कोविड सेंटरची चालू व्यवस्था बदलणे शहरासाठी घातक ठरेल.-राजू मिसाळ

पिंपरी  (दि.०७/०५/२०२१)

शहरातील कोविडग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज गुरुवारचा आकडा अडीच हजारांचा टप्पा पार करून गेला आहे. पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आणि खाजगी कोविड सेंटरमध्ये सात हजारांच्या जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत, तर पंधरा हजारांपेक्षा जास्त रुग्ण गृह विलगिकरणात आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता महापालिकेच्या प्रशासनावर जबरदस्त ताण पडतो आहे. खाजगी कोविड सेंटरच्या गरजा भागविणे आणि महापालिकेचे कोविड सेंटर योग्य पद्धतीने चालविणे यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत कोविड सेंटरची सध्याची व्यवस्था बदलणे कोविडग्रस्त रुग्णांच्या हिताचे नाही. असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी नवनायक शी बोलताना व्यक्त केले आहे.

कोणी, कोणाबद्दल, का, कसलेआणि कशासाठी आरोप केले, हा भाग बाजूला सारून सध्या कोविडग्रस्त रुग्णांची कार्यरत व्यवस्था तशीच ठेवावी अशी विनंती आयुक्त आणि महापौरांना करणार असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले की, ज्या गुन्ह्याबाबत महापालिका सभेत चर्चा झाली, त्यावर पोलिसांनी आपली कारवाई केली आहे. आता तो सगळा प्रकार न्यायालयीन कक्षेत आहे. त्या गुन्ह्यावर दोनही बाजू ऐकून न्यायालय योग्य ती शिक्षा गुन्हेगारांना करीलच. मात्र, कोविडग्रस्त रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून आहे ती व्यवस्था बिघडवू नये. काही लोकांची नियत बिघडली आणि त्यांनी गुन्हा केला म्हणून ऑटो क्लस्टर कोविड सेंटर आणि जम्बो कोविड सेंटर या दोनही व्यवस्था बदलण्याची बाब महापौर माई ढोरे यांनी सभागृहात चर्चिली. मात्र हा प्रकार एखाद्या कर्मचाऱ्याने लाच घेतली म्हणून आयुक्तांना बेड्या ठोकणे किंवा एखादा नगरसेवक चांगला वागला नाही म्हणून महापौरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासारखे आहे. शिवाय आताच्या अवघड परिस्थितीत या दोन्ही कोविड सेंटरची संचालन व्यवस्था बदलणे रुग्ण व्यवस्थापनाच्या दृष्टीने शहराला घातक आहे.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी व्यक्त केलेले मत योग्य आणि शहर हिताचे असल्याची कबुली काही उपस्थितांनीही खाजगीत दिली. ऑटो क्लस्टर आणि जम्बो कोविड केअर सेंटरमुळे महापालिकेच्या व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या गोरगरीब कोविडग्रस्त रुग्णांना निदान वैद्यकीय सुविधा तरी मिळत आहेत. आता चालू असलेले या दोनही कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन अजून रुग्णाभिमुख आणि बिनधोक बनविणे, नवीन व्यवस्थापनाला सुरुवातीपासून पुन्हा संधी देण्यापेक्षा सोपे ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेत महापौरांनी जम्बो आणि ऑटो क्लस्टर या दोन्ही कोविड सेंटरचे व्यवस्थापन दहा दिवसांत बदलण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. या आदेशांचा फेरविचार व्हावा आणि शहरातील गोरगरीब कोविडग्रस्त रुग्णांना बिनधोक रुग्णसेवा मिळण्यासाठी योग्य ती पावले उचलली जावीत अशी सामान्य अपेक्षा शहरातील सामान्य जनतेने सर्वपक्षीय नगरसेवक, नेते आणि स्थानिक पुढाऱ्यांकडून ठेवली आहे. या सामान्य जनतेला चांगली रुग्णसेवा देऊन आश्वस्थ करायचे की त्यांचा अपेक्षाभंग करायचा हे आता या सर्व मंडळींच्या हातात आहे.

—————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×