आयुक्तांच्या साफसफाईचे कौतुकच आहे, पण…..?
नियमित प्रशासकीय कार्यप्रणाली कायम राहिली तर कोणताही अनागोंदी अगर भ्रष्टाचार टाळून जनसामान्यांना योग्य प्रशासकीय कारभाराची हामी देता येते. सांप्रतला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेच्या कारभारातील अनियमितता दूर करण्याचा जणू विडाच उचलला आहे. प्रशासकीय साफसफाई कोणीतरी करण्याची नितांत आवश्यकता या महापालिकेला होतीच, आयुक्त ती करताहेत आणि कोणत्याही दखलंदाजीला भीक न घालता करताहेत, याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे. गेल्या काही दिवसांमध्ये महापालिका आयुक्तांनी अनेक धक्के देऊन या शहराच्या एकंदर कारभाराला शुचिर्भूत करण्याचा जो प्रयत्न चालविला आहे, त्यात अजूनही काही पण आणि परंतुके आहेत, हेही आयुक्तांनी आता लक्षात घेतले पाहिजे.
हे पण आणि त्यातून निर्माण होणारी परंतुके वेळीच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या लक्षात आणून देणे, हे या घाडीला आत्यंतिक आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाद्वारे ही पण, परंतुके त्यांच्या समोर मांडण्याची शक्यता तशी कमीच. कारण या पण, परंतुकांमध्ये प्रशासनाचीही काही पण, परंतुके अनुस्यूत आहेत. आयुक्तांनी केलेल्या बदल्या आणि काही ठेकेदार, सल्लागारांवर केलेल्या कारवाया ही कायद्याला धरून आणि अत्यावश्यक अशी बाब असली तरी, आयुक्त कौतुकास निश्चितपणे पात्र ठरतात, ते त्यातील पण आणि परंतुकांमुळेच.
भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेपाची सतत शक्यता असलेली बाब म्हणजे निविदा आणि तद्नुषांगिक बाबी. या निविदा प्रक्रियेची सुरुवात सल्लागार नेमण्यापासून होते. मूलतः हे सल्लागार नेमले कशासाठी जातात आणि ते नेमके काय करतात, हे एक कोडेच आहे. वस्तुतः एखाद्या अतिकुशल कामासाठी सल्लागार नेमणे यात गैर काहीच नाही, पण पिंपरी चिंचवड महापालिकेत अगदी शौचालय बांधण्यासाठी देखील सल्लागार नेमले जातात, त्यावेळी कोणाच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहात नाहीत. हे सल्लागार सरळसरळ अधिकारी, ठेकेदार आणि राजकीय आसामी यांच्यातील दुवे ठरताहेत. राजकीत वरदहस्त घेऊन ठेकेदार झालेल्या एखाद्या विशिष्ठ व्यक्तीसाठी नियमित नियम बदलून हे सल्लागार, निविदा एखाद्या व्यक्तीला मिळावी म्हणून प्रयत्न करतात, हे उघड गुपित आहे. महापालिकेची निविदा प्रक्रिया आणि ठेकेदार यांवर सखोल संशोधन केले तर, या बाबी लगेच लक्षात येतात. नियम, अटी, शर्ती का बदलायच्या याचे कोणतेही आकलनिय स्पष्टीकरण नसताना जेंव्हा त्या तशा बदलल्या जातात, तेंव्हा त्यात कोणाला अभिप्रेत धरले जाते, हे तपासणे गरजेचे आहे.
ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ यापेक्षाही गूढ असते, ते ठेकेदारांचे हितसंबंध. कोणता ठेकेदार कोणाला भागीदारी देतो अगर कोणाचा माल कोणत्या ठेकेदाराकडे जातो, हे फार मोठे गूढ आहे. आता तर एक नवीन पद्धत पिंपरी चिंचवड महापालिकेत रिवाज बनत चालली आहे, ती म्हणजे कोणत्याही ठेकेदाराच्या कागदपत्रांवर कोणताही व्यक्ती ठेकेदारी चालवतो. यातूनच मग गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर सारखे प्रकार घडून येतात. ठेकेदाराच्या बोकांडी बसून भागीदारी मिळवणे हा तर आता सर्वमान्य पायंडा झाला आहे. राजकीय आणि प्रशासकीय दबाव आणून अनेक ठेकेदार गब्बर झाले आहेत. हे हितसंबंधी ठेकेदार मग प्रशासकीय यंत्रणा तोडूनमोडून तिचे वाभाडे काढतात आणि आपल्या आणि आपल्या हितसंबंधितांच्या तिजोऱ्या भरतात, हे चक्षुर्वै सत्य आहे.
या कूळ आणि मुळासारखे गूढ हितसंबंध राखणारे ठेकेदार हुडकणे हे एक अतिकुशल कार्यकतृत्व आहेच. पण, हे शोधून त्यातील गंभीरार्थ अगर मतितार्थाचे परंतुक हुडकणे हे जादा अतिकुशल कार्य आहे. आता हे हुडकाहुडकीचे काम पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील करतील अशी अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे. ठेकेदार आणि त्यांच्या हितसंबंधितांपेक्षाही गूढ असा अजून एक प्रकार या महापालिकेत आहे, तो म्हणजे बदल्या आणि बढत्यांमधील राजकीय आणि प्रशासकीय हितसंबंध. या बदल्या, बढत्या कोणताही आणि कोणाचाही हस्तक्षेप टाळून आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता करण्याचे धारिष्ट्य पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दाखविले आहे. अर्थात आयुक्तांचे हे धारिष्ट्य कौतुकास्पद आहेच, त्यातही आयुक्तांचे विशेष कौतुक अशासाठी की, त्यांनी एकही बदली अद्यापपर्यंत तरी मागे घेतली नाही.
महापलिकेतील राजकीय आणि प्रशासकीय बाप हाताशी धरून आपलीच वर्णी लावता येईल अशी एकल पदे निर्माण करायची आणि उलट्यापालट्या मार्गाने ती मंजूर करून आणायची, ही रूढ परंपरा या महापालिकेत मूळ धरून आहे. आपले सवतेसुभे निर्माण करून आपल्याला हवे तसे आणि तेच लोक हाताखाली घ्यायचे, अशीही पद्धत या महापालिकेत सुरू झाली आहे. तर, आशा या पिंपरी चिंचवड महापालिकेत साफसफाईचे काम आयुक्त राजेश पाटील यांनी हाती घेतले आहे. पण केवळ बदल्या करून आणि एखाददुसऱ्या ठेकेदारावर अगर सल्लागारावर कारवाईचा बडगा उगारून ही साफसफाई पूर्ण होणार नाही. त्यासाठी काहीएक निश्चित धोरण अगर कार्यप्रणाली तयार करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ बदल्यांसाठी एखादी संगणकीय प्रणाली तयार करून निहित कालावधीत आणि विहित पद्धतीने या बदल्यांसाठी योग्य व्यक्तींचे चयन आपसूक व्हावे. त्यावर कोणालाही, अगदी स्वतः आयुक्तांनाही बदल करण्याची सोय असू नये. एकदा एखाद्याची बदली झाल्यावर, पुन्हा लगेच काही दिवसांनी अगर विहित कालावधीपूर्वी पुन्हा मूळ जागेवर येऊन, आलो की नाही परत, अशी शेखी मिरवण्याची संधी कोणाला मिळू नये. याच पद्धतीने नियमबाह्य पद्धतीने महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणारे सल्लागार, ठेकेदार कारवाईला घाबरले पाहिजेत, अशी परिस्थिती निर्माण होणे अगर निर्माण करणे गरजेचे आहे.
पण हे सगळे निश्चितपणे आमलात आणणे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना शक्य आहे काय? तर या प्रश्नाचे उत्तर निश्चितच होकारार्थी मिळू शकते. परंतु त्यासाठी दुर्दम इच्छाशक्तीची आणि निस्पृह, निरपेक्ष, निखालस आणि निरलस पद्धतीने हे काम करावे लागेल. शिवाय राजकीय आणि प्रशासकीय मंडळींची हेतूपुरस्सर दाखलंदाजी आणि हस्तक्षेप टाळावा लागेल. कोणत्या ठेकेदार, पुरवठादार आणि कामगार, कर्मचारी, अधिकारी यांनी कोणते, कुठे आणि कसे काम करायचे, याची निश्चित कार्यप्रणाली निर्माण झाली, तर हे सहज शक्य आहे. अर्थात कोणतेही पण आणि त्यातून निर्माण होणारी परंतुके ठरवून बेदखल करण्याची निधडी हिम्मत मात्र ठेवावी लागेल. तशी हिम्मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यात नक्कीच आहे, हे त्यांच्या आतापर्यंतच्या कार्य पद्धतीत सांप्रतला तरी दिसते आहे. ती हिम्मत पुढेही टिकून राहावी अशी अपेक्षा पिंपरी चिंचवड शहरवासीयांनी ठेवण्यास सध्यातरी हरकत नाही. ———————————————————