उधळलेल्या घोड्यांना, अजितदादा लगाम घालतील? महापालिकेचे चाळीशीत पदार्पण! (उत्तरायण)
सब घोडे, एका रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करूनही नामदार अजितदादा पवारांनी काही घोड्यांना जादाचा खुराक आणि पळण्याची जादाची संधी दिली, हेही तितकेच खरे. त्यातील काही घोड्यांना जादाचा खुराक मिळाल्यावर चौखूर उधळण्याच्या इच्छा निर्माण झाली असल्यास त्यात नवल वाटण्यासारखे काही असू नये. मात्र, लगाम अजितदादांच्या हाती राखून उधळणे शक्य नाही, म्हणून बेलगाम होण्याची संधी या घोड्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ही संधी या मंडळींना मिळाली. अजितदादांच्या पागेत जादाचा खुराक मिळवून धष्टपुष्ट झालेल्या काही घोड्यांनी सरळ पागा बदलल्या. ज्यांनी पागा बदलल्या, ते तर बेलगाम झालेच. याशिवाय अजितदादांच्याच पागेतील काही घोड्यांना नादी लावण्याचे कामही या उधळलेल्या घोड्यांनी केले. आता या सगळ्या उधळ्यामाधळ्यामुळे पिंपरी चिंचवड शहर आणि या शहराची प्रशासकीय व्यवस्था पाहणारी महानगरपालिका विकासाच्या एक वेगळ्या उंचीवर नेण्यात यशस्वी ठरलेल्या अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे, अजितदादा पवार यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे काय, असा सध्याचा कारभार या महापलिकेत आहे. चाळिशीला आल्यानंतर प्रौढत्व येते अगर काहीसा स्थिराव निर्माण होतो, असा समज आहे.
मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बाबतीत काहीसे उलट होते आहे काय, असे वाटू लागले आहे. गेल्या पाच, सात वर्षात राजकारणात उधळलेल्या घोड्यांनी जो थयथयाट केला आहे, तो या शहरातील सामान्यांच्या बोडक्यावर झाला असल्याचे, सध्याचे चित्र आहे. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात आणि वेगात विकासाच्या उंचीवर गेलेले हे शहर, आता प्रश्नांच्या आणि समस्यांच्या ओझ्याखाली आले आहे. याचे मूळ कारण म्हणजे शहर प्रशासनात, म्हणजेच महापालिकेत असलेली अनागोंदी, अराजकता. याहीपेक्षा मुळात हा विकास कोणासाठी याविषयी जाण आणि भान नसलेले धोरण. समाजातील शेवटचा माणूस सुखावतो, तो विकास, अशी एक ढोबळ कल्पना आहे. रोजचे जगणे सुकर, सुलभ, सुगम आणि सुंदर व्हावे, ही एक छोटीशी इच्छा मनी बाळगून प्रत्येक जीव जगत असतो. त्यातल्यात्यात मानवी जीवनात शक्य तेव्हढ्या सुविधा मिळाव्यात, ही जनसामान्यांची अपेक्षा असते. प्रत्येक प्रशासकीय यंत्रणा त्यासाठीच कार्यरत असते, असाही एक आपसमज आहे. या प्रशासकीय यंत्रणेचे धोरण ठरवणारी राजकीय आणि त्यातही सत्ता ज्यांच्या हातात आहे, ती मंडळी किती आणि कशी लोकहीतदक्ष आहेत, यावर पुढचा इमला अवलंबून असतो.
चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेली ही पिंपरी चिंचवड महापालिका, तिचे धोरण ठरविणारी सत्ताधारी आणि विरोधातील राजकीय मंडळी आणि ते धोरण प्रत्यक्षात उतरवणारी प्रशासकीय यंत्रणा, समान्यजनांच्या हिताचे रक्षण करते आहे काय, हा प्रश्न सांप्रतला निर्माण होतो. या शहरातील समान्यजनांच्या दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर ठामपणे नकारात्मक आहे. कारण या शहरातील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा अगदी दुर्दैवी पद्धतीने स्वाधिष्टीत आणि स्वहितदक्ष आहे. टक्केवारीचा लाभार्थींचा आपमतलबी कारभार हा या महापालिकेचा स्थायीभाव झाला आहे. कोणाचीही कोणतीही इच्छा पूर्ण करणारी कल्पित कपिला गाय, अशी उपमा असलेली ही यंत्रणा, काही ठराविक राजकीय आणि प्रशासकीय मंडळींच्या दावणीला बांधली आहे. ज्यांच्या दावणीला ही गाय आहे, ते आपल्या इच्छेप्रमाणे, या गायीच्या कासेत हात घालून आपल्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेव्हढी, ही गाय दुहून घेत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या वाट्याला या कपिलेचे शेणही येऊ नये, यासाठी सगळीच्या सगळी यंत्रणा कार्यरत आहे. काही तुटपुंजी आणि तोंडदेखली मंडळी सोडली तर प्रत्येकाला या कपिलेच्या कासेत हात घालण्याची आस आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची ही अवस्था सुधारणे कितपत शक्य आहे, याचा विचार केला तर अजूनही सकारात्मक, होय, असे उत्तर आहे. मात्र, ज्यांचे दुर्लक्ष ही परिस्थिती बिघडण्यास कारणीभूत आहे, त्यांनीच आता लक्षपूर्वक ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. जादाचा खुराक आणि शर्यतीत पुढे राहण्याची जादाची संधी ज्या नामदार अजितदादा पवारांनी, ज्या घोड्यांना मिळवून दिली, त्या घोड्यांना आता त्यांनीच लगाम घालणे आवश्यक आहे. जादाची संधी मिळाल्यामुळे पुष्टावलेल्या, किंबहुना बेलगाम झालेल्या या घोड्यांना काबूत आणणे आणि पुन्हा नव्याने घडी बसवणे यासाठी अजितदादांनाच प्रयत्न करावे लागतील. यातील काही त्यांच्या पागेतून पोबारा केलेले, तर काही त्यांच्या पागेतही बेलगाम झालेले घोडे आहेत. त्याहीपेक्षा विदारक म्हणजे त्यात काही खेचरेही आहेत, ज्यांना अजितदादांनीच अबलख घोडे म्हणून बाजारात आणले आहे. आता हे खेचरे आणि घोडे शहरावर दुगाण्या झाडत आहेत. आतातरी अजितदादा, या सर्वांना लगाम घालतील काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यासाठी कसे आणि काय करावे लागेल, याची जाण अजितदादांना नक्कीच आहे. त्यांनी त्यासाठी ठाम आणि स्पष्ट धोरण ठरविणे निश्चितपणे अपेक्षित आहे.
——————————————————–