मराठी भाषेचे कैवारी भाजपचे शहराध्यक्ष संतपीठात मराठी शाळेसाठी आग्रही का नाहीत?

नुकतेच पिंपरी चिंचवड शहर भाजपचे आमदार शहाराध्यक्ष महेशदादा लांडगे यांनी मातृभाषा मराठी आणि राष्ट्रभाषा हिंदी या दोनही भाषांचा कैवार घेऊन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एसएससी बोर्डाला धारेवर धारल्याचे प्रसिद्धी पत्रक अधिकृतरित्या प्रसिद्ध केले आहे. मात्र, एसएससी बोर्डाला धारेवर धरून मराठीचा कैवार घेणारे भाजप शहराध्यक्ष चिखलीच्या संतपीठात सीबीएसई पद्धतीच्या इंग्रजी शाळेसाठी का आग्रही आहेत, असा प्रश्न शिक्षण तज्ज्ञांकडून विचारला जात आहे. अकरावी प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रवेशपरिक्षेत मराठी आणि हिंदीचा समावेश नाही, म्हणून चिडलेले भाजप शहराध्यक्ष महेशदादा लांडगे, संतपीठासाठी गैरलागू असलेल्या सीबीएसई इंग्रजी शाळेबाबत पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि संतपीठाच्या संचालक समितीची पाठराखण करून दुतोंडी का वागत आहेत, हे आकलन क्षमतेबाहेरचे आहे.

एसएससी बोर्डाच्या अकार्यक्षम, बेजबाबदार, आणि गलथान कारभारामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. बोर्डाच्या संगणकीय संकेतस्थळाचा पुरता बोजवारा उडाला असून त्यातील तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणतात. त्याचबरोबर एसएससी बोर्डाच्या अकरावीच्या प्रवेशपरिक्षेत मराठी आणि हिंदीचा समावेश नासल्याने विद्यार्थांवर अन्याय होणार आहे, एरवी मराठीचा पुळका असणारे आघाडी सरकार, प्रवेशपरिक्षेतून मराठी वगळून मराठीची गळचेपी करीत आहे, अशी मल्लिनाथी देखील भाजपाई शहराध्यक्ष करीत आहेत. आपल्या प्रसिद्धी पत्रकात अकरावी प्रवेशपरीक्षेत गणित, सामान्य विज्ञान, विज्ञान आणि इंग्रजी भाषेचा समावेश असून त्याजोडीने मराठी आणि हिंदीचा वैकल्पिक भाषा म्हणून समावेश करावा अशी मागणी भाजप आमदार शहाराध्यक्षांनी केली आहे.

महाराष्ट्रातील संत परंपरा आणि भागवत धर्मा परंपरेत इंग्रजी भाषेला कुठेही स्थान नाही. संपूर्ण संत वाङ्मय संस्कृत, अर्धमागधी, प्राकृत आणि मराठीत आहे. काही प्रमाणात या संत वाङ्मयाचा समावेश गुरुमुखी आणि हिंदीतही आहे, मात्र अगदी थोडासा. मग संत वाङ्मय, वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माची शिकवण सामान्यांपर्यंत अगदी बालवयापासून जावी या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जगद्गुरू तुकाराम महाराज संतपीठाची शाळा, सीबीएसई पद्धतीची इंग्रजी शाळा का असा प्रश्न वस्तुतः पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष आमदार स्वतःलाच का विचारीत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. कदाचित भाजप शहराध्यक्ष आमदारांचा मराठी भाषेचा कैवार, केवळ आघाडी सरकारच्या राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दोषी धरण्यापूरताच मर्यादित असावा. आपण स्वतः संतपीठात इंग्रजी शाळा सुरू करायची आणि एसएससी बोर्डाला मात्र दूषणे द्यायची हा भाजप शहराध्यक्षांचा दुतोंडीपणा असल्याचे कोणी म्हटल्यास वावगे ठरू नये. अर्थात भाजप शहराध्यक्ष आमदार असे दुतोंडी ठरले, तर ती त्यांच्या प्रसिद्धी यंत्रणेची ढालगज आणि अक्षम्य चूक ठरणार आहे.

भाजप आमदार शहराध्यक्षांची यंत्रणा कुचकामी?

पिंपरी चिंचवड शहर भाजपची अद्ययावत प्रसिद्धी यंत्रणा आहे आणि वेगात व चपखल काम करण्यासाठी ती प्रसिद्ध देखील आहे. शहरात घडणारी कोणतीही छोटीमोठी घटना, अगदी कोणी मूत्र विसर्जित केले तरी, त्याचे श्रेय्य भाजप शहराध्यक्ष आमदारांना कसे आणि किती घेता येईल यासाठी ही प्रसिद्धी यंत्रणा अहोरात्र कार्यमग्न असते. आपल्या या कार्यमग्नतेचा आणि त्यातून शहराध्यक्ष आमदारांना मिळवून दिलेल्या श्रेय्याचा अभिमान ही यंत्रणा बाळगून आहे. मात्र सांप्रतला आमदार शहराध्यक्षांची ही यंत्रणा कुचकामी ठरत चालली आहे. या प्रसिद्धी यंत्रणेच्या वेगात आता बेजबाबदारपणा वाढला आहे. ही प्रसिद्धी यंत्रणा आपल्या यजमानांच्या तोंडी परस्पर विरोधी विधाने घालून आपल्या यजमानांना तोंडघशी पाडते आहे. अर्थात या प्रसिद्धी यंत्रणेचे यजमान, शहराध्यक्ष आमदार आणि त्यांचे चाणक्य या यंत्रणेवर इतके अवलंबून आहेत की, या यंत्रणेचा गलथान बेजबाबदारपणा सहन करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय या यजमान मंडळींकडे नाही. किंवा या यंत्रणेच्या अति आहारी जाऊन भाजप शहराध्यक्ष आमदार आणि त्यांचे चाणक्य पूर्णतः अकार्यक्षम झाले असावेत. ज्या यंत्रणेच्या भिस्तीवर अवलंबून राहून राजकारण खेळण्याची सवय या मंडळींना लागली आहे, ती यंत्रणाच अशी बेजबाबदारपणे गलथान कारभार करीत असेल, तर ऐनवेळी भाजपच्या शहरात यथेच्छ हुंदडणाऱ्या या मंडळींची गच्छंती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या शहर भाजप आमदार अध्यक्षांची अवस्था या प्रसिद्धी यंत्रणेमुळे “शिकारिका बखत, और कुत्ता हगणेकू गया” अशी होऊ नये, म्हणजे मिळवली!                                 ——————————————————–

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×