गजानन चिंचवडेंनी शिवबंधन तोडले, नव्या समिकरणांची सुरुवात!

भाजप आणि राष्ट्रवादीत कोणकोण जाणार याची चर्चा सुरू असतानाच, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी शिवबंधन तोडून, हाती कमळ घेतले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही धक्कादायक आणि दूरगामी परिणाम करणारी घटना आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार असलेल्या श्रीरंगअप्पा बारणे यांचे उजवे हात समजले जाणारे गजानन चिंचवडे, बारणेंचे कट्टर विरोधक, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काहीही करून मावळचे खासदार व्हायचेच, या इच्छेने पछाडलेले लक्ष्मणभाऊ जगताप यांचा हात धरून भाजपाई झाले. बारणेंचा उजवा हात जगतापांकडे जातो आणि हातीचे शिवबंधन तोडून कमळधारी होतो, या घटनेला अनेक आयाम आहेत. शहरभर मोठ्या चर्चेचा विषय असलेला हा चिंचवडे यांचा भाजपप्रवेश, चिंचवड विधानसभा मतदारसंघाबरोबरच शहराच्या राजकारणाची समिकरणे बदलणारा ठरला आहे. गजानन चिंचवडे पुढे जाऊन श्रीरंगअप्पा बारणे यांची वाट तर स्वच्छ करीत नाहीत ना अशी प्रतिक्रिया या पक्षप्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात उमटू लागली आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गजानन चिंचवडे भाजपमध्ये जावेत, याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा हात धरून जावेत, यावर तुर्तास प्रतिक्रिया देण्यास खासदार बारणे यांनी टाळाटाळ केली. सांप्रतला दिल्लीमध्ये असलेल्या बारणेंनी शहरात आल्यावर बोलू असे उत्तर दिले आहे. पिंपरी चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि खासदार बारणे यांच्यामध्ये एखादा तह झाला आहे आणि त्या तहाचा एक भाग म्हणून चिंचवडे भाजपाई झाले आहेत काय, यावर बोलताना जगतापांनी सांगितले की, “एक संयमी आणि संघटनशील कार्यकर्ता म्हणून गजानन चिंचवडे यांचा शहरात नावलौकिक आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला फायदाच होईल. खासदार बारणे यांच्याबाबत कोणताही वेगळा विचार असण्याचे कारण नाही. स्वतःच्याच पायावर दगड मारून घेण्याची हौस मला अजिबात नाही.”

श्री साधू मोरया, सगळ्यांचे भले करो!

गजानन चिंचवडे हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवडगावातील शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पती आहेत. मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या सुरुवातीपासूनच्या राजकीय वाटचालीचे ते भागीदार आहेत. बारणे यांच्याच प्रयत्नातून पुणे जिल्हाप्रमुख पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. खासदार बारणे, चिंचवडेंच्या तोंडाने बोलतात,अशा शहरातील चर्चेवरून या उभयतांचे एकमेकांशी असलेले संबंध सहज लक्षात येतात. तरीही चिंचवडेंनी शिवबंधन तोडले यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, आपल्या प्रतिक्रियेत गजानन चिंचवडे सांगतात की, सहा महिन्यांपूर्वीच शिवसेना सोडण्याचे निश्चित केले होते. तशी कल्पनाही खासदार बारणे यांच्यासह पक्षातील प्रमुखांना दिली होती. आपली कोणाविषयी कसलीही तक्रार अगर वाद नाही. ते स्वतःहून शिवसेनेतून बाहेर पडले आहेत, असे सांगताना महान साधू श्री संत मोरया गोसावी, सगळ्यांचे भले करो, अशी प्रार्थनाही गजानन चिंचवडे यांनी केली आहे.

बरे झाले, शहर शिवसेनेतली घाण गेली!

पिंपरी चिंचवड शहर स्थापने नंतरच्या काही वर्षांतच या शहरात शिवसेनेचा बोलबाला निर्माण झाला आहे. मात्र, गेल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातही या शहरात शिवसेना म्हणावी तशी रुजू शकली नाही. कायम दूहीच्या राजकारणाचा शाप, पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेला भोवला आहे. या शहरातील मातब्बर शिवसैनिकांनीच, शिवसेना वाढू दिली नाही, हा इतिहास आहे. याबाबत अलाहिदा संशोधनात्मक विवेचन करण्याचा मानस ठेऊन आताही या दुहीमुळेच गजानन चिंचवडे शिवबंधन तोडते झाले आहेत, असे म्हणावे लागेल. सांप्रतला शिवसेनेची हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकी म्हणजे नऊ सदस्यसंख्या पिंपरी चिंचवड महापालिकेत आहे. त्यातही खासदार बारणे गट आणि गटनेते राहुल कलाटे गट अशी गटबाजी पिंपरी चिंचवड शहरात आजही आहे. पुणे जिल्हाप्रमुख पदाची चव न ठेवता, शिवसेनेची इभ्रत वेशीवर टांगण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भोसरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख धनंजय आल्हाट यांनी दिली आहे. गटबाजी करून शहर शिवसेना पोखरणारी ही घाण शिवसेतून बाहेर निघाली, हे एका अर्थी बरेच झाले, असे त्यांचे म्हणणे आहे. आतातरी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेतील गटबाजी शमेल काय, यावर कोणाकडेही कसलेही स्पष्टीकरण अगर उत्तर नाही. स्थानिक राजकारणात शिवसेना अगदी सुरुवातीपासून विशेष स्थान राखून आहे. मात्र, गटबाजीचा शाप काही शिवसेनेची पाठ सोडायला तयार नाही, हे विशेष!

————————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×