किसका साथ, किसका विकास, किसपर करे विश्वास?

आमचा कारभार स्थानिक पातळीवरच चालतो, आम्हाला वरून आदेश घ्यावे लागत नाहीत, असे वक्तव्य करून, पिंपरी चिंचवड भाजपाई शहराध्यक्ष यांनी आपल्या कार्यपद्धतीचे नुकतेच गोडवे गायले. हे गोडवे गात असताना त्यामुळेच “आम्ही” म्हणजे भाजप शहराचा विकास करू शकलो, अशी पुस्तीही जोडण्यास ते विसरले नाहीत. भाजपने या पिंपरी चिंचवड शहराचा विकास केला, की आणखी काही केले, हा खरे म्हणजे एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील गेल्या छपन्न महिने आणि वर काही दिवसांच्या भाजपाई सत्ताकाळाचा यासाठी लेखाजोखा मांडणे, एक नितांत आवश्यक बाब झाली आहे. भाजपच्या या सत्ताकाळात शहराचा विकास झाला की भाजपाई स्थानिक प्रमुख, त्यांचे हितसंबंधी, सगेसोयरे, बगलबच्चे यांचा विकास झाला, हे आता बारकाईने पाहावे लागेल.

पिंपरी चिंचवड महापालिकेत मार्च २०१७ मध्ये भाजपची सत्ता आली आणि महापालिकेच्या कारभारात अनागोंदी सुरू झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शहरातील कचरा गोळा करणे, संडास धुणे, इथपासून मोठा पूल बांधणे, पुतळा उभारण्यापर्यंत, प्रत्येक ठेक्यात आपला हिस्सा राखण्याची पद्धत सत्ताधारी भाजपाईंनी सुरू केली. भ्रष्टाचाराच्या नवनव्या पद्धती विकसित करून महापालिकेत भ्रष्टाचाराची बजबजपुरी निर्माण केली. पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रत्येक ठेक्यात आपली माणसे घुसवली. आपले सगेसोयरे, नातेवाईक, बगलबच्चे यांच्या सहभागाशिवाय एकही ठेका वाया जाऊ दिला नाही. काही वेळा तर ठेकेदारांच्या कागदपत्रांवर स्वतःच ठेके घेतले. या सगळ्या प्रकारावर वेळोवेळी शहरात चर्चा झाली. काही प्रकरणे पटलावर आली. मात्र, ती दाबून टाकण्यात अगर आपले नाव येईपर्यंतची चौकशी थांबविण्यात हे सत्ताधारी भाजपाई यशस्वी झाले आहेत.

टक्केवारी आणि हिस्सेदारीच्या या गणितात शहरातील भाजपाई आता पुरते कार्यकुशल झाले आहेत. ही कार्यकुशलता संपादित करता यावी म्हणून कोणाच्याही हस्तक्षेपाशिवायचा कारभार ही शहरातील यच्चयावत कारभाऱ्यांची गरज होती. यांच्या सुदैवाने राज्य पातळीवरील अगर कोणत्याही बड्या भाजप नेत्यांनी या शहराच्या कारभारावर अंकुश ठेवला नाही. त्यामुळे शहरात निरंकुश राक्षसी सत्ता आणि मनमानी कारभाराची परवानगी पिंपरी चिंचवड शहर भाजपाईंना मिळाली. याचा पुरता वापर करून शहर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपले बस्तान बसविले. टक्केवारीच्या समिकरणात आपली मंडळी समाविष्ट करण्याची संधी साधून महापलिकेच्या एकंदर कारभाराला पूर्णतः भ्रष्टाचारी लागण लावली.

पिंपरी चिंचवड शहराच्या स्थानिक नेत्यांना अशी खुली छूट देण्यामागे राज्य पातळीवरील भाजप नेत्यांचा मनसुभा केवळ पिंपरी चिंचवड महापालिकेवर आपला झेंडा रोवण्याएव्हढाच होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसची पंधरा वर्षाची संपूर्ण शहरातील सत्ता मोडून काढण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीच्याच महत्त्वाकांक्षी लोकांना फोडून पक्षात घेतले. आता जे स्थानिक नेते खांद्यावर भाजपचा झेंडा घेऊन शहराचा कारभार करताहेत, ते काही दोनचार डोकी सोडली तर सर्वच मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. मात्र, या मंडळींना राष्ट्रवादीत असताना नामदार अजितदादा पवार यांच्या अधिपत्याखाली काम करावे लागत होते. त्यामुळे मनमानी करण्याची कोणतीही संधी या मंडळींना उपलब्ध नव्हती. नेमके याच बाबीचा घोडा करून भाजपने स्थानिकांच्या हाती कारभार सोपवून पिंपरी चिंचवड महापालिकेचे मैदान मारले. आता निरंकुश सत्ता आणि मनमानी कारभाराची शाश्वती घेऊन राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या या मंडळींचा कारभार सुरू झाला.

घोषवाक्य आणि घोषणा देण्यात विशेष कौशल्य असलेल्या भाजपाईंनी पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापन केल्यावर “सबका साथ, सबका विकास” असे ब्रीदवाक्य पिंपरी चिंचवड शहरवासीयांना दिले. मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या या स्थानिक मंडळींनी स्वतःचा, स्वतःच्या नातेवाईक, सगेसोयरे, बगलबच्चे यांचा पूर्ण “विकास” साधून, एकमेकांना “साथ” दिली. शहराचा विकास आणि शहरवासीयांचा साथ देण्यापेक्षा या मंडळींनी आपमतलबी राजकारण सुरू केले. मग या घोषवाक्याला “सबका विश्वास” अशी पुस्ती जोडली. शहरवासियांची अवस्था मात्र, “किसका साथ, किसका विकास और आब किसपर करे विश्वास” अशी करून सोडली आहे. आता तर या मंडळींनी त्याही पुढे जाऊन या घोषवाक्याला “नई सोच, नई उम्मीद” अशी जोड दिली आहे. आता पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी “नई सोच, नई उम्मीद, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” असे घोषवाक्य शहर भाजपाईंनी तयार केले आहे.

थोडक्यात आता ही स्थानिक भाजपाई मंडळी “नई सोच” म्हणजे नवनवीन प्रयोग सोचून “नई उम्मीद” म्हणजे नव्या उमीदेने अगर नव्या हुरूपाने, आपल्या नातेवाईक, सगेसोयरे, बगलबच्चे, हितसंबंधितांना आपमतलबी “सबका विकास” करण्यासाठी, “सबका साथ” देऊन प्रत्येकाला या सर्व बाबींसाठी “सबका विश्वास” मिळवणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरवासीयांकडून पुन्हा गाजर, मुळ्यांच्या शेतीवर सत्ता संपादित करण्याचा या स्थानिक भाजपईंचा हा विचार लपून राहिलेला नाही. मात्र, शहरवासी आंधळे, मुके, बहिरे आहेत, असा समज या भाजपाई स्थानिकांनी बहुदा करून घेतला असावा. खरे म्हणजे याची प्रचिती येत्या महापालिका निवडणुकीत, या समस्त भाजपाईंना देण्याची जबाबदारी प्रत्येक पिंपरी चिंचवड शहरवासियाची आहे, ते ती पूर्ण करतील अशी आशा आहे.

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×