तथाकथित चाणक्याला भोसरीच्या तथाकथित पहिलवानी चंद्रगुप्ताचा धसका!

सांप्रतला पिंपरी चिंचवड शहरात तथाकथित चाणक्यांचा मोठाच बोलबाला आहे. प्रत्येक तथाकथित चंद्रगुप्ताला एक तथाकथित चाणक्य चिकटलेला असतोच असे दृश्य सर्वदूर दिसू लागले आहे. यातील काही चाणक्य तर आपल्या सेवा वेगवेगळ्या तथाकथित चंद्रगुप्ताला प्रदान करण्यात वाकबगार आहेत. या वेगवेगळ्या चंद्रगुप्तांकडून आपला कार्यभाग निघाला की लगेच दुसरा चंद्रगुप्त शोधायचा, हा यातील एका चाणक्याचा हातखंडा आहे. मात्र कितीही झाले तरी हे शहरातील यच्चयावत चाणक्य आणि चंद्रगुप्तही तसे तथाकथीतच आहेत. हा नवनवे चंद्रगुप्त शोधणारा चाणक्यही तसा तथाकथीतच आहे. सतत चंद्रगुप्त बदलण्याच्या नादापायी या तथाकथित चाणक्याला आजमितीस त्याच्याकडून फसवले गेलेले काही चंद्रगुप्त सतत त्याच्या मागावर राहून तो कुठे सापडतो आहे काय याच्या शोधात असतात. अशाच एका फसवले गेलेल्या भोसरीच्या पहिलवानी तथाकथित चंद्रगुप्ताचा या तथाकथित चाणक्याने चांगलाच धसका घेतल्याची चर्चा सांप्रतच्या काळी पिंपरी चिंचवड शहरात होताना दिसते आहे. हा धसका इतका आहे की, तथाकथित चाणक्याने, तथाकथित पहिलवानी चंद्रगुप्ताच्या भीतीने अक्षरशः कार्बाईनधारी पोलिसी अंगरक्षक नेमून घेतला आहे.

हा सर्व प्रकार इंद्रायणीनगरच्या एक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातील तथाकथित पहिलवानी चंद्रगुप्त आणि चाणक्याच्या भेटीपासून सुरू झाला असल्याची चर्चा आहे. ज्ञातव्य असे आहे की, हे दोनीही तथाकथित चंद्रगुप्त, चाणक्य यांची या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातच आमनेसामने भेट झाली. चंद्रगुप्त बदललेल्या चाणक्याला, पहिलवानी चंद्रगुप्ताने आमच्या विरोधात तुझ्या नव्या चंद्रगुप्ताला मदत का करतो आहेस, असा जाब विचारला असता तुतु, मैमै झाली आणि तथाकथित पहिलवानी चंद्रगुप्त तथाकथित चाणक्याच्या अंगावर धावून गेला. पाहणारे असे म्हणताहेत की या दोघांमध्ये केवळ बाचाबाची झाली, तर काही जण सांगतात की पहिलवानाने चाणक्याचे  मुस्काड हाणले, तर काहींच्या मते चाणक्याची मस्त धुलाई झाली. बाचाबाची, मुस्काड की धुलाई हा प्रकार अलाहिदा ठेवला तरी, चंद्रगुप्त बदलण्यात वाकबगार असलेल्या चाणक्याची पुरती तंतरली असून पोलिसी संरक्षणात हिंडण्याची पाळी या तथाकथित चाणक्यावर आली आहे.

या तथाकथित चाणक्यावर अशी पाळी का आली असावी, याचा शोध घेतला असता, आपल्या मतलबासाठी चंद्रगुप्त बदलण्याची या तथाकथित चाणक्याची खोड याला कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चाणक्याने आतापर्यंत बदललेल्या तथाकथित चंद्रगुप्तांची यादी मोठी आहे. ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी, असा या तथाकथित चाणक्याचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. आपली सीमा अबाधित ठेवण्यासाठी या चाणक्याने अनेक चंद्रगुप्त, गाजराच्या पुंगीसारखे मोडून खाल्ले आहेत. मात्र, काही गाजरांचे आतले मूळचे मांजर आता या चाणक्याच्या पाचनशक्तीचा बोजवारा उडवणारे ठरले आहे. त्यामुळे काही गाजरे या तथाकथित चाणक्याच्यात अडकून राहिली आहेत. आतातर या तथाकथित चाणक्याच्या सीमा आशावादी झाल्या आहेत. त्यामुळे नव्याने चिकटलेल्या आशावादासह आपल्या सीमा अबाधित ठेवण्यासाठी अडकलेली गाजरे सहन करून हा तथाकथित चाणक्य सांप्रतला योगईश या तथाकथित चंद्रगुप्तावर मोहिनी टाकून राहिला आहे. योगईशामार्फत आता हा तथाकथित चाणक्य एका वेगळ्या पातळीवरचे चंद्रगुप्त हाताळतो आहे. मात्र, जुन्या चंद्रगुप्तांचे अडकलेले गाजर या चाणक्यासाठी “सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही” अशा आशयाचे ठसठसते दुखणे झाले आहे.

या तथाकथित चाणक्याने पूर्वी म्हणजे २०१७च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत स्वतःच चंद्रगुप्त होण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात आपल्या सीमा उधळल्या जाण्याच्या भीतीने, या चाणक्याला स्वतःच चंद्रगुप्त होण्याच्या आपल्या इच्छेवर पाणी सोडावे लागले आहे. मात्र २०१७च्या महापालिका निवडणूका ध्यानात ठेऊन या चाणक्याने आपली नीती, सीमेत राहून वापरली. गजाननाला वंदन करून चंदन लावल्यानंतर लक्ष्मणरेषेत गेलेल्या या चाणक्याने फायदा संपल्यावर लक्ष्मणरेषा ओलांडली. त्यानंतर भाजपाई चंद्रगुप्त वापरून संपल्यावर आता हा तथाकथित चाणक्य राष्ट्रवादाला नादाला लावतो आहे. केवळ आपल्या आशावादी सीमा आणि आपली चाणक्यगिरी यालाच प्रामाणिक असलेला हा तथाकथित चाणक्य आता राष्ट्रवादाच्या आसऱ्याने भाजपाई जहाजाला भोक पाडण्याचे मनसुभे आखीत आहे. त्यामुळे तथाकथित शहर भाजपाई चंद्रगुप्त बिघडले नाहीत तरच नवल. त्यातल्यात्यात ज्या भाजपाई चंद्रगुप्ताने या चाणक्याशी आमनेसामने भेट घेतली, तो मूळचा पहिलवान, त्यामुळे तो जर या तथाकथित चाणक्याच्या गचांडीला गेला असेल, तर ते वावगे ठरू नये.

आता यात महत्त्वाची मेख अशी की हा तथाकथित चाणक्य, भोसरीच्या तथाकथित चंद्रगुप्ताशी तुतु मैमै झाल्याची कबुली देत फिरतो आहे, तर हा चंद्रगुप्त आणि त्याची सकलसाधनशुचित यंत्रणा, असे काही घडलेच नाही, असे म्हणून नामानिराळे होताहेत. यावर प्रश्न असा निर्माण होतो की, बाचाबाची, मुस्काड, धुलाई असे प्रकार अवलंबणारे, मोठया अभिमानाने झाल्या प्रसंगाच्या कहाण्या प्रसूत करतात आणि या भोसरीच्या तथाकथित चंद्रगुप्ताकडे तर असे ढोल वाजविणारी आख्खी यंत्रणा आहे, तरीही हे नामानिराळे का होताहेत. मुळात त्यांच्यावर असे आपले ढोल गवसणीत ठेवण्याची वेळ का आली असावी अगर या तथाकथित चाणक्याला जाब विचारण्याची गरज या मंडळींना का पडली असावी, हा लगेचचा दुसरा प्रश्न निर्माण होतो आहे.

आतापर्यंत तथाकथित भाजपाई चंद्रगुप्तांनी या तथाकथित चाणक्याचा यथेच्छ वापर करून पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. सत्ता मिळाल्यावर त्याचे फळ म्हणून या चाणक्याला आपली सीमा वृद्धिंगत करण्याची संधी देण्यात आली. वृद्धिंगत सीमा इतक्या विस्फारल्या, की त्यामुळे अनेकांना आपली बसकरे आवरावी लागली. महत्त्वाचे म्हणजे या तथाकथित चाणक्याला, जो गाड्याखालच्या सावलीत आरामात चालत होता, आपणच गाडा चालवीत आहोत अशी भावना निर्माण झाली आणि त्याने तोपर्यंत वापरलेल्या सर्व चंद्रगुप्तांवर दुगाण्या झाडण्यास सुरुवात केली. मग हे तावलेले तथाकथित चंद्रगुप्त, आता या शेखचिल्ली चाणक्याच्या मागावर असतील तर त्यात नवल करण्यासारखे काही नाही.

या सर्व विवेचनानंतर एकाच महत्त्वाची बाब चर्चिली जाणे शिल्लक राहिले, ती म्हणजे, यातून कोणी शहाणे झाले की नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, सांप्रतला हा तथाकथित चाणक्य ज्या राष्ट्रवादाला भुरळ पडतो आहे, तो राष्ट्रवाद यातून काही शिकणार आहे की नाही. नाहीतरी या तथाकथित चाणक्याला चंद्रगुप्त बदलण्याची खोड आहेच, राष्ट्रवादी चंद्रगुप्त केव्हा आणि कसे गाजराच्या पुंगीत तब्दील होतात, हे कालानुरूप कळेलच!

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×