एकनाथ खडसे शहरातील सत्ताधारी भाजपला किती मोठे भगदाड पाडतील?

ते आले, शहरभर फिरले, कोणाकोणाला भेटले, त्यांना कोणकोण भेटले, आणि ते गेले सुद्धा! मात्र, या शहरभेटीत त्यांनी कोणाकोणाच्या बुडाखाली सुरुंग पेरले, आणि कोणाकोणाची बुडे, कुठे कुठे स्थिरावली अगर जागची हलली, यावर दिवसभर चर्चा होत राहिली! वैदर्भीय वाघ म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो असे, अर्धे शतक भारतीय जनता पक्षात अगदी कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंतची मजल मारलेले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळात आपली भाजपने नासलेली वेळ सुधारण्याचा प्रयत्न करणारे एकनाथ खडसे काल पिंपरी चिंचवड शहरात फेरफटका मारून गेले. त्यांच्या या भेटीत अनेक वैदर्भीय मंडळींशी त्यांनी हितगुज केले, काहींना ते जाऊन भेटले, तर काही त्यांना येऊन भेटले. एकनाथ खडसेंनी ही शहरभेट नेमकी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाली असल्याने, आता त्यांची ही भेट, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला किती मोठे हादरे देणारी अगर भगदाड पाडणारी ठरेल, यावर शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत राहिली.

संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेले त्यांचे चाहते, ते जिथे जातात, तिथे त्यांना भेटतात अगर ते स्वतःहून आपल्या चाहत्यांना भेटतात, हा त्यांचा नेहमीच परिपाठ त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी पिंपरी चिंचवड शहरातही पूर्ण केला. त्यांच्या चाहत्यांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंचे माजीआजी सत्तारूढ पक्षनेते, एकनाथदादा पवार आणि नामदेवराव ढाके, यांचा देखील समावेश झाला, ही खडसेंच्या कालच्या शहरभेटीची सगळ्यात मोठी चर्चेची बाब ठरली. आता शहर भाजपचे हे दोनही नेते, एकनाथदादा पवार आणि नामदेवराव ढाके, आपला वैदर्भीय नातेसंबंध  पाळून एकनाथ खडसेंप्रमाणेच, राष्ट्रवादीच्या घड्याळात आपली वेळ सुधारतील काय हा या शहरातील चर्चेचा मूळ सूर होता. 

होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका, या शहरातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या ठरणार आहेत, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची अगर राजकीय तज्ज्ञांची गरज नाही. राष्ट्रवादीच्या अंगणात खेळून, बागडून मोठी झालेली मंडळी सांप्रतच्या काळी कमळतळ्यात हुंदडत आहेत. त्यांच्या या भ्रष्टाचारी आणि अनागोंदी हुंदडण्याने आख्खे कमळतळे आणि त्यातील कमळेही चिखलराड झाली आहेत. आता या चिखलराड झालेल्या कमळतळ्यात बरबटलेल्या कमळांबरोबर राहण्यास अनेक जण इच्छुक नाहीत. त्यापैकी कोणकोण हातात घड्याळ बांधणार यावर जोरदार चर्चा आहे. अंदाजे वीस बावीस अशी संख्या सांगितली जाते असली तरी, एकनाथ खडसे यांच्या शहरभेटीमुळे त्यात अजून वाढ होण्याची शक्यता गृहीत धरले जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील सध्याचे भाजपाई माजीआजी शहराध्यक्ष चिंचवड आणि भोसरीचे आमदार यांनी महापालिका निवडणुकीचा भाजपाई उमेदवारांचा सगळा खर्च करण्याचे आश्वासन देऊनही, भाजपमधून मोठ्या प्रमाणात नगरसदस्य बाहेर पडतील असे अंतर्गत गोटातील चर्चेतून स्पष्ट होते आहे. स्थानिक भाजपाई नेत्यांच्या एकंदर स्वाधिष्टीत आणि स्वहितकरक राजकारणाला कंटाळलेले लोक भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यास उत्सुक नाहीत. मुळच्या राष्ट्रवादीच्या असलेल्या या भाजपाई नेत्यांच्या नादी लागून अनेक जण २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीतून बाहेर पडून कमळाच्या नादी लागले होते. त्यातील अनेकांचा आता भ्रमनिरास झाला असून त्यांच्या बरोबरीनेच काही मूळ भाजपाई सुद्धा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आता त्यात एकनाथदादा पवार आणि नामदेवराव ढाके यांचा समावेश आहे किंवा कसे, यावर अलाहिदा संशोधन करावे लागेल!

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×