सत्ताधारी शहर भाजपची अवस्था शेळीच्या शेपटासारखी?

नक्की काय करावे, हे न समजल्यावर काहीशी चमत्कारिक अवस्था होते. आपणच बिघडवलेल्या परिस्थितीमुळे गोत्यात आल्यावर येणारी ही अवस्था किंकर्तव्यविमूढ अशी असते. अवघड जागेचे दुखणे आणि जावई डॉक्टर, अशा परिस्थितीत दुख दाखवायचे कसे आणि इलाज व्हायचा कसा? मग माणूस आपल्या परीने काही वेडगळपणाचे उपाय शोधतो. अशीच परिस्थिती स्वहस्ते निर्माण करून पिंपरी चिंचवड महापालिकेत निर्विवाद बहुमताची सत्ता असलेले शहर भाजपाई आता उद्विग्नावस्थेत आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, शासकीय कामात अडथळ्यांची कारवाई, पक्ष सोडून जाणाऱ्यांची चिंता, या सगळ्या प्रकारामुळे विसविशीत झालेली सत्ताधारी भाजपची अवस्था, आता शेळीच्या शेपटासारखी झाली आहे. तोकड्या असलेल्या शेपटामुळे जसे शेळीला माशाही वारता येत नाहीत आणि अब्रूही झाकता येत नाही, तशी ही अवस्था!

केंद्रात आणि राज्यात निर्विवाद सत्ता असताना, पिंपरी चिंचवड शहर भाजपने अनेक लफडी कुलंगडी करून आणि सत्तेचा पुरेपूर वापर करून २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राक्षसी बहुमताची सत्ता काबीज केली. शिवाय राज्य भाजपाईंनी संपूर्ण निर्णय प्रक्रिया आणि कारभार स्थानिक नेत्यांच्या हातात दिला. मात्र, पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या सत्तेचा पुरता दुरुपयोग करून, आपल्या आणि आपले सगेसोयरे, हितसंबंधी आणि बगलबच्चे यांच्या तुंबड्या भरण्यासाठी, ही सत्तासुंदरी अक्षरशः वारांगणेसारखी वापरली. महापालिकेत सत्ता स्थापन केल्यापासून आजतागायत भ्रष्टाचारी बजबजपुरी निर्माण करून या शहराची आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची अस्मिता, गरिमा आणि नावलौकिक धुळीस मिळवून आता पाश्चातापाची पाळी या भाजपाईंनी स्वतःवर आणली आहे.

संपूर्ण सत्ता आणि निर्णय प्रक्रियेत स्वायत्तता मिळूनही शहर भाजपच्या स्थानिक नेत्यांना आपले सर्वंकष नेतृत्व राखता आले नाही. त्यामुळे शहर भाजपमध्ये या ना त्या कारणांवरून कायम दूहीचे वातावरण राहिले. जुने भाजपाई आणि सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरलेले, भाजपची झुल पांघरलेले, नवे भाजपाई यांच्यात कायम तात्विक आणि आर्थिक दुरावा राहिला. भाजपच्या झुलीत असलेल्या मात्र भाजपच्या एकंदर निष्ठा, नीती आणि नियत यांच्याशी काडीमात्र संबंध नसलेल्या या स्थानिक नेतृत्वाने सत्तेचा गैरवापर केला. हा गैरवापर करताना आपल्याला पुन्हा निवडणुकांना सामोरे जायचे आहे, याचे भान आणि जाणही या मंडळींनी ठेवली नाही. नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराचे माजी महापौर योगेश बहल आणि विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शहर भाजपाईंच्या गदळ कारभारावर टीकास्त्र सोडले. दहा, बारा प्रमुख स्थानिक नेते सोडले तर, शहर भाजपने आपल्या स्वपक्षीयांना देखील वाऱ्यावर सोडले. स्वतः सत्तासुंदरीचा यथेच्छ उपभोग घेतल्यावर, ज्यांना या स्थानिक नेत्यांनी सत्तासुंदरीच्या संगापासून दूर ठेवले, ते आता या भाजपपासून दूर जाण्याच्या मार्गावर आहेत. एव्हढेच काय, ज्यांनी सत्ता उपभोगली आणि पुढे काही मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर, आता काही ढालगज मंडळी भाजपकडे पाठ फिरवून आहेत.

सत्तेचा आणि नेतृत्वाचा आब राखता न आल्याने, आपल्या आणि आपल्या बगलबच्चांच्या ओरबाडी वृत्तीमुळे, राक्षसी बहुमताची सत्ता असूनही, या मंडळींना सर्वसमावेशक राजकारण करत आले नाही. सत्ताधारी भाजपचे दोन स्थानिक नेते, माजीआजी शहराध्यक्ष आणि आमदार, आता आपली स्वतःची गेलेली, किंबहुना स्वहस्ते मातीत घातलेली अब्रू झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आता त्यांचा हा प्रयत्न शेळीच्या शेपटासारखा तोकडा आहे. शेळीला जसे आपल्या तोकड्या शेपटाचा उपयोग होत नाही, तसेच या प्रयत्नांचे देखील आहे, माशाही वारता येत नाहीत आणि गेलेली अब्रूही झाकली जात नाही!

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×