डोळ्यातील पाणी आणि फुटलेले मडके?

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

परवा डोळ्यात येणाऱ्या पाण्यावरून मोठाच गदारोळ झाला. डोळ्यात पाणी आल्यावरून सध्या भाजपचे सहयोगी असलेल्या आणि स्वतःला खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे दडपून सांगणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठीच खिल्ली उडवली. नवीन पिढी तयार होईपर्यंत मी मारणार नाही, अशा शरद पवारांच्या वक्तव्यावरून ‘तुम्ही मरण्याची भाषा करू नका’ असे म्हणताना रोहित पवारांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांचा गळा दाटून आला. मात्र, अजित पवारांनी याची खिल्ली उडवत डोळ्यात पाणी काढण्यावरून रोहित पवारांना कडवट बोल सुनावले. त्याच बरोबर महायुतीच्या उमेदवार आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजितदादांच्या एका कार्यकर्त्याने एका कोपरा सभेत मडके फोडून मते मागितली. यावर देखील अनेक प्रकारे उलटसुलट चर्चा सुरू झाली. वस्तुतः  डोळ्यात पाणी येणे, हे माणूसपणाचे अगर संवेदनशील असल्याचे द्योतक आहे. तर मडके फोडणे म्हणजे सरणावर असलेल्या मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर त्याच्या मृत व्यक्तीच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे असल्याचे हिंदू संस्कृतीचे मानक आहे.  

या दोन घटना बारामती मदारसंघातील प्रचाराची पातळी आणि मानवी स्वभावातील मानवी भावना नाकारण्याची पद्धत उधृत करणाऱ्या असल्याची चर्चा आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडल्यावर ते भाजपच्या कच्छपी लागले. भाजपच्या सोबतीला जाताच अजितदादांना अचानक मोदींमधल्या विकासपुरुषाचे दर्शन झाले. मोदीच फक्त देशाचा विकास करू शकतात, याचा दृष्टांत अजितदादांना लागलीच झाला. मात्र, समस्त भाजपाई नेत्यांप्रमाणे हा दृष्टांत झालेले अजितदादा आपली संवेदनशीलता गमावून बसले. त्यांनी आणि त्यांच्याबरोबर भाजपच्या कच्छपी लागलेले त्यांचे समस्त बगलबच्चे आणि लाभधारक चेलेचपाटे सगळेच्या सगळे, ज्यांनी या सगळ्यांना जगण्याचा मार्ग दिला, त्या शरद पावरांवरच श्वान स्वभाव असल्यासारखे वर तंगडी करू लागले. निष्ठा, नीती यांना तिलांजली देऊन या समस्त मंडळींनी भाजपाई गोटात जाऊन फक्त आणि फक्त स्वहित साधले. ज्या शरद पवारांनी यांना छत दिले, त्यांच्याच मरणाची अपेक्षा करणारे हे भाजपाई झालेले समस्त “दादावादी” आपल्याच घराच्या तुळया पेटवायला लागले.

आपण आपल्याच घराच्या तुळया भाजपच्या सांगण्यावरून पेटवत आहोत आणि घर पेटले तर आपणच बेघर होऊ याचा साधा विचारही या मंडळींच्या मस्तकात आला नाही. अर्थात आपले मस्तकच भाजपाई उखळात घालणाऱ्या या दादा आणि दादावादी लोकांकडून वेगळ्या अपेक्षाही ठेवण्यात अर्थ नाही, हा भाग अलाहिदा. मात्र, स्वतःचे मडके रुपी मस्तक जमिनीवर आपटून दुसऱ्यांंना मुक्ती मिळत नाही, तर आपलाच कपाळमोक्ष होतो, हेही या मंडळींच्या लक्षात येत नाही, हे विशेष. यांचा हा स्व कपाळमोक्षाचा कार्यक्रम तीन टप्प्याच्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत पार पडलाच आहे, राहिलेले दोन टप्पे तरी यांना शहाणपणा देऊन जातील काय हा खरा प्रश्न आहे. त्यातही महत्वाचा भाग म्हणजे या दादावादी लोकांमध्ये काही संवेदना शिल्लक आहेत काय, हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे. दुर्दैव असे की अनेक डांग्याघोडे नाचवून भाजपवासी झालेल्या या मंडळींना मिळाले काय हे यांना अजूनही सांगता येत नाही. स्वत्व गमावून बसलेल्या आणि स्वहितासाठी स्वतःचेच घर पेटवायला निघालेल्या या मंडळींचा कडीपत्ता होणार हे समस्त जनांना काळात असतानाही, यांना का कळत नाही, यावर वेगळे संशोधन होणे गरजेचे आहे.

भाजपने आपल्या रणनीतीचा भाग म्हणून अजितदादांना वापरून घ्यायचे हे ठरवलेच आहे. त्यांनी अजूनही अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा दिल्यात हे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. तरीही, अजितदादांना चार, शिंदेंना बारा, रासपला एक जागा देऊन एकतीस जागा भाजपने स्वतः लढवल्या. शिंदे आणि दादांना दिलेल्या सोळा जागांपैकी किती निवडून येतील, हे चार जूनला स्पष्ट होईलच, मात्र, सध्यातरी या मंडळींची अवस्था भाजपने यांचे मडके फोडून यांच्याच डोळ्यात पाणी आणण्याचा “कार्यक्रम” केला आहे काय हा खरा संशोधनाचा विषय ठरणार आहे.

————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×