शरद पवार यांचा मेट्रो प्रवास आणि भाजपाईंचा झालेला हक्कभंग!
उगाचच गदारोळ आणि कांडारव करून पराचा कावळा करणे आणि एखाद्याच्या अंगावर जाणे, ही दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या भाजपाईंची जुनी आणि अंगवळणी पडलेली खोड आहे. ढवळ्याशेजारी पवळे बांधले, वाण नाही, पण गुण लागतातच, या जुन्या गावरान म्हणीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीमधून भाजपाई झालेल्या आणि आता भाजपाई म्हणून मिरवणाऱ्या समस्त पदाधिकाऱ्यांनाही ही खोड लागली आहे. निमित्त होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्वर्यू शरद पवार यांनी मेट्रोतून प्रवास केल्याचे. फुगेवाडी ते पिंपरी दरम्यान मेट्रोचे काम आता केवळ सुशोभिकरणापर्यंतच शिल्लक राहिले आहे. संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड सांधणाऱ्या या मेट्रोचा हा टप्पाच वापरण्यायोग्य झाला आहे. त्यामुळे भारतातील आणि जगभरातीलही मेट्रो पाहिलेल्या, अनुभवलेल्या शरद पवार यांना आपल्या परिसरातील मेट्रोतून प्रवास करण्याची इच्छा झाली असल्यास त्यात कौतुकाचा आणि अभिमानाचाच भाग आहे.
मात्र, कोणत्याही बाबींचा लगेच पोटशूळ उठण्याची सवय असलेल्या भाजपाईंनी आणि भाजपाई प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यावर मोठा गदारोळ आणि कांडारव केला. शरद पवार यांचा मेट्रो प्रवास समस्त भाजपाईंचा हक्कभंग करणारा ठरवून चंद्रकांतदादा पाटील यांच्या मागोमाग लगेचच पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाई पदाधिकारीही गदारोळ घालते झाले. आता म्हणे, पिंपरी चिंचवड शहरातील समस्त भाजपाई पदाधिकारी आशा प्रकारे, पवारसाहेबांना मेट्रो प्रवास घडवून आणणाऱ्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांची तक्रार केंद्र सरकारकडे करणार आहेत. का, तर भाजपाई प्रदेशाध्यक्षांना पवारसाहेबांचा मेट्रो प्रवास समस्त भाजपाईंचा हक्कभंग करणारा वाटला म्हणून. या समस्त भाजपाईंचा हक्कभंग का झाला, तर या प्रवासात त्यांना भाग घेता आला नाही म्हणून. भाग का घेता आला नाही तर, मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना, पवारसाहेब असा प्रवास करणार आहेत, हे सांगितले नाही म्हणून.
थोडक्यात, कोणत्याही भाजपाईंना पवारसाहेबांसह प्रवास करत आला नाही, त्यामुळे एकटे पवारसाहेब आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाव मारून गेले, कोणत्याही भाजपाईंना मिरवता आले नाही आणि अर्थातच त्याची प्रसिद्धीही घेता आली नाही आणि हेच या समस्त भाजपाईंचे खरे दुखणे आहे. प्रसिद्धीची आणि मिरवून घेण्याची एक संधी हुकली आणि त्याला मेट्रोचे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांनी शहरातील आणि समस्त भाजपाईंचा मिरवून घेण्याचा आणि प्रसिद्धी मिळविण्याचा हक्क हिरावून घेतला आणि अर्थातच समस्त भाजपाईंचा हक्कभंग झाला. तेही आख्खी मेट्रो केंद्र सरकारच्या आणि अर्थातच समस्त भाजपाईंच्या अखत्यारीत असताना. म्हणून मग समस्त मेट्रोचे समस्त अधिकारी शिक्षा मिळण्यास पात्र झाले आहेत.
आता प्रश्न राहिला तो, मेट्रोच्या प्रवासाचा. मे २०२१ पासून मेट्रोच्या शंभरपेक्षा जास्त चाचण्या झाल्या. अगदी पत्रकारही मेट्रोमधून फेरफटका मारून आले. गेले सहा महिने आठवड्यातून एकदातरी मेट्रो इकडून तिकडे जाताना दिसते. अनेकदा हे दृश्य पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील अनेक खिडक्यांनी पाहिले आहे. या खिडक्यांमधून अनेक डोकी देखील बाहेर डोकावत असतात आणि या डोक्यांमध्ये महापालिकेच्या सत्ताधारी भाजपाईंची देखील डोकी सामील असतीलच, हेही ओघाने आले. मग गेल्या सहा महिन्यात एकही भाजपाई पदाधिकाऱ्याला या मेट्रोमधून आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ, स्थानिक अशा कोणत्याही स्तरावरील नेत्याला घुमवून आणण्याची सुबुद्धी का होऊ नये, हा खरा प्रश्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्वर्यू शरद पवार यांच्या मेट्रो प्रवासानंतर लगेचच मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी आपल्या स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांसह मेट्रो प्रवास केला. त्यावर भाजपाई प्रदेशाध्यक्ष अगर कोणत्याही स्थानिक नेत्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. खासदार बारणे यांचा मेट्रो प्रवास कोणत्याही भाजपाईस हक्कभंग वाटला नाही. याचाच अर्थ असा की, केवळ पवारसाहेबांनी केलेला मेट्रो प्रवास समस्त भाजपाईंच्या पोटशूळाचे कारण ठरला आहे. मेट्रोचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा घाट घातला जात असतानाच, चक्क पवारसाहेब मेट्रोने प्रवास करून आले, हे खरे समस्त भाजपाईंच्या पोटात गोळा आणणारे आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोनही शहरात भाजपाईंची सत्ता असतानाही राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याने केलेला हा प्रवास मेट्रोच्या उद्घाटन स्वरूपच मानला जात आहे. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मेट्रोचे उद्घाटन करणार आणि भाजपाई प्रांताध्यक्षांसह सर्व स्थानिक नेते त्यांना कोणत्या तोंडाने उद्घाटन करण्यास बोलावणार हा खरा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळेच हक्कभंग आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार वगैरेचा गदारोळ आणि कांडारव होतो आहे, हेच खरे!
––––––––––––––––––––––––––––––––––––