महापालिकेचे वाहनतळ धोरण केवळ “निर्मळ”च आहे काय? – राहुल कलाटे

पिंपरी (दि.०१/०७/२०२१)

सशुल्क वाहनतळ ही आजची गरज नाही. वाढते इंधन दर, कोरोना महामारीमुळे सोसावा लागलेला त्रास, टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे निर्माण झालेली बेरोजगारी, ठप्प झाल्यासारखा मंदावलेला व्यापार उदीम यामुळे सामान्यजन मेटाकुटीस आला आहे. अशा परिस्थितीत सशुल्क वाहनतळाचा उपद्व्याप घालून पिंपरी चिंचवड महापालिका आणि सत्ताधारी भाजप सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळीत आहे. केवळ उत्पन्न वाढविण्यासाठी हा सशुल्क वाहनतळाचा घोळ महापालिका घालीत असेल तर, यातून चवली पावली गोळा करून असे कितीसे उत्पन्न मिळणार आहे? नको त्यावेळी घेतलेला हा निर्णय कोणासाठी आणि का घेण्यात आला असावा, हे समजून घेणे आवश्यक आहे.  महापालिकेची ही सशुल्क वाहनतळाची योजना खरोखरच “निर्मळ” आहे काय, असा प्रश्न पिंपरी चिंचवड महापालिकेचे अद्यापपर्यंत शिवसेना गटनेते असलेले नगरसेवक राहुल कलाटे यांनी नवनायकशी बोलताना उपस्थित केला आहे.

शहरातील वाहनधारकांना शिस्त लागावी म्हणून सशुल्क वाहनतळ निर्माण करण्यात येत असतील, तर ते शहराच्या दृष्टीने हितकारकच आहे, असे सांगून राहुल कलाटे पुढे म्हणाले की, मात्र या निर्णयाची वेळ चुकली आहे. आगोदरच त्रस्त असलेल्या शहरवासीयांच्या वाट्याला या निर्णयामुळे अजून त्रासदी येणार आहे. एखाद्या ठेकेदाराची खळगी भरण्यासाठी हा सशुल्क वाहनतळाचा निर्णय घेण्यात आला आहे काय, हे तपासून पाहायला हवे. शहरवासीयांना त्रासदायक ठरणारे निर्णय घेण्याची मालिकाच शहर भाजपने गेल्या काही दिवसांपासून सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत आपली सत्ता असल्याने आता आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही, असा दर्प या भाजपाईंना झाला आहे. शहरातील सामान्य जनांच्या भावनेशी भाजपने खेळू नये, असा इशाराही राहुल कलाटे यांनी दिला आहे.

एकूण तेरा रस्त्यांवर सुमारे साडेचारशे ठिकाणी आणि शहरातील उड्डाणपुलाखालील आणि इतर मोकळ्या जागा मिळून दहा ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सशुल्क वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने या वाहनतळांना हिरवा कंदील दाखवला आहे. या वाहनतळांची ठिकाणे आणि क्षमता यांची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संगणकीकृत संकेतस्थळावर देण्यात आली असून लवकरच त्याजोडीने वाहन थांबवण्यास मनाई असलेल्या ठिकाणांची यादीही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. निर्मला ऑटो क्रेन सेंटर या ठेकेदारास शहरातील सर्व वाहनतळांची देखभाल, शुल्क स्वीकारणे आणि ठरविण्याची मुभा आणि पोट ठेकेदार नेमण्याची अनुमती देऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे. शहरातील एकूणच वाढती वाहन संख्या लक्षात घेऊन वाहनतळ ही नितांत आवश्यक बाब बनली आहे. मात्र हे वाहनतळ निःशुल्क असावेत, वाहनधारकांना याचा लाभ घेताना पदरमोड होऊ नये, अशी सर्वच शहरवासी, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था, संघटनांची मागणी आहे.

सध्याच्या आपात्कालीन परिस्थितीत तरी वाहनतळांची शुल्क आकारणी होऊ नये, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरवासी करीत आहेत. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि त्यांचे पदाधिकारी, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, एमआयएम एव्हढेच नाही, तर भाजपचे शहर सरचिटणीस राजू दुर्गे यांनीही सशुल्क वाहनतळांना विरोध दर्शविला आहे. यावरूनच हे सशुल्क वाहनतळ शहरवासीयांमध्ये प्रक्षोभ निर्माण करणारे ठरतील काय, अशी शक्यता नाकारता येत नाही. आजपासून म्हणजे १ जुलै २०२१ पासून सशुल्क वाहनतळांची कार्यवाही सुरु झाली असून या वाहनतळांव्यतिरिक्त इतरत्र वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांना दंड सोसावा लागणार आहे. कोरोना महामारीच्या या आपात्कालीन परिस्थितीत सशुल्क वाहनतळांचा हा अनावश्यक आणि शहरात अनागोंदी पसरविणारा निर्णय स्थगित करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरवासीयांकडून होत आहे.       ———————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×