मृत्युदर कमी असतानाही स्पर्श बाबत एव्हढा आकस का?

पिंपरी  (दि.०६/०५/२०२१)

एखाद्याच्या चांगल्या कामाची वाखाणणी करण्याऐवजी, तो आपला नाही म्हणून त्याला गोत्यात आणण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे राजकारण शहराला घातक ठरणारे आहे. कोविडग्रस्त रुग्णांना खरोखरीचा दिलासा देणाऱ्या स्पर्श बाबत असलेला आकस अशाच प्रवृत्तीतून आलेला नाही ना अशी चर्चा सध्या पिंपरी चिंचवड शहरात सुरू आहे. वस्तुतः गेल्या दहा महिन्यांपासून ऑटो क्लस्टरचे कोविड केअर सेंटर चालविताना स्पर्शने केलेले काम वाखाणणी योग्य आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयाच्या एकूण कोविडग्रस्त रुग्णांचा मृत्युदर सुमारे बारा ते चौदा टक्के असताना स्पर्श संचलित ऑटो क्लस्टर कोविड सेंटरचा मृत्युदर आठ टक्के राखण्यात स्पर्शच्या टीमला यश आले आहे.

या बाबत नवनायकने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकृत माहिती देण्यास पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली. यावर काही सूत्रांकडून माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय म्हणजेच वाय सी एम, नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर कोविड सेंटर, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय आणि महापालिकेने परवानगी दिलेल्या एकशे सदतीस कोविड सेंटरमध्ये कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार कारण्यात येतात. शहरात कोविडग्रस्त रुग्णांचा मृत्युदर तीन ते पाच टक्क्यांच्या दरम्यान आहे. शहरातील ज्यादा त्रास होणाऱ्या कोविडग्रस्त रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन (Medical Management) जिकिरीचे झाल्यावर खाजगी छोट्या कोविड सेंटर मधील रुग्ण वाय सी एम, जम्बो आणि ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये हलविले जातात. त्यामुळे या तीन कोविड सेंटरचा मृत्युदर सोळा टक्केपर्यंत जातो.

अधिक चौकशी केली असता, असे निदर्शनात येते की, नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरचा मृत्युदर सगळ्यात जास्त म्हणजे सोळा ते अठरा टक्के इतका आहे. वाय सी एम रुग्णालयाचा त्या खालोखाल म्हणजे बारा, तेरा टक्के असून ऑटो क्लस्टरचा मृत्युदर आठ टक्के इतका आहे. दर आठवड्याला कोविड सेंटरच्या प्रमुखांची रुग्ण व्यवस्थापनाबाबत बैठक होते. या प्रत्येक बैठकीत स्पर्श संचालित ऑटो क्लस्टर कोविड सेंटरच्या रुग्ण व्यवस्थापनाबाबत कौतुक केले जाते. मात्र याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध करून दिली जात नाही.

शुक्रवार दि ३० एप्रिल रोजी झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेत सर्वपक्षीय गदारोळ उठवून ऑटो क्लस्टर कोविड सेंटर विरोधात धुराळा उडविण्यात आला. मात्र, या कोविड सेंटरचे काम वाखाणण्यायोग्य असल्याचे प्रशासनाकडून का सांगण्यात आले नाही, हे अनाकलनीय आहे. ऑटो क्लस्टरचे कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्शचे रुग्ण व्यावस्थापनेचे चांगले काम सभागृहात सांगण्याची जबाबदारी खरे म्हणजे महापालिका प्रशासनाने घ्यायला हवी होती. राजकीय गोंधळ घालून स्पर्शला नालायक ठरविण्याच्या राजकीय प्रयत्नाला बहुदा महापालिका प्रशासन बळी पडले असावे, अशीही चर्चा आहे. एक रुग्ण दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप स्पर्शच्या टीमवर करण्यात आला आहे. त्याबाबत पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलीस त्यांचा तपास करतीलच. त्यातून पुढे वस्तुस्थिती निदर्शनात येईलही. अर्थात हा पोलीस तपास राजकीय हस्तक्षेपाविना व्हावा ही अपेक्षा. स्पर्शच्या कोविडग्रस्त रुग्णाच्या वैद्यकीय व्यवस्थापनाची कामगिरी चांगलीच असल्याचे अनेक प्रशासकीय आणि राजकीय व्यक्ती खाजगीत कबूल करतात. यावरूनच स्पर्शच्या विरोधात उठणारा धुराळा राजकीय असल्याचे निदर्शनात येते.

—————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×