शहर भाजपाईंचे “गिरे, फिर भी नांक उपर”!

ऐंशी संख्याबळ असतानाही केवळ सहासष्ट नगरसेवकांची मते मिळवून “आम्ही गड राखला” अशी टिमकी सध्या पिंपरी चिंचवड शहर भाजपाई प्रसिद्धी माध्यमांद्वारे वाजवीत आहेत. पुणे महानगर क्षेत्रीय विकास महामंडळावर आमचे सहा सदस्य निवडून आले, त्यामुळे पक्षात सगळे आलबेल आहे, अशी पिटलेली दवंडी म्हणजे शहर भाजपाईंचे “गिरे, फिर भी नांक उपर” अशा आशयाचे पार्श्वभाग बडवणे असल्याची चर्चा शहरात आहे. आपले चौदा नगरसदस्य फुटले हे झाकण्याचा भाजपाई स्थानिक नेत्यांचा आटापिटा दयनिय असल्याचे, भाजपाई गोटातही बोलले जात आहे. वस्तुतः, नगरसदस्य लक्ष्मण उंडे यांच्या निधनानंतर शाहत्तर पक्षचिन्हावर निवडून आलेले सदस्य आणि हातात घड्याळ बांधून बाजूला झालेले कैलास बारणे वगळून चार अपक्ष सदस्य, असे ऐंशी नगरसदस्यांचे राक्षसी बहुमत सांभाळता न आल्याची लाज बाळगून गप्प बसणे शहर भाजपाईंकडून अपेक्षित होते. मात्र, शहर भाजपाईंनी आपली प्रसिद्धी यंत्रणा आणि हितसंबंधी माध्यमे वापरून आम्ही कसा छान कारभार करतो आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेवराव ढाके (१२नगरसदस्यांची मते), नगरसेवक वसंत बोराटे (११ मते), निर्मला गायकवाड (११ मते), संदीप कस्पटे (११ मते),जयश्री गावडे (११ मते) आणि चंद्रकांत नखाते (१० मते) अशी एकूण सहासष्ट नगरसदस्यांची मते पिंपरी चिंचवड शहर भाजपला मिळाली आहेत. यापैकी चंद्रकांत नखाते केवळ काठावर पास झाले आहेत. पुणे महानगर क्षेत्रीय विकास महामंडळाची ही निवडणूक एकूण तीस सदस्यांसाठी होती. त्यापैकी नऊ सदस्य पिंपरी चिंचवड महापालिकेतून, तेरा सदस्य पुणे महापालिकेतून, छोटी शहरे आणि उर्वरित जिल्ह्यातून आठ सदस्य अशी संख्या निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांमधून बावीस जागांसाठी तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निर्धारित संख्याबळानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेतून निवडणुकीने सदस्यपदी येणाऱ्या नगरसदस्यांमध्ये भाजपचे सहा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन सदस्य निवडून येणे अपेक्षित होते. तसे ते निवडून आलेही.

मात्र, पिंपरी चिंचवड शहर भाजप आपले संख्याबळ शाबूत राखण्यात पुरती नाकाम ठरली असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. शहर भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार या निवडणुकीच्या मतदानादिवशी फिरकले देखील नाहीत. मात्र, माजी शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप ठाण मांडून मतदान करवून घेत होते. तरीही या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या काही तासातच पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या तत्पर पगारी प्रसिद्धी यंत्रणेने शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या नावाने प्रसिद्धीपत्रक प्रसूत केले. शहर भाजपाई गड शाबूत राखण्यात शहराध्यक्षांना कसे यश मिळाले, याचे रसभरीत आणि शहर राष्ट्रवादी कशी तोंडघशी पडली, याचे भरभरित वर्णन या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले.

शहर राष्ट्रवादीला उशिरा आलेली जाग!

एकीकडे आपले चौदा नगरसदस्य फुटूनही विजयाची टिमकी वाजविणारे प्रसिद्धीपत्रक प्रसूत करून आपले नाक वर असल्याचे दाखविणारे भाजपाई शहराध्यक्ष आणि दुसरीकडे निवडणुकीचा शिणवटा घालवून निवांत जागे झालेले शहर राष्ट्रवादी असा प्रकारही नुकताच घडला. पिंपरी चिंचवड शहरातील सत्ताधारी भाजप आता अस्ताला लागली आहे, त्यांना त्यांचे सदस्य राखता आले नाहीत, पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात भाजपला हरवू अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रसूत केले. शहर भाजपमध्ये पडझड सुरू झाली, हे कळायला त्यांना दोन दिवस लागले, ही बाब महत्वाची. येऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महापलिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सत्ताच्युत करण्याची भाषा करणारे शहर राष्ट्रवादीचे लोक असे उशिरा जागे होणार असतील, तर त्यांची अवस्था “झोपा केला आणि बैल गेला” अशी होण्यास वेळ लागणार नाही, हे निश्चित.

——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×