आयुक्तांना खलनायक ठरवून शहरातील भाजपाई कामगार, कष्टकऱ्यांना भडकावताहेत काय?

पिंपरी (दि. १७/०६/२०२१)

येत्या महापालिका निवडणुकीत आपले पानिपत होईल या भीतीने पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाई हवालदिल झाले आहेत. शहरवासीयांमध्ये भाजपविषयी सहानुभूती निर्माण करण्याच्या प्रयत्नात आता सर्वसामान्य कष्टकरी, कामगारांना भडकावण्याचा प्रकार भाजपाईंनी चालविलेला असून पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना खलनायक ठरविण्यात येत आहे. अशक्य असलेला कामगार, कष्टकऱ्यांना तीन हजार रुपये दिलासा निधी देण्याचा विषय महापालिका आमसभेत मंजूर करून भाजपाईंनी शहरातील कामगार, कष्टकऱ्यांना आशेला लावले. अशा प्रकारे व्यक्तिगत निधी महापालिकेला कायद्याने देता येणार नाही, हे माहीत असतानाही केवळ शहरवासीयांना भुलवण्यासाठी हा विषय मंजूर करण्यात आला. मात्र, कायद्याला बांधील असलेले महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अशा प्रकारे निधी देण्यास असमर्थता दर्शविल्यावर आयुक्त शहरातील कामगार, कष्टकऱ्यांना पैसे मिळू देत नाहीत, आम्ही तर विषय मंजूर केला असे म्हणून शहर भाजपाई आयुक्तांना खलनायक ठरवीत आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सामान्य कामगार, कष्टकऱ्यांच्या विविध संस्था, संघटनांना भरीस घालून आंदोलन करण्यासाठी रसदही पुरवीत आहेत. आयुक्तच निधी वाटपात अडथळा निर्माण करत असल्याचे चित्र उभे करून आपली गेलेली अब्रू झाकण्याचा शहर भाजपाईंचा हा प्रयत्न शहरात अराजकता निर्माण करणारा ठरत आहे.

कोरोना महामारीमुळे झालेली टाळेबंदी आणि निर्बंधांमुळे हातावर पोट असलेल्या कामगार, कष्टकऱ्यांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यात प्रामुख्याने घरकामगार, बांधकाम मजूर, रिक्षाचालक, पथारीवाले, टपरीधारक, गटई कामगार यांचा समावेश होतो. पिंपरी चिंचवड शहराच्या एकूण लोकसंख्येत सुमारे दहा टक्के असलेले हे कामगार, कष्टकरी महापालिकेच्या येत्या निवडणुकीत उपयोगी पडतील म्हणून त्यांना खोटी आशा दाखविणारा तीन हजार रुपये दिलासा निधी देण्याचा विषय महापलिकेतील सत्ताधारी भाजपाईंनी मंजूर करून घेतला. अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीला व्यक्तिगत निधी महापालिका कायद्याने देऊ शकत नाही, हे माहिती असतानाही केवळ या कामगार, कष्टकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा विषय करण्यात आल्याचे निदर्शनात आले तर, हे कामगार, कष्टकरी आपल्या अंगावर येतील या भीतीने आता विषय मंजूर करूनही महापालिका प्रशासन आणि आयुक्त या विषयाची अंमलबजावणी करीत नाहीत असे चित्र शहर भाजपाईंनी उभे केले आहे. आयुक्तांना खलनायक ठरवून कामगार कष्टकऱ्यांच्या विविध संस्था, संघटनांना आंदोलने आणि निदर्शने करण्यास भाग पाडले जात आहे. त्यासाठी काही संघटनांना रसद पुरविण्याचा मार्गही पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी भाजपाईंकडून अवलंबला जात असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापलिकेतील आपली सत्ता, होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीतही अबाधित राहावी म्हणून सत्ताधारी भाजपने शहरातील कामगार, कष्टकऱ्यांच्या भावना भडकावण्याचा हा भयानक प्रकार घडविला असल्याचेही स्पष्ट होत आहे. शहरवासीयांची सहानुभूती मिळवून आपली मते वाढविण्याच्या शहर भाजपाईंच्या या विदारक प्रकारामुळे शहरात आंदोलने, निदर्शने घडवून आणली जात आहेत. काहीही झाले तरी शहरातील हतबल झालेल्या कामगार, कष्टकऱ्यांच्या पदरात कोणताही निधी पडणार नाही, हे निश्चित झाले आहे. कामगार, कष्टकाऱ्यांच्या आंदोलन, निदर्शनांमुळे शहरात अराजकता निर्माण होईल, हेही निश्चित आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना खलनायक ठरविण्याचा आणि आपली मतांची बेरीज करण्याच्या नादात सत्ताधारी भाजपाई शहर वेठीस धरीत आहेत, असा आरोप काही जाणकार शहर भाजपवर करीत आहेत.
———————————————–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×