आयुक्तांनी आरोग्य वैद्यकीय विभागाला हक्काचा कुंकवाचा धनी मिळवून द्यावा!
कोणत्याही शहराचे आरोग्य व्यवस्थित राखले गेले, तर वैद्यकीय सेवेवर ताण पडत नाही आणि या दोनही सेवा सुरळीत असतील तर, शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखणे सोपे जाते. पिंपरी चिंचवड शहरात मात्र, आरोग्य एकीकडे, वैद्यकीय दुसरीकडे, अधिकारी तिसराच आणि पर्यावरण भरकटलेले अशी अवस्था सांप्रतला निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत अस्तित्वात असलेला आरोग्य वैद्यकीय विभाग, हक्काचा कुंकवाचा धनी नसल्यामुळे सैरभैर झाला आहे. ठाम आणि पुरुषार्थ असलेला कुंकवाचा धनी नसला की, अगदी पतिव्रता स्त्री देखील मेटाकुटीस येते, हे सनातन सत्य आहे. त्या स्त्रीने आपला संसार कितीही नेटाने आणि हिमतीने अगर हिकमतीने चालवला तरी, तिच्या पातिव्रत्याला बोल लावला जातो. असाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाचा झाला आहे. महापालिकेची बऱ्यापैकी साफसफाई करणाऱ्या आयुक्तांनी आता या विभागाला कोणीतरी “एकच” कुंकवाचा धनी प्रदान करावा, जेणेकरून त्या विभागाचे पातिव्रत्य राखणे सोपे आणि सुलभ होईल.
चिंचवडगावातील भीमनगरच्या मागच्या शेतात असलेल्या एका खोलीतील तालेरा रुग्णालय आणि एक्केचाळीस आरोग्य कर्मचारी यांना घेऊन १९७१ साली सुरू झालेला हा आरोग्य वैद्यकीय विभाग. डॉ. दासप्पा दामा, डॉ. सॅम्युअल कुकडे, डॉ. सोनटक्के, डॉ. अभंगे, डॉ. एम. पी. सोनावणे या शासनाच्या अधिकाऱ्यांनी या विभागाची संरचना केली. त्यानंतर १९८७ साली डॉ. नागकुमार कुणचगी यांच्याकडे हा विभाग आला. मात्र, तत्पूर्वी आरोग्य विभागाचे कामकाज त्यावेळचे सहायक आयुक्त रोहिदास कोंडे यांच्याकडे, डॉ. अभंगे यांनी सुपूर्द केला होता. रोहिदास कोंडे २००४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर आरोग्य विभाग पुन्हा वैद्यकीय विभागाशी जोडला गेला. डॉ. नागकुमार कुणचगी आणि डॉ. राजशेखर अय्यर यांनी या विभागाची नुसती धुराच सांभाळली नाही, तर या विभागाला एक वेगळा नावलौकिक मिळवून दिला. या दोघांनी हा विभाग समर्पकपणे आणि लोकहीतदक्ष राहून मोठा केला. बालेवाडी क्रीडा संकुलात १९९४ साली झालेल्या राष्ट्रीय खेळांचे वैद्यकीय नियोजन या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे होते आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी या विभागाने कोणतीही तक्रार न येऊ देता सांभाळली आहे.
वाद तेव्हांही होतेच, मात्र आतासारखे नाही!
डॉ. नागकुमार आणि डॉ. अय्यर यांच्यातही पदाची भांडणे होतीच, मात्र त्याची झळ या दोघांनीही सामान्य रुग्ण अगर कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. आरोग्य वैद्यकीय विभागाची सूत्रे डॉ. नागकुमार यांच्याकडे असतानाही डॉ. अय्यर कधी विभागाच्या कामकाजातून अलिप्त राहिले नाहीत अगर नागकुमारांनी त्यांना तसे राहू दिले नाही. हे दोघेही पदासाठी न्यायालयीन लढाई लढत होते. पण विभागाच्या प्रश्नांवर एकत्रित चर्चा करीत होते. अनेक खाजगी चर्चांच्या मैफलीत हे दोघेही एकत्रित सहभागी होत असत. एव्हढेच काय, तर उच्च न्यायालयात असलेल्या आपल्या दाव्याच्या सुनावणीसाठी दोघे कित्येकदा एकाच गाडीने जात असत. २०११ साली डॉ. नागकुमार कुणचगी निवृत्त झाले आणि त्यांच्यानंतर आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर विराजमान झालेले डॉ. राजशेखर अय्यर २०१२ साली निवृत्त झाले. १९७१ साली अंकुरलेला हा आरोग्य वैद्यकीय विभाग २०१२ साली सव्वीस दवाखाने, आठ रुग्णालये आणि सुमारे साडेतीन हजार आरोग्य अधिकारी, कामगार, कर्मचारी अशा वटवृक्षाच्या स्वरूपात या मंडळींनी शहराला दिला. २०१२ ते २०१४ या काळात गाळलेल्या जागा भरणे या स्वरूपात हा या विभागाचे कामकाज डॉ. आनंद जगदाळे आणि डॉ. शामराव गायकवाड यांनी सांभाळले. त्यानंतर २०१४ मध्ये डॉ. अनिल रॉय यांच्याकडे विभागाची सूत्रे आली. डॉ. पवन साळवे यांनी आपण या पदाचे हक्कदार आहोत, असा दावा केला. हा वाद आता इतका विकोपाला पोहोचला आहे, की संपूर्ण विभागाचे तीन तेरा झाले आहेत.
ही तर शेजारणींची नळावरची भांडणे!
न्यायालयीन वादाबरोबरच प्रशासकीय लढाई, विविध आयोग, राज्य शासनाकडे पत्रव्यवहार असे करीत आता हा डॉ. रॉय आणि डॉ. साळवे यांचा वाद एकमेकांची धुणी धुणे आणि उणी काढणे इथपर्यंत पोहोचला आहे. शेजारणींची सार्वजनिक नळावरची भांडणे आणि एकमेकांमधून विस्तवही जाणार नाही असा या उभयतांचा वाद यात काही विशेष फरक नाही. या वादात कोण बरोबर कोण चूक हे ठरविण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाच्या आणि प्रमुख म्हणून आयुक्तांच्या अखत्यारीतील आहे. त्यांनी तसा निवाडा करावा अगर करू नये, हा त्यांचा कार्यभाग आहे. मात्र, या वादामुळे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाचे बारा वाजले हे नक्की. आता हा विभाग टोलवाटोलवी, एकमेकांच्या पायात पाय, कुरघोड्या, अंतर्गत गटबाजी अशा प्रकारच्या प्रादूर्भावाने पुरता ग्रस्त झाला आहे. यामुळे शहराचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा यांमध्ये पुरता विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. याची झळ आता सामान्य शहरवासीयांपर्यंत पोहोचू लागली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा एकवेळ अभिमानास्पद असलेला हा विभाग आता, आरोग्य एकीकडे, वैद्यकीय दुसरीकडे आणि अधिकारी तिसराच अशा तिरपागड्यात सापडला आहे. खमक्या आणि पुरुषार्थ असलेला कोणीतरी एक कुंकवाचा धनी असावा ही इच्छा या विभागातील अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि यच्चयावत शहरवासीयांनी धरली असल्यास वावगे ठरू नये. कुंकवाचे तिरपागडे धनी असल्यावर कोणत्याही पातिव्रत्य सांभाळून संसार करणाऱ्या गर्तीची दमछाक होणार हे नक्की. त्याही पुढे जाऊन कोणीही पदराला हात घालून त्या गर्तीचे पातिव्रत्य धोक्यात आणू शकतो. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी आता या आरोग्य वैद्यकीय विभागाची इभ्रत वाचवावी. भले तर वेगळा धनी आणा, पण कुंकवाच्या एकाच धन्याच्या नावाने कुंकू लावून सुखनैव संसार करू द्या, असा टाहो फुटण्याची वाट न पाहता, आयुक्तांनी यात लक्ष घालावे, एव्हढीच अपेक्षा!
—————————————————