महापालिका आणि पोलीस, धरायला गेले बाबूराव, आरोपी ठरला खाबूराव!
पिंपरी (दि.१५/०५/२०२१)
ऑटो क्लस्टर कोविड सेंटर आणि जम्बो कोविड सेंटरच्या व्यवस्थापनांचे वाभाडे काढून दोनही व्यवस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी महापालिका आमसभेत दिले. त्यावर केवळ ऑटो क्लस्टरच्या व्यवस्थापनावर महापालिकेच्या वतीने पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार पोलीस तपास करीत असून या तपासात वेगळ्याच काही बाबी निष्पन्न झाल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. ऑटो क्लस्टर आणि जम्बो कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत दाखल झालेल्या रुग्णांची माहिती घेऊन पोलीस त्या प्रत्येक रुग्णास त्यांच्या तक्रारींबद्दल माहिती विचारीत आहेत. सुमारे पस्तीस ते चाळीस टक्के रुग्णांकडून आतापर्यंत माहिती मिळविण्यात आली आहे.
जम्बो कोविड सेंटरच्या व्यवस्थापनावर तिथे दाखल रुग्णांनी अनेक आक्षेप घेतले असून रुग्ण दाखल करण्यासाठी तीस हजार ते एक लाख इतकी रक्कम घेतल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांकडील काही सूत्रांनी खाजगीत दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासात ज्या काही तक्रारी आल्या आहेत, त्या फक्त जम्बो कोविड सेंटरच्या असून ऑटो क्लस्टर कोविड सेंटरची एकही तक्रार मिळून आली नाही. एक लाख रुपये घेऊन ऑटो क्लस्टर कोविड सेंटर येथे रुग्ण दाखल केल्याच्या ज्या तक्रारीवरून हा तपास सुरू झाला, ती तक्रारही संशयास्पद असल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे. यावरून महापालिका आणि पोलीस या दोन्हीच्या कारवाईत आता धरायला गेले बाबुराव आणि आरोपी ठरला खाबूराव अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे ऑटो क्लस्टर कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाला कोणत्याही परिस्थितीत हाकलून द्यायच्या उद्देशानेच हा खटाटोप रचण्यात आला होता काय असा संशय यातून निर्माण झाला आहे.
आता प्रश्न निर्माण होतो तो हा की, ऑटो क्लस्टर कोविड सेंटरच्या व्यवस्थापनावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या पत्राचा नक्की उद्भव कोठून झाला? पोलीस आयुक्तांची कायदा सुव्यवस्था इतकी तकलादू आहे काय की, महापालिकेने कारवाई केली नाही तर ती सुव्यवस्था कोलमडून पडू शकते? या सर्व बाबी विचारात घेतल्यावर असे निदर्शनात आले आहे की, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे हातही मातीचेच आहेत आणि कोणाच्यातरी मर्जी खातर पोलीस आयुक्तांनी ते पत्र पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते. पोलीस आयुक्तांची एकूणच कार्यपद्धती चक्रावून टाकणारी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत मत ठरविताना आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेला गोळीबार आणि त्यासंबंधीचा घटनाक्रम उदाहरणादाखल वापरता येईल. आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळ्या झाडणारा तानाजी पवार ज्या ठेकेदाराचा माणूस आहे, त्या ए. जी. एन्व्हाईरो कंपनीच्या निगडी येथिल कार्यालयावर आमदारपुत्राने त्याच्या साथीदारांच्या मदतीने आदल्या दिवशी हल्ला केल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ज्यादिवशी आमदार बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला त्याच दिवशी ए. जी. एन्व्हाईरो कंपनीच्या निगडी येथिल कार्यालयावर हल्ला झाल्याची तक्रार दाखल करण्याचे काम निगडी पोलीस ठाण्यात सुरू होते. पोलीस आयुक्तांनी एका आमदारांवर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे ज्यास्त महत्त्वाचे, की एका ठेकेदाराच्या कार्यालयावर झालेल्या गोंधळाची तक्रार दाखल करून घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहणे महत्वाचे? पोलीस आयुक्त आमदार बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनास्थळी दिवसभरात एकदाही फिरकले नाहीत. मात्र, ए. जी. एन्व्हाईरो कंपनीच्या निगडी येथिल कार्यालयावर झालेल्या प्रकाराची तक्रार त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिशः उपस्थित राहून नोंदवून घेतली. थोडक्यात, एका लोकप्रतिनिधीपेक्षा त्यांना ठेकेदार महत्त्वाचा वाटला. यावरूनच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या एकंदर कार्यपद्धतीवर प्रकाश पडतो.
आता पुन्हा मूळ जम्बो आणि ऑटो क्लस्टर कोविड सेंटरच्या कारवाईबाबत. कोविडग्रस्त रुग्णांचा किमती ऐवज चोरीला जाण्याच्या अनेक घटना जम्बो कोविड सेंटरमध्ये घडल्या आहेत. त्याचबरोबर तिथले रुग्ण व्यवस्थापन आणि कार्यपद्धतीबाबतही अनेक आक्षेप नोंदविले गेले आहेत. तशातच आता पोलीस तपासात पुढे येणाऱ्या बाबींवरून अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आमसभेत महापौरांनी दिलेले आदेश आणि जम्बो कोविड सेंटरच्या एकंदर कार्यपद्धतीत असलेल्या त्रुटी यांचा विचार महापालिका आयुक्त राजेश पाटील करणार आहेत काय असा सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे. ऑटो क्लस्टर कोविड सेंटरवरील कारवाईचा पोलीस आणि राजकारण्यांकडून आलेला दबाव काही विशिष्ट हेतूने होता, हे उपरोक्त मजकुरावरून लक्षात येण्यासारखे आहे. दररोज दोन हजारांच्या आसपास नवीन कोविडग्रस्त शहरात आढळून येत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने कोविडची नवी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा हातघाईच्या वेळेला राजकारण्यांचे ऐकून उत्तम रुग्ण व्यवस्थापन असलेली ऑटो क्लस्टर कोविड सेंटरची बसलेली घडी विस्कटण्यात महापालिका आयुक्तांनी का पुढाकार घ्यावा, हे अनाकलनीय आहे. जर ऑटो क्लस्टरच्या व्यवस्थापनावर कारवाई झाली, तर मग जम्बो कोविड सेंटरच्या व्यवस्थापनावर कारवाई का नाही, त्याचबरोबर जम्बो वरील कारवाई थांबविण्यात आली असेल तर, ऑटो क्लस्टर वर कारवाईची घाई का, याचे उत्तर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना द्यावे लागेल.
–———–—-–—–––—————————–