कैलास कदम यांच्या पुढाकाराने जोम धरू लागलेल्या राष्ट्रीय काँग्रेसकडे पाहिले जात आहे.

गाववाले आणि त्यांच्या पाहुण्यारावळ्यात अडकलेले राजकारण ही या शहराची फितरत निर्माण करण्यात धन्यता मानणाऱ्या इथल्या सर्वपक्षीय पुढाऱ्यांंना अजूनही काँग्रेसचे महत्व जाणवले नसेल, तर ती त्यांची राजकीय हाराकीरी ठरेल हे मात्र नक्की. 

——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×