भाजपाच्या माजीआजी शहाराध्यक्षांनी पैदा केलेला विकास, कोणाच्या अंगणात खेळतोय?

शहरात भाजपच्या माजीआजी शहाराध्यक्षांनी आपल्या मार्च२०१७ पासूनच्या सत्ताकाळात विकासाची जास्त पैदावार केल्याचा दावा, पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी नुकताच प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. मात्र, भाजपाई शहराध्यक्ष आमदारांनी जो विकास पैदा केल्याचा दावा केला आहे, तो नक्की कोणाच्या अंगणात खेळतो आहे, याबाबत पिंपरी चिंचवड शहरवासी पुरत्या संभ्रमात आहेत. भोसरी आणि चिंचवडचे भाजपाई आमदार आणि आजीमाजी शहराध्यक्ष यांनी पैदा केलेला हा विकास, अगदी प्रत्येक नाही तरी निदान पन्नास टक्के शहरवासीयांच्या अंगणात खेळता, बागडता असावा, असा कयास आहे. मात्र, कोणत्याही शहरवासीयाला आपल्या अंगणात विकास दिसला नाही, हेही चक्षुर्वै सत्य आहे. मग हा विकास नक्की कोठे खेळतोय? कोणाच्या अंगणात बागडतोय? कोणाचे डोळे हा विकास आपल्या अंगणात बागडतो, खेळतो आहे, हे पाहून सुखावताहेत? आता भाजपाई शहराध्यक्ष आमदारांनी पैदा केल्याचा दावा केलेला हा विकास कोणाच्या अंगणातल्या कुंपणात अडवून ठेवला आहे, हा प्रश्न शहरवासी विचारताहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांनी गेल्या शनिवार, रविवार शहराचा दौरा केला. शहराच्या भाजपाई सत्ताकाळातील कामकाजाबाबत टिप्पणी करताना, भाजपच्या दोनही आमदारांनी दुकाने नव्हे, तर मॉल उघडलेत, अशा आशयाचे भाष्य केले. तत्पर प्रसिद्धी यंत्रणा असलेल्या पिंपरी चिंचवड भाजपाई शहाराध्यक्षांनी, लगोलग आपले म्हणणे, प्रसिद्धी पत्रकाद्वारे, प्रसिद्धी माध्यमांकडे पाठविले. ते प्रसिद्धी पत्रक असे म्हणते, “शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही, असे आ. लांडगे म्हणाले. भाजपच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघे शहर विकासासाठी कटिबद्ध आहोत. माननीय शरद पवारसाहेबांच्या टीकेला उत्तर देण्य़ाइतका मी मोठा नाही. पण, भाजपच्या कार्यकाळाआधी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहराचा जेवढा विकास झाला नाही, तेवढा आम्ही दोघांनी मिळून गेल्या साडेचार वर्षात करून दाखवला आहे. त्याबाबत कोणाच्या मनात शंका असेल, तर त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी, त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत.”

आता पिंपरी चिंचवड शहरवासियांसमोर प्रश्न निर्माण झाला, तो असा की, भाजपाई शहाराध्यक्षांनी दावा केलेला विकास कुठे आहे? गेल्या छपन्न महिन्यात एकही नवा प्रकल्प शहरात पूर्ण तर सोडाच, सुरूही झाला नाही. जे प्रकल्प पूर्ण झाले आणि भाजपाई सत्ताकाळात वापरात आले, ते सगळे मार्च २०१७ च्या पूर्वी, म्हणजेच राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील आहेत. गेली चार वर्षे सुरू असलेला स्मार्ट सिटी प्रकल्प शहरवासीयांच्या घशात अडकलेले हाडुक झाला आहे. त्या प्रकल्पाचे नक्की काय आणि कसे कामकाज चालू आहे, याचा इतिहास, भूगोल महापालिका आयुक्तांवर झालेल्या काळिखमय प्रयोगातून स्पष्ट झालं आहे. घनकचरा व्यवस्थापन, केवळ टक्केवारीपुरते उरले आहे. यांत्रिक सफाई कोणाला द्यायची, यावर सत्ताधारी भाजपमध्ये कलगीतुरा चालू आहे. बंद नळ योजना अजूनही बंदच आहे. नदी सुधार प्रकल्पात, कोणाची सुधारणा करायची, यावर वादंग आहेत. ठेकेदारी आणि टक्केवारीची गणिते आणि समिकरणे जुळवण्यात महापलिकेतील राजकीय धुरीण मश्गुल आहेत. अनधिकृत फलक काढण्यापासून अगदी भटक्या कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यापर्यंतचे ठेके कोणाकडे आणि का आहेत, हे अनाकलनीय आहे. अजूनही खोटी कागदपत्रे दाखल करून ठेका आणि पुरवठ्याचे आदेश मिळवणारे लोक सापडत नाहीत. कचरा विरहित आणि कचराकुंडी विरहित शहर करण्याच्या नादात, कचरा उचलण्याची बोंब सुरूच आहे. कोट्यावधींची रक्कम खर्च होऊनही कचऱ्यातून इंधन आणि खत निर्मिती किती झाली, यावर प्रश्नचिन्हच आहे.

हा सगळा प्रकार पाहता, पिंपरी चिंचवडच्या आजीमाजी भाजपाई शहराध्यक्ष आमदारांनी केलेली विकासाची पैदावार कोठे आहे, याची विचारणा झाली तर, ते वावगे ठरू नये. हा विकास ठेकेदारी आणि टक्केवारीच्या रुपात कोणाच्या अंगणात बंदिस्त स्वरूपात खेळतो, बागडतो आहे, हाही प्रश्न अनाठायी नाही. कारण शहरवासीयांना या भाजपाई सत्ताकाळात आपले अंगण विकासाच्या खेळण्या, बागडण्याने अगर किलकाऱ्यांनी समृद्ध असल्याचे काही दिसले नाही. मग, हा विकास नक्की कोठे आहे, यावर बारकाईने संशोधन केले असता, असे निदर्शनात येते, की पिंपरी चिंचवड शहरात भाजपाई शहाराध्यक्षांनी सांगितलेली विकासाची पैदावार, सांप्रतला या माजीआजी शहाराध्यक्षांनी निर्माण केलेल्या पिलावळीकडे, बगलबच्च्यांकडे, भाच्या पुतण्यांकडे, नातेवाईकांकडे, सगेसोयऱ्यांकडे सुखनैव नांदते आहे. शहरवासीयांना या विकासाचे सुख मिळणे त्यामुळे तसे दुरापास्तच आहे.

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×