अजितदादा पवारांच्या कुऱ्हाडीचे दांडे, राष्ट्रवादीच्या गोतास काळ!

अजितदादा पवारांचे मिठच आळणी आहे काय असा प्रश्न सांप्रतला निर्माण झाला आहे. कार्यतत्पर, कार्यकुशल, धडाकेबाज, निर्णयक्षम असे नेतृत्व असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्तुमअकर्तुम सर्वेसर्वा नामदार अजितदादा पवार, या बाबतीत, निदान पिंपरी चिंचवड शहरात तरी, कमनशिबी ठरले आहेत. त्यांनी आजवर ज्यांना पोसले, मोठे केले, गडगंज संपत्तीचे मालक बनवले, त्या या शहरातील बहुतांश आसामी आता त्यांच्याबरोबर नाहीत. आपली राजकीय कुऱ्हाड वापरून एक घाव दोन तुकडे करणाऱ्या अजितदादांनी वापरलेले कुऱ्हाडीचे दांडे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीला तरी गोतास काळ ठरले आहेत. त्यांनी निर्माण केलेले सुभेदार, आपापल्या सुभ्यांसह पोबारा करते झाले आहेत. जे आहेत, त्यांच्यावर अजितदादांचा विश्वास नाही अगर राष्ट्रवादी काँग्रेसला बळ आणि फळ देण्याची कुवत, धडाडी अगर इच्छा त्यांच्यात नाही.

अजितदादांनीच तयार केले कुऱ्हाडीचे दांडे!

पिंपरी चिंचवड शहर एकीकडे नावारूपाला येत असतानाच आणि शहराची विकसनशीलतेकडे वाटचाल होत असतानाच, नामदार अजितदादांनी आपले विरोधक नामोहरम करण्यासाठी कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यासाठी त्यांनी स्वतःच कुऱ्हाडीचे दांडे, पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय पटलावर तयार केले. याची सुरुवात अजितदादांनी प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या अकाली निधनानंतर केली. मोरेसरांचे हनुमान म्हणून ओळखले जाणारे हनुमंत गावडे, त्यांनी आपल्या कच्छपी लावले आणि शहरात एकहाती सत्ता निर्माण केली. त्यानंतर आपले सर्व कुऱ्हाडीचे दांडे वापरून आझमभाई पानसरे यांना मावळचे पाहिले खासदार होण्यापासून दूर ठेवले. त्यावेळी गजानन बाबरांना मदत करणारे हे कुऱ्हाडीचे दांडेच, आता राष्ट्रवादीला गोतास काळ ठरले आहेत.

राष्ट्रीय काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार चंदुकाका जगताप यांना अस्मान दाखवण्यासाठी अजितदादांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांना अपक्ष उभे करून आणि जिल्ह्यातील आपली पूर्ण ताकद लावून निवडून आणले. त्यापुढे जाऊन काँगेसच्या भाऊसाहेब भोईरांना धूळ चारण्यासाठी लक्ष्मणभाऊ जगतापांना अपक्ष उभे करणारेही अजितदादाच होते. चिंचवड विधानसभेचे अपक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्याच ताकदीवर शेकाप आणि मनसेच्या पाठिंब्याने निवडणूक लढले. लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर लक्ष्मणभाऊंनी सरळ कमळ हाती घेतले. चंदुकाका जगतापांना हरवल्यानंतर झालेली कोणतीही निवडणुक लक्ष्मणभाऊ जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली नाही, हे विशेष.

हाच प्रयोग नामदार अजितदादांनी भोसरी विधानसभेतही केला. महेशदादा लांडगे, आपले मामेसासरे आणि भोसरीचे दिग्गज, विलास लांडे यांना अपक्ष निवडणूक लढवून पराभूत करू शकले, त्यात अजितदादांचा हात नव्हता, असे ठामपणे सांगण्याची सोय नाही. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत इंदापुरच्या भाषणात अजितदादांनीच विलास लांडेंना, कर काय करायचे ते, असा संदेश देऊन निवडणूक अपक्ष लढण्यास प्रवृत्त केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना आपल्या पक्षाच्या चिन्हावर मतदान करण्याची संधीच भोसरीत नाकारली. भोसरीत हा प्रकार एकदाच झाला असला तरी त्यामुळे राष्ट्रवादीचे नुकसान झाले, हे नक्की.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात तर मतदारसंघाच्या निर्मितीपासून, केवळ अजितदादा पवारांच्या राजकीय खेळीमुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होऊच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अजितदादांचे राजकीय आडाखे या शहरात चुकले आहेत काय, असा प्रश्न निर्माण होण्याइतपत हे त्यांनीच निर्माण केलेले सुभेदार आता शिरजोर झाले आहेत. या सवत्यासुभ्याच्या मालकांची हिम्मत इतकी वाढली आहे, की दस्तुरखुद्द अजितदादांच्या चिरंजिवांना पराभूत करण्याची क्षमता यांच्यात निर्माण झाली.

अजूनही अजितदादा दुर्लक्षच करताहेत काय?

आता पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. मागच्या २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. अजितदादांनीच तयार केलेले हे कुऱ्हाडीचे दांडेच त्यासाठी कारणीभूत आहेत, हे निखालस आणि सनातन सत्य अजूनही नामदार अजितदादा पवारांना उमगले नसावे काय, असा प्रश्न सांप्रतच्या वेळी पिंपरी चिंचवड शहरातील सामान्य नागरिकांना पडला आहे. अजूनही हे दांडे आपल्या उपयोगी पडतील, अशी आशा अजितदादांना असावी काय, असाही उपप्रश्न आता निर्माण होतो आहे. काही महिन्यांवर आलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता पुन्हा संपादित करण्याची स्वप्ने शहर राष्ट्रवादीला पडत असली तरी, त्यासाठी काही करताना दस्तुरखुद्द अजितदादा अगर त्यांचे शिपाई करताना दिसत नाहीत.

नामदार अजितदादा पवारांचे शहरातील हे शिपाई पुरते शेंदाड ठरले आहेत. एकमेकांवर कुरघोड्या करण्याची अजितदादांनीच लावलेली सवय, या शेंदाड शिपायांच्या इतकी अंगी बाणली आहे, की अजूनही आपण सत्ताधारी नाही, हेही त्यांना कळत नाही. किंबहुना, त्यांना ते तसे कळू नये याची सोय अजितदादांनी निर्माण केलेल्या कुऱ्हाडीचा दांडयांनी, अर्थातच, सत्ताधारी भाजपाईंनी करून ठेवली आहे. टाकलेल्या तुकड्यावर समाधान मानणाऱ्या या शेंदाड शिपायांच्या हे लक्षात येत नाही, की आपली सत्ता स्थापन करण्यात आपल्याला यश मिळाले तर, आपण इतरांना तुकडे टाकण्याच्या लायकीचे होऊ. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, अजितदादा पवार, अजूनही या शेंदाड शिपायांमध्ये जान का टाकत नाहीत, अथवा आता काही बदल करून पुन्हा नव्याने सत्ताकांक्षी सुरुवात का करीत नाहीत, हे अनाकलनीय आहे. अजितदादांचे हे दुर्लक्ष म्हणावे, की दुर्दम आशावाद यावर पिंपरी चिंचवड शहरवासी सध्यातरी संभ्रमात आहेत. शहरवासीयांचा हा संभ्रम, जो शहरातील त्यांच्याच शेंदाड शिपायांनी आणि त्यांनी अस्तित्वात आणलेल्या कुऱ्हाडीचा दांड्यांनीच निर्माण केलेला आहे, तो दूर करण्याची इच्छा अजितदादांमध्ये कधी आणि कशी निर्माण होते, याची शहरवासी वाट पाहात आहेत.

——————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×