बीआरटी आणि स्मार्ट सिटी, सत्ताधारी भाजपाईंच्या दुभत्या गायी आहेत?

अनियमितता, अनागोंदी, अवैधता या सगळ्यांचे आरोप स्मार्ट सिटी आणि बीआरटी विभागावर सातत्याने होत आहेत. अनेक वादग्रस्त बाबी या स्मार्ट सिटी आणि बीआरटी विभागात घडत असल्याची चर्चा वेळोवेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेत आणि स्थायी समितीसह इतर विषय समित्यांमध्ये सातत्याने होत आली आहे. तरीही या दोनही विभागांचे प्रमुख आणि त्यांच्या अखत्यारीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना कोणतेही आयुक्त जाब का विचारीत नाहीत, याबाबत महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोनही विभागांमध्ये सध्या जे काम चालू आहे, त्यात ठेकेदार कोणीही असले तरी प्रत्यक्षात काम मात्र, बहुतांश भाजपाई पुढाऱ्यांचे बगलबच्चे, हितसंबंधी, नातेवाईक यांना वाटून देण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या माजीआजी शहाराध्यक्षांनी जसे शहर वाटून घेतले आहे, तसेच आपल्या बगलबच्चे, हितासंबंधीत, नातेवाईक यांना महापालिकेची कामे मिळावीत म्हणून आणि आपल्याला त्यातून सरळ जादाची टक्केवारी मिळावी म्हणून, महापालिकेचे विभागही वाटून घेतले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी आणि बीआरटी हे विभाग भाजपाई माजीआजी शहराध्यक्षांसाठी दुभत्या गायी ठरल्या असल्याची चर्चा आहे.

बीआरटीच्या थेट ठेक्याचे घोळ, आयुक्तांना नामुष्की!

औंध किवळे या बीआरटी रस्त्यावर थेट पद्धतीने पदपथ आणि सायकल मार्गिकेचे सुशोभीकरणासह काम देण्याचा घाट बीआरटी विभागाने घातला होता. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी त्यासंबंधी व्यवस्थित माहिती देणारा पत्रकार दौरा आयोजित केल्याने आणि तशी गरज नसल्याचे आणि थेट काम देणे कसे नियमबाह्य आहे हे दाखवून दिल्याने, आयुक्तांना पदपथ आणि सुशोभीकर्णाचे काम थेट पद्धतीने देण्यात येणार नाही, असे पत्र देण्याची नामुष्की पत्करावी लागली. तरीही यातून बीआरटी विभागाला शहाणपण आलेले दिसत नाही. आता मुंबई पुणे रस्त्यावर सुशोभित पदपथ, सायकल मार्गिका तयार करण्यासाठी थेट पद्धतीने काम देण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी मुंबई पुणे रस्ता ज्या नगरसदस्यांचा प्रभागात येतो, त्या सर्व नगरसदस्यांची एक बैठक बीआरटी विभागाने आयोजित केली होती.

या बैठकीत मुंबई पुणे रस्त्याचे सुशोभित पदपथ कसे असतील याचे संगणकीकृत सादरीकरण करण्यात आले. मात्र, जवळपास सगळ्याच नगरसदस्यांनी विरोध दर्शविला. कारण मुंबई पुणे रस्त्यावर हा पदपथ करण्याएव्हढी जागा नाही हे सत्य, नगरसदस्य जाणून आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सुशोभित पदपथ आणि सायकल मार्गिकेचे काम मुंबई पुणे रस्त्यावर लादायचेच या हेतूने बीआरटी विभागाने नागरिकांकडून सहमती घ्यायची म्हणून नागरिकांना आवाहन केले. आता नागरिकांनी मुंबई पुणे रस्त्याच्या या सुशोभित पदपथ आणि सायकल मार्गिका तयार करण्याच्या कामाला होकार दिल्याचा खोटाच अहवाल तयार करण्यात आला आहे. हे होकार देणारे नागरिक कोण आहेत, किती लोकांनी या सहमती मागविण्यासाठीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, ते लोक कोणत्या परिसरात राहतात, याची कोणतीही माहिती न देता, केवळ नागरिकांची सहमती असल्याचे दर्शविण्यात येत आहे. हा असला सगळा खोटा खटाटोप बीआरटी विभाग केवळ आणि केवळ मुंबई पुणे रस्त्यावर सुशोभित पदपथ आणि सायकल मार्गिका तयार करण्याचे काम पुढे रेटण्यासाठी करीत आहे, हेच या मागील खरे सत्य आहे. या कामातून कोणाची किती टक्केवारी निर्माण होणार आहे, हा एक संशोधनाचा भाग आहे. या सर्व कामांचे खरे लाभार्थी भाजपाई नेते आणि त्यांचे बगलबच्चे, हितसंबंधीच आहेत, हे मात्र नक्की.

स्मार्ट सिटीचे खरे ठेकेदार कोण?

स्मार्ट सिटी हा प्रकल्प तर केवळ पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाई नेत्यांच्या बगलबच्चे आणि हितसंबंधितांना पोट ठेकेदारी करता यावी म्हणून तयार करण्यात आला आहे काय असा संशय निर्माण होतो. या प्रकल्पकजे काम टेक महिंद्रा, बेनेट अँड कोलमन, एल अँड टी, आशा नामांकित आणि मोठ्या कंपन्यांकडे आहे. मात्र प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाई नेत्यांचे बगलबच्चे आणि नातेवाईक हेच या मोठ्या नामांकित कंपन्यांचे पोट ठेकेदार आहेत, हे एक उघड गुपित आहे. अशाच एका पोट ठेकेदाराने आपली टक्केवारी बुडवली म्हणून काही भाजपाई नगरसदस्यांनी महापालिका आयुक्तांना वेठीस धरण्याचे आणि त्यांच्यावर काळिखमय प्रयोग करण्याचे धारिष्ठ्य केले होते. मोठ्या कंपन्यांनी स्मार्ट सिटीचे काम घेतले असले तरी भाजपाई हितसंबंधी पोट ठेकेदारांनी या प्रकल्पाचे पुरते भजे केले आहे. अनेक अनियमितता या प्रकल्पात आहेत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हा प्रकल्प इतका रेंगाळला आहे की, अनेक महत्त्वाच्या कामांचे, या पोट ठेकेदारीमुळे अडचणी पैदा होऊन अद्ययावतीकरण पुरते ठप्प झाले आहे. ठिकठिकाणची खोदाई, वेगवेगळ्या वाहिन्या टाकणे, अद्ययावतिकरणासाठी संगणकीकृत प्रणाली तयार करणे, पाणीपुरवठ्यासाठी संगणकीकृत स्काडा प्रणालीचे अद्ययावतीकरण करणे, रस्ते आणि रस्त्यालगतच्या विविध वाहिन्यांसाठी भूमिगत सोय करणे, शहरासाठी इंटरनेट आणि वायफाय यंत्रणा उभारणे अशी विविध कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात आहेत. मात्र, हि सर्व कामे पोट ठेकेदारांच्या अखत्यारीत आहेत आणि हे सगळे पोट ठेकेदार भाजपाई नेत्यांचे हितसंबंधी आहेत. त्यामुळे हा सगळाच स्मार्ट सिटी प्रकल्प शहरासाठी, शहरातील नागरिकांसाठी आहे की, भाजपाई हितसंबंधी पोट ठेकेदारांसाठी आहे, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

थोडक्यात, पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे स्मार्ट सिटी आणि बीआरटी विभाग केवळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपाईंसाठी, टक्केवारी आणि पोट ठेकेदारी मिळवून देणाऱ्या दुभत्या गायी ठरल्या आहेत. हे सगळे भाजपाई नेते, कार्यकर्ते या दुभत्या गायींच्या कासेत हात घालून आपल्या मलिद्याच्या धारा काढताहेत, हेच यातून स्पष्ट होते आहे. 

————————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×