भाजपने वारकरी संप्रदायावर गोबेल्सनीती वापरू नये, वारकरी सुज्ञ आहेत! – विलास लांडे

  • पिंपरी  (दि.०३/०७/२०२१)

विंचवाने डंख मारला तरी, त्याचा डंख सहन करून तो विंचू वाचवणारी परंपरा वारकरी संप्रदायाने अंगिकारली आहे. वनचर, वृक्षवल्लीसह संपूर्ण जगाला सगेसोयरे मानणारा वारकरी संप्रदाय लोककल्याणाचाच विचार करतो. कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्यांदा पायी वारीवर संकट आले आहे. विठुमाऊली आमच्या नसानसांत भिनलेली आहे, त्यामुळे वारीवर भाजपने आपली गोबेल्सनीती वापरून वारकऱ्यांच्या धार्मिक भावनांना भडकावू नये. जगाच्या कल्याणासाठी आपल्या विभूती देणारी संतपरंपरा असलेला वारकरी संप्रदाय महामारीचे संकट ओळखून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे वारी पूर्ण करील. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या पित्त्यांनी वारकऱ्यांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये. भाजप आणि त्यांच्या पित्त्यांनी आपली गोबेल्सनीती कितीही आणि कशीही वापरली तरी, वारकरी संप्रदाय आणि आमची विठूमाऊली लोकांना कोरोना महामारीत लोटून वारी पूर्ण करा असे म्हणणार नाही. शासकीय पद्धतीने वारी पूर्ण होईल, असे प्रतिपादन गेल्या काही पिढ्या वारीची परंपरा असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांनी केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत पायी वारी होणारच, असा आग्रह वारकरी संप्रदायाचे अग्रणी बंडातात्या कराडकर यांनी धरला होता. परंतु कोरोना महामारीचे संकट ओळखून बंडातात्यांनी आपला आग्रह सोडावा अशी विनंती त्यांना राज्य शासनाच्या वतीने करण्यासाठी पोलीस यंत्रणेने प्रयत्न केले. पोलीस यंत्रणेचे हे प्रयत्न सुरू असताना भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे तिथे पोहोचले. अर्थात आमदार लांडगे तिथे कसे पोहोचले, याचे आश्चर्य व्यक्त होत असतानाच आमदार लांडगे यांनी बंडातात्या कराडकर यांना पायी वारीचा आग्रह सोडण्याची विनंती केली आणि काही समजण्याच्या आतच बंडातात्यांनी आमदार महेशदादा लांडगे यांची विनंती मान्य करून टाकली. माझ्यामुळे वारीत गर्दी वाढणार असेल, तर मी पायी वारी करणार नाही, मात्र काही मोजक्या वारकऱ्यांना पायी वारीची अनुमती राज्य सरकारने द्यावी अशी मेख मारून बंडातात्या गाडीने रवाना झाले. दरम्यानच्या काळात आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रचार यंत्रणेने प्रसिद्धी माध्यमांद्वारे आमदारांनी कशी यशस्वीपणे मध्यस्थी करून बंडातात्यांना पायी वारी करण्याचा आग्रह सोडण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मानली, याच्या बातम्या प्रसिद्ध करून घेतल्या.

विठूमाऊलीला भेटायला जाणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानराज माऊली आणि तुकोबाराय यांच्या पालखीसमवेतची पायी वारीची परंपरा आणि सध्याचा कोरोना महामारीचा काळ याबाबत, गेल्या अनेक पिढ्या पायी वारीची परंपरा जोपासणारे वारकरी सांप्रदायिक माजी आमदार विलास लांडे यांच्याशी नवनायकने बातचीत केली. विलास लांडे म्हणाले की, विठूमाऊली ही आमची आई आहे, आपल्या लेकरांवर आलेले महामारीचे संकट दूर करण्याचे बळ आमची माऊली आम्हाला नक्कीच देईल. लोकांना महामारीच्या संकटात लोटून भक्ती करा, असा आग्रह आमची माऊली कधीच करणार नाही, हा आग्रह मानवी आहे.राज्य शासनाने वारी करू नका असे म्हटलेले नाही. केवळ कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गर्दी टाळून गावोगावच्या वारकऱ्यांना महामारीपासून वाचवण्याचा प्रयत्न म्हणून वारीवर काही बंधने घातली आहेत. ती बंधने पाळणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. शासन कोणाच्याही भक्तीच्या आड येत नाही, मात्र या गर्दीमुळे महामारीचा फैलाव झाला तर वारी आणि वारकरी दूषणाचे धनी होतील, या लोकहिताच्या भावनेतून ही बंधने आहेत. वारकरी सुज्ञपणे ही बंधने पाळतीलच, आमच्या माऊलींवर ठपका नको ही भावना प्रत्येक वारकऱ्याची आहे. सांप्रदायिक भावना भडकावून आणि गोबेल्सनीतीचा वापर करून कोणीही वारकऱ्यांना महामारीच्या संकटात लोटू नये.

सांप्रदायिक आणि धार्मिक भावना भडकावून सामान्यजनांना नदी लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष कायम करीत आला आहे, असे स्पष्ट करून माजी आमदार विलास लांडे पुढे म्हणाले की, सातत्याने जनतेला धार्मिक आणि सांप्रदायिक भानगडीत गुंतवून आपली पोळी भाजण्याची नीती भाजपने अवलंबली आहे. मंदिर, मशीद वाद असो नाहीतर देवळे उघडण्याचा आग्रह असो, भाजपचे लोक जनतेच्या भावनांशी खेळणारे राजकारण करीत आला आहे. लोककल्याणासाठी कोणताही त्याग करण्याची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय भाजपच्या या दुहीची राजकारणाला भीक घालणार नाही. त्यामुळे भाजपने वारकरी संप्रदायाच्या वारीवर आपले राजकारण करणे सोडून द्यावे. आपली वारीची परंपरा लोकहिताच्या आड येणार नाही, याची काळजी वारकरी नक्कीच घेतील.       —————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×