पिंपरी चिंचवड महापालिका विचारतेय, कसे आहात आपण?

पिंपरी   (दि.१९/०५/२०२१)

“कसे आहात आपण? औषधे घेताय ना वेळेवर? काही त्रास होतोय का? तब्येतीची काही तक्रार असेल तर सांगा, नाहीतर आमच्या डॉक्टरांशी बोलत का? तुमच्या तक्रारी सांगा त्यांना, ते काही वेगळे औषध सुचवतील तुमच्यासाठी.” अशी विचारणा एखाद्या कोविडग्रस्त रुग्णाला त्याच्याच घरात वेगळे ठेवण्यात आल्यावर कोणी आवर्जून फोन करून केली, तर कसे वाटेल? आपली कोणी विचारपूस करते आहे आणि विचारपूस करणारी व्यक्ती आपली कोणीच नाही. अगदी घरच्यासारखी असलेली ही विचारपूस किती आल्हादकारक आणि दिलासादायक असते, हे कोणत्याही वर्णनापलिकडले आहे. हा सुखद अनुभव सध्या पिंपरी चिंचवड शहरातील गृह विलगिकरणात असलेले कोविडग्रस्त रुग्ण घेताहेत आणि हा अनुभव त्यांना देणारे आहेत, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या होम आयसोलेशन कोविड कॉल सेंटरचे लोक.

होम आयसोलेशन म्हणजेच गृह विलगिकरणात असलेल्या कोविडग्रस्त रुग्णांची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कॉल सेंटर तयार केले आहे. या सेंटरमधून घरी उपचार घेणाऱ्या कोविडग्रस्त रुग्णांशी रोज फोनवर बोलून त्यांची माहिती आणि औषधोपचारात काही त्रुटी तर नाहीत ना हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. तक्रारी असतील तर त्यावर उपाय सांगण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय सहाय्यही या कॉल सेंटरमधून उपलब्ध करून दिले जाते. शिवाय या उपक्रमामुळे घरी उपचार घेणारे कोविडग्रस्त रुग्ण घराबाहेर पडणार नाहीत याची खबरदारीही महापालिकेच्या वतीने आपोआपच घेतली जात आहे.

खरे म्हणजे घरीच उपचार घेणाऱ्या म्हणजेच गृह विलगिकरणात असलेल्या कोविडग्रस्त रुग्णांची अवस्था मोठी बिकट असते. घरच्यांना जवळ येऊ द्यायचे नाही, लांबून दिलेले अन्न, पाणी कोणतीही तक्रार न करता स्वीकारायचे, घरात असून नसल्यासारखे राहायचे ही एक मोठीच शिक्षा आहे. त्यातही घरात एकटाच रुग्ण असेल, तर त्याची अवस्था अजूनच बिकट असते. विचारणारे कोणी नाही, बोलायला कोणी नाही, सगळा भोवताल खायला उठलेला, अशा वेळी एखाद्याने अचानक फोन करून “कसे आहात? औषधे घेता ना वेळेवर? काही त्रास होतोय का?”असे आपुलकीने विचारले, तर वेगळाच वर्णनातीत आनंद मिळतो. सध्या पिंपरी चिंचवड महापालिका तसा आनंद या घरी राहून उपचार घेणाऱ्या कोविडग्रस्त रुग्णांना देत आहे.

या होम आयसोलेशन कोविड केअर कॉल सेंटरने अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे, रुग्णांना नवी उमेद, नवी उभारी देणारा हा उपक्रम स्पृहणीय आहेच. अशी प्रतिक्रिया एक कोविडग्रस्त रुग्णाने नवनायकशी बोलताना दिली. मात्र, काही मूलभूत सुधारणाही काही रुग्णांनी या कॉल सेंटर बाबत सुचविल्या आहेत. त्यातील सगळ्यात मोठी सूचना म्हणजे, कॉल सेंटरमधून वैद्यकीय सहाय्य देणारे डॉक्टर काही वेळा रुग्णाच्या भाषेत न बोलता इंग्रजी भाषेचा प्रयोग करतात, तर काही वेळा वैद्यकीय परिभाषेतील शब्दप्रयोग केल्याने रुग्णाच्या माहिती समजून घेण्यात अडचण निर्माण होते. त्याचबरोबर रुग्णाने एखादी शंका विचारल्यास दुसरा संपर्क क्रमांक देण्यात येतो. रुग्णाचे ऐकून घेऊन त्याच्या बोलीभाषेत त्याचे समाधान व्हावे,यासाठी अजून प्रयत्न होणे आवश्यक आहे. एकूण हा उपक्रम रुग्णांसाठी फायदेशीर आणि म्हणूनच प्रशंसनीय असल्याचे काही रुग्णांनी आवर्जून सांगितले आहे.

–––––––––––––––––––––––––––

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×