उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुचनांना वाटाण्याच्या अक्षता?
पिंपरी ( दि. ०४/०५/२०२१)
सुमारे पंचवीस कोटी खर्च करून खुल्या मैदानात दोन जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यापेक्षा तयार इमारती वापरून कमीत कमी रकमेत रुग्णांसाठी सोय करावी, या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेला बहुदा वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी गावजत्रा मैदान आणि सांगवी येथील पी डब्ल्यू डी मैदान येथे जम्बो कोविड केअर सेंटर उभे करण्याची तयारी सुरू आहे. मात्र अशा प्रकारे मैदानांवर मोठा खर्च करून कोविड सेंटर उभे करण्यापेक्षा महापालिकेच्या मोकळ्या इमारती वापराव्यात अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असल्याची माहिती नगरसेवक राहुल कलाटे यांनी दिली आहे.
भोसरी आणि चिंचवड या दोन मतदारसंघात जम्बो कोविड केअर सेंटर हवेच, या तेथील आमदारांच्या दुर्दम आग्रहाखातर पिंपरी चिंचवड महापालिकेने तशा नियोजनास सुरुवात केली आहे. भोसरी येथील गावजत्रा मैदान आणि सांगवी येथील पी डब्ल्यू डी मैदान येथे हे कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अनुषंगिक कामाच्या कमी वेळेच्या निविदा महापालिकेने मागविल्या आहेत. उद्या दि. ०५ मे ही या निविदा स्विकृतीची अंतिम तारीख आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापालिकेला दिलेल्या भेटीत मोकळ्या मैदानावर मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून काही कोटी रुपये गुंतविण्यापेक्षा महापालिकेच्या मोकळ्या इमारती वापरून बचत करावी अशी सूचना आयुक्तांना दिली आहे. मात्र या दोन मैदानावरील जम्बो कोविड सेंटरसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा रद्द केल्याची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
गतवर्षी मगर स्टेडियम वरील जम्बो कोविड केअर सेंटर पावसाळ्याचे दोन महिने बंद ठेवावे लागले होते. पावसाचे पाणी साठल्यामुळे तेथे रुग्ण ठेवणे धोकादायक झाले होते. त्यावेळी कोविडग्रस्त रुग्णांची संख्या आताच्या मनाने अगदीच नगण्य होती. मात्र, सद्य परिस्थितीत अशी व्यवस्था उभारण्यासाठी खर्च करून ती बंद ठेवणे परवडणारे नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या वॉररुम मधल्या बैठकीत स्पष्टपणे सांगितल्याची माहिती राहुल कलाटे यांनी दिली. आता पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन चिंचवड आणि भोसरीच्या आमदारांच्या दबावाला बळी पडते, की उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या रास्त सूचनांची अंमलबजावणी करते, हे पहावे लागेल असेही राहुल कलाटे यांनी “नवनायक” शी बोलताना सांगितले.
————————————