दुकानदारांना वेळ वाढवून मिळणार काय? उपमुख्यमंत्री आज फैसला करणार?
पिंपरी (दि.०६/०८/२०२१)
कोरोना महामारीमुळे करावी लागलेली टाळेबंदी आणि संचारबंदी व्यापाऱ्यांच्या मुळावर आली आहे.व्यापरधंदा जवळपास ठप्प झाल्यामुळे गेल्या सतरा महिन्यात सर्वच व्यापारी त्रासले आहेत. आता दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ वाढवून दिला नाही, तर व्यापारी स्वतःहून कायदा मोडतील, असे निवेदन पिंपरीतील व्यापारी संघाचे प्रमुख माजी नगरसेवक हरेश बोधानी, श्रीचंद आसवानी, रोमि संधू आणि त्यांच्या व्यापारी सहकाऱ्यांनी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले, त्यावेळी स्थायीसमिती अध्यक्ष नितीन लांडगे देखील उपस्थित होते. निवेदन देताना महापौर आणि आयुक्त यांच्यासमक्ष व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. महापौर आणि आयुक्त यांनी कोरोना आढावा बैठकीत आपण उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर व्यापाऱ्यांचे म्हणणे मांडू, मात्र व्यापाऱ्यांनी कायदा पाळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. आज शुक्रवार, ६ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन बैठकीत, कोरोनाचा आढावा घेताना वस्तुस्थितीवर चर्चा होऊन नामदार अजित पवार व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून फैसला करतील अशी आशा निर्माण झाली आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे मांडताना पिंपरीतील व्यापारी संघाचे प्रमुख हरेश बोधानी, श्रीचंद आसवानी आणि सहकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना दंडाचा भुर्दंड सोसावा लागतो आहे, अशी तक्रार केली. दुकाने सुरू ठेवण्याच्या मर्यादित वेळेमुळेच बाजारात गर्दी वाढते. वेळ वाढवली तर ग्राहक गर्दी करणार नाहीत आणि आपोआपच कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होईल,असे मतही व्यापारी प्रतिनिधींनी मांडले. त्याचबरोबर पिंपरीतील व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत महापौर आणि आयुक्तांशी चर्चा करताना, जयहिंद हायस्कुलच्या भिंतीलगत आणि तेथून काळेवाडी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृतपणे बसणाऱ्या भाजी आणि मासे विक्रेत्यांमुळे रहदारीला अडथळा आणि आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत असल्याची माहिती दिली.
सध्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या तपासणीच्या प्रमाणात तीन आणि चार टक्क्यांच्या दरम्यान असल्याने टाळेबंदी आणि संचारबंदीत अजून शिथिलता आणता येऊ शकते, अशी माहितीही व्यापाऱ्यांनी दिली. त्यावर जिल्हा नियोजनाच्या बैठकीत चर्चा होणे शक्य आहे. यापूर्वीच उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि उर्वरित जिल्हा यांचा वेगवेगळा विचार करता येऊ शकतो, असे सांगितले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कोरोना आढावा चर्चेदरम्यान निर्बंध शिथिल करता येऊ शकतात अगर कसे, यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. रुग्णसंख्येची टक्केवारी आणि मृत्युदर विचारात घेऊन नामदार अजित पवार आज व्यापाऱ्यांना दिलासा देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
व्यापाऱ्यांची मागणी आणि इतर प्रश्नांबाबत कोरोना आढावा बैठकीत चर्चा करू आणि त्यासाठी महापौर देखील प्रयत्न करतील अशी ग्वाही देऊन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी व्यापाऱ्यांनी संयम पाळावा, असे आवाहन केले आहे. व्यापाऱ्यांनी कायदा हातात घेऊन प्रशासनाला अडचणीत आणू नये, अन्यथा नाईलाजाने टाळेबंदी आणि संचारबंदीच्या कायद्यानुसार कारवाई करावी लागेल, असेही आयुक्तांनी व्यापारी प्रतिनिधींसमोर स्पष्ट केले आहे. सध्या तरी आज होणाऱ्या बैठकीत निर्बंध शिथिल होण्याची वाट पाहावी, शासन आणि प्रशासन लोकांच्या जिविताची काळजी घेते आहे, व्यापाऱ्यांनी संयम पाळून सहकार्य करावे, असेही आयुक्त म्हणाले.
—————————————————