महापालिकेचे चाळीशीत पदार्पण! (भाग २)

शहर म्हणून पिंपरी चिंचवड अस्तित्वात आले, ते हवेली विधानसभा मतदारसंघाचा एक भाग म्हणून. राज्य शासनाने हवेलीचे तत्कालीन आमदार अण्णासाहेब मगर यांना शासन नियुक्त नगराध्यक्ष म्हणून नेमले आणि त्याचबरोबर चिंचवड, पिंपरी, भोसरी, आकुर्डी-निगडीच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना देखील नगरपालिकेचे सदस्य म्हणून नियुक्त केले. गावकीच्या राजकारणात अण्णासाहेबांचा बराच वचक आणि आदरयुक्त धाक होता. त्यांनी कधी गोडीत, तर कधी धाक दाखवून शहराचा विकास सुरू केला. स्थानिकांना शहरासाठी शाळा, दवाखाने, रस्ते, संडास, पाणी आणि सांडपाणी योजना, अशा विकासकामांसाठी जमिनी देण्यास भाग पाडले. त्यासाठी आमिष म्हणून गाववाली पोरं नोकरीला घेतली आणि शहर म्हणून पिंपरी चिंचवड ला चेहरा प्रदान केला. शहराचा पहिला विकास आराखडा १९७६ साली तयार झाला. मात्र, शासन दरबारी तो विकास आराखडा तत्वतः मान्यतेवरच अडकून राहिला.

पिंपरी चिंचवड नवनगरपालिकेची पहिली निवडणूक १९७८ साली झाली. समाजवादी विचारसरणीचा बऱ्यापैकी बोलबाला असल्याने, त्यावेळी सरळ निवडणुकीने नगराध्यक्ष म्हणून डॉ. श्रीपाद श्रीधर घारे निवडून आले. त्यांच्याबरोबरीने जनसंघ, काँग्रेस, समाजवादी पक्ष, यांचे सदस्य होते. नुकत्याच शहरात उदयाला आलेल्या शिवसेनेचे गजानन बाबर हे देखील सदस्य होते. आझमभाई पानसरे यांचे वडील फकिरभाई पानसरे, विलास लांडे यांचे वडील विठोबा लांडे, मामासाहेब पिंपळे, आर. एस. कुमार, धनराज ओछाणी, चेतनदास मेवाणी, शहाजी मास्तर वाघेरे, एचए चे कामगार विजय जाधव, कृष्णा शंकर तथा तात्या कदम, धोंडूतात्या चिंचवडे, शंकरलाल मुथा, शांताबाई सातव, डॉ. गीता आफळे त्यांपैकी काही महत्त्वाची नावे.

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार असलेली ही मंडळी, काहीतरी चांगले आणि वेगळे करण्याच्या इर्षेने झपाटलेली होती. टक्केवारी आणि ठेकेदारीची लागण नसलेल्या या मंडळींनी या शहराला नाव दिले, चेहरा दिला. अण्णासाहेब मगर यांचे निर्विवाद नेतृत्व आणि शहरासाठी काहीतरी करण्याची, या मंडळींची इच्छा, शहर विकासाला कारणीभूत ठरली. विकासाचा पाया रोवला जात असतानाच नवनगरपालिका बरखास्त करून पिंपरी चिंचवड महापालिका १९८२ ला अस्तित्वात आली. हरनाम सिंग हे सनदी अधिकारी महापालिकेचे प्रशासक म्हणून काम करू लागले. त्यांनी पिंपरी चिंचवड शहराला हरित शहर ही उपाधी मिळवून दिली. पिंपरी चिंचवड शहराच्या मधून जाणारा जुना मुंबई पुणे रस्ता, पुणे नाशिक रस्ता, दुर्गादेवी टेकडी, औंध रस्ता हा हिरवाईने नटलेला भाग त्यांनी शहराला प्रदान केला. लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण करून त्यांनी ही हिरवाई जोपासली, वाढविली. त्यानंतर आलेले सु. पू. राजे यांच्या अधिपत्याखाली पिंपरी चिंचवड महापालिकेची पहिली निवडणूक १९८६ साली झाली.

खेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार प्रा. रामकृष्ण मोरे, एस काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या प्रमुख प्रतिद्वंद्वींमध्ये झालेल्या या निवडणुकीत शहराचा कार्यभार काँग्रेसच्या म्हणजेच प्रा. रामकृष्ण मोरेसरांच्या ताब्यात आला. काँग्रेसचे सर्वसमावेशक धोरण मोरेसरांनी या शहरात शब्दशः राबविले. १९८६ साली एस काँग्रेसचे, काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे, काँग्रेसची निर्विवाद सत्ता या शहरात होती. या निर्विवाद सत्तेचा वापर करून अण्णासाहेब मगरांनी रचलेल्या शहर विकासाच्या पायावर, मोरेसरांनी विकासाची इमारत रचली. झपाट्याने वाढणाऱ्या शहराची गरज लक्षात घेऊन अनेक मोठे आणि लोकहिताचे प्रकल्प उभे राहिले. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, सध्याचे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पवना नदीवरील पूल, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण योजना, ओटास्कीम, भाटनगर इथले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, महापलिकेच्या चतुर्थ श्रेणी कामगारांसाठी गृहप्रकल्प, अनेक शाळा इमारती, महापालिकेच्या रोपवाटिका, प्राणी संग्रहालय, फुलपाखरू उद्यान, गुलाबपुष्प उद्यानासह अनेक उद्याने, क्रीडांगणे, आदी विकासकामे करून या शहराला नवा आयाम देण्याचा प्रयत्न मोरेसरांच्या नेतृत्वात झाला.

शहराला विकासाच्या उंचीवर नेतानाच, सर्वसमावेशक राजकारण आणि समाजकारणाची बैठक मोरेसरांनी या शहराला दिली. कोणतेही आरक्षण नसताना हनुमंत भोसले यांना शहराचे प्रथम उपमहापौर पद मिळू शकले, त्यानंतर मंगला जाधव, विश्रांती पाडाळे या मागासवर्गीय महिलांना उपमहापौर पद, कवीचंद भाट यांना महापौर पद असे सामाजिक अभिसरणाचे निर्णय मोरेसरांनी घेतले. समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा हिस्सा देण्याचा हा प्रयत्न करतानाच राजकीय विरोधक असलेल्या भाजप शिवसेनेच्या मंडळींनाही विकासात सामावून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला.

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात अजितदादा पवार यांचा समावेश झाल्यानंतर, पवार, मोरे या द्वयींनी समाजकारण आणि राजकारण यांचा ताळमेळ घालून शहराच्या विकासाचा चढता आलेख ठेवला. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर वाली नसलेले काँग्रेसी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आधीन झाले. अजितदादा पवारांनी महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली. मात्र, खमक्या बाप असल्याने, पिंपरी चिंचवड महापालिकेचे “सब घोडे” एक रेषेत धावत होते. या सर्व वारूंना लगाम घालून समाजकारणाचे राजकारण करून या शहराच्या विकासाचा कळस अजितदादांनी आपल्या खमक्या नेतृत्वाने गाठला. त्यातही काही घोड्यांना थोडी जादा “खुराक आणि धावण्याची जादाची संधी” मिळाली, हा भाग अलाहिदा! मात्र, अजितदादांनी या सर्व घोड्यांना रेष मोडू दिली नाही अगर प्रमाणापेक्षा जास्त उधळू दिले नाही. हे विशेष!

——–—————––—————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×