प्रवीण लडकतांना पुन्हा महापालिकेत आणण्यामागचे गौडबंगाल काय?

नुकतेच पिंपरी चिंचवड महापालिकेतून शेवटच्या महिन्यात सहशहर अभियंता म्हणून पदोन्नती मिळवून, सेवानिवृत्त झालेले प्रवीण लडकत सेवनिवृत्तीनंतरच्या अवघ्या चौथ्या आठवड्यात सल्लागार म्हणून पुन्हा महापालिकेत रुजू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवीण लडकत यांना सोयोच्या होतील अशा अटीशर्ती टाकून गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने “सल्लागार पाहिजे” अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या सल्लागाराची अस्थायी नियुक्ती, पाणीपुरवठा विभागाकडील चालू असलेल्या प्रकल्पांसाठी करावयाची असून त्यासाठी इच्छुक आणि पात्र व्यक्तींनी काल सोमवार दि. २१/०३/२०२२ पर्यंत महापालिकेकडे अर्ज करावेत असे सदर जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. मात्र सल्लागाराची पात्रता ठरविताना या पदासाठी एकमेव प्रवीण लडकत यांचे नाव डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणीपुरवठा विभागातील प्रकल्प, पेयजल शुद्धीकरण, पाणी वितरण या सर्व विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याने, शहरातील कोणत्याही सामाजिक अगर राजकीय संस्थेने अशा प्रकारच्या सल्लागाराची मागणी केलेली नाही. मग हा खटाटोप नक्की कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्याने करण्यात येतो आहे, हे अनाकलनीय आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सध्या शहरात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणारी २४ ×७ पाणीपुरवठा योजना, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेली अमृत योजना, भामा आसखेड आणि आंद्रा  धरणातून शहरात पाणी आणणारी बंद नळ योजना  अशा विविध योजना सुरू आहेत. यातील काही योजना उगाचच रेंगाळल्या आहेत, तर काही अधिकाऱ्यांमार्फत रेंगाळल्या गेलेल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प हा सवता सुभा तर काम वेळेत पूर्ण न करण्यासाठी कार्यरत आहे काय, असे वाटावे इतपत निवांत आहे. या सर्व कामांना वेग देणे गरजेचेच आहे. मात्र या कामांवर आता कार्यरत असलेले तांत्रिक सल्लागार आणि मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या गेली सुमारे चार वर्षे हे काम करताहेत, त्यांना योग्य ती समज अगर शिक्षा देऊन काम पूर्ण करणे गरजेचे आहे.

गेल्या २८ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले प्रवीण लडकत यांच्या देखरेखीखालीच, ते निवृत्त होईपर्यंत हे सर्व सुरू होते. आपल्या सेवाकळात त्यांना या ठेकेदारांकडून काम करून घेता आले नाही, हे स्वयंस्पष्ट आहे. मग आता त्यांनाच सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा सल्लागार म्हणून नेमण्यात काय हाशील आहे, हे अनाकलनीय आहे. ही सर्व रेंगाळलेली कामे प्रवीण लडकत सेवेत असतानाही रेंगाळलीच होती हे सत्य महापालिका प्रशासन का नाकारीत आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला असता, चार शक्यता निर्माण होतात.

यातील पहिली शक्यता म्हणजे, प्रवीण लडकत यांना सेवानिवृत्त झाल्यावर, काहीच काम नाही म्हणून घरी करमत नाही, शिवाय निवृत्ती वेतनावर त्यांचे भागत नसावे, त्यामुळे त्यांनीच गळ घालून आपल्याला पुन्हा महापालिकेशी जोडून घेण्याचा हा प्रयत्न असावा. दुसरी शक्यता म्हणजे, सध्या पेयजल शुद्धीकरण आणि पाणी  वितरण व्यवस्था पाहणारे कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी, पाणीपुरवठा प्रकल्प पाहणारे ज्ञानदेव जुंधारे, त्यांचे प्रमुख सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, स्मार्ट सिटीचे सर्व अधिकारी, तांत्रिक सल्लागार आणि ठेकेदार यांना काम करत येत नाही, किंबहुना ते काम करण्यास लायक नाहीत. म्हणून मग प्रवीण लडकतच हवेत, त्याशिवाय काम होणे शक्य नाही, अशी महापालिका प्रशासनाची धारणा असावी. तिसरी शक्यता, पाणीपुरवठ्यावर काम करणारे ठेकेदार, सल्लागार, महापालिका अधिकारी आणि प्रशासन यांना प्रवीण लडकत यांच्याशिवाय करमत नाही, ही असावी. चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची शक्यता म्हणजे, या प्रकल्पांच्या शेवटच्या टप्प्यातील धंदा अगर टक्केवारीचे गणित लडकत यांच्याशिवाय बसने शक्य नाही, अशी या प्रकल्पाच्या टक्केवारीची आस असलेल्या लोकांची धारणा असावी.

आता या चार शक्यतांपैकी नक्की कोणत्या शक्यतेसाठी, नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या प्रवीण लडकत यांना पुन्हा सेवेची संधी देऊन सल्लागार म्हणून नेमण्यात येणार आहे, हे गुलदस्त्यात असतानाच, याव्यतिरिक्तही काही शक्यता असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकार सांगताहेत. कारण ज्या वेगाने प्रवीण लडकत यांना सल्लागार पदी नेमण्याची पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला घाई झाली आहे, ती पाहता नक्कीच काही वेगळे पाणी मुरत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करून, काल २१ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी अस्थायी सल्लागार पदासाठी अर्ज मागविण्यात आले. कालच्या पूर्ण एका दिवसात महापालिका प्रशासनाला प्रवीण लडकत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. आज म्हणजे दि. २२ फेब्रुवारी रोजी लडकत यांची नेमणूकही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या राजेश पाटील यांच्या या पुढच्या कामकाजाच्या पद्धतीचा हा मासलेवाईक नमुनाच म्हणावा लागेल!

————————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×