कोणता झेंडा घेऊ हाती? चिंचवड विधानसभा निवडणूक (भाग १)
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर एकदम झटपट चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. अजून महिन्याची भाकरही झाली नाही आणि निवडणूक लावण्यात आली, राज्य निवडणूक आयोगाचा इतका जलद कारभार खरोखरच विस्मयपूर्ण असाच आहे. अजूनही डोळ्याचे पाणी जिरले नाही आणि उमेदवार कोण याचा संभ्रम निर्माण झाला आहे. लक्ष्मणभाऊंना मानणारा आणि त्यांच्या जाण्याने काहीसा वेडावलेला चिंचवडचा मतदार एव्हढ्या पटकन सावरले आणि पुन्हा निवडणुकीला समोर जाईल, हे म्हणणे जरासे अतिशयोक्तीपूर्णच आहे. त्यातही राजकारण्यांना झालेली घाई म्हणजे आता उमेदवार कोण, लक्ष्मणभाऊंच्या विधवा पत्नी अश्विनी की त्यांच्या पाठीवरून जगात आलेले त्यांचे बंधू शंकरराव, ही चर्चा म्हणजे भाऊंच्या कुटुंबाच्या दुःखाला डागण्या देण्याचाच प्रकार आहे. मात्र, राजकारणात भावनेला थारा नाही, या स्वयंस्पष्ट विधानाप्रमाणे चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू आहे. आता नक्की काय करायचे, कोणाला मते द्यायची, कोणता झेंडा हाती घ्यायचा, हा संभ्रम सध्या चिंचवडच्या मतदारांमध्ये आहे.
सांप्रतला चिंचवड विधानसभेत भाऊंचा भाजप, कोणाला उमेदवारी देणार यावर मतदारांमध्ये संभ्रम आहे. कार्यकर्ते आणि समर्थक दोन विभागात वाटले गेले आहेत. काहींच्या मते भाऊंच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी द्यावी, तर काहींच्या मते भाऊंचे बंधू शंकरराव यांना उमेदवारी मिळावी असा सूर आहे. त्याचबरोबर चंद्रकांत नखाते आणि त्यांच्यासारखे काही कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही आहेत. लक्षणभाऊ जगताप यांच्या अकाली जाण्याने आणि अत्यंत घाईने निवडणूक जाहीर झाल्याने भाजप विरोधकांमध्ये उभारी आणि जान आली आहे. २०१९ च्या निवडणुकीत विशेष सांझेदारीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी लक्षणीय लढत दिली होती. ते आताही निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मणभाऊंच्या विरोधात लढलेले भाऊसाहेब भोईर, २०१४ च्या निवडणुकीत अचानकपणे काँग्रेसच्या उमेदवारीने लढलेले कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, अपक्ष उमेदवार मोरेश्वर भोंडवे, आदी मंडळी आता या पोट निवडणुकीत आपले नाणे चालविण्याच्या प्रयत्नात आहेत.
शहरात भाजपचा मतदार आहे?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून लक्ष्मणभाऊ जगताप आणि अपक्ष महेशदादा लांडगे आमदार झाले आणि शहरात भाजपाई वातावरण सुरू झाले. वस्तुतः हे दोघेही मूळचे भाजपाई नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात तोपर्यंत विरोधी गटातील जोडपक्ष एव्हढीच भाजपची कुवत गणली जात होती. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत भाजपची नगरसदस्य संख्या केवळ तीन होती. मात्र, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे यांनी स्वतःची माणसे भाजपची म्हणून रिंगणात उतरवली, जोडीला आझमभाई पानसरे यांना घेतले आणि तिनचे सत्त्याहत्तर करून महापालिकेत सत्ता स्थापन केली. भाजपचे म्हणून या शहरात कधीही हाताच्या बोटावर मोजण्यापेक्षा जास्त नगरसदस्य निवडून आलेले नाहीत, हे सत्य आहे. शहरातील काही नव्याने विकसित झालेल्या भागातील तथाकथित पांढरपेशी नोकरदार आणि भाजपच्या प्रसिद्धी तंत्राने काही प्रमाणात वेडावलेला तरुण वर्ग सोडला, तर भाजपचा मतदार या शहरात नाही, असे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे या शहरात सत्ता भाजपची सत्ता असली तरी सत्तेत भाजप कधीच नव्हती.
अगदी अचानकपणे कमी राहिलेल्या वेळात चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक होऊ घातली आहे. भाजपाई झालेले लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अचानक निधनाने रिक्त झालेली ही जागा. आता समस्त भाजपाई आम्ही ही निवडणूक काशी जिंकू यावर मल्लिनाथी करताना दिसताहेत. पण हे सगळे आडाखे ज्यांच्या जीवावर आखले जात आहेत, त्या मतदारांचे म्हणणे काय, याचा विचार करताना कोणी दिसत नाही. लक्षणभाऊंचा नक्की वारसदार कोण, यापेक्षाही तो लक्ष्मणभाऊंसारखा असू शकेल काय, किंबहुना, तो भाऊंच्या पांगपोसालाही पुरेल काय, हा खरा प्रश्न आहे. भाऊंच्या सामान्य समर्थकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर थोडेसे कठीणच आहे. जर हे उत्तर, भाऊंचा उत्तराधिकारी म्हणून भाजपच्या उमेदवरीवर निवडणूक रिंगणात उतरणारा अगर उतरविला जाणारा व्यक्ती साजेसा नसेल तर, अजून कठीण होणारे आहे.
मग अशा परिस्थितीत नक्की कोणाचा झेंडा हाती घ्यायचा, याचा संभ्रम कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सामान्य समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना पडला, तर नवल वाटू नये. मग हे समर्थक आणि कार्यकर्ते, इतर कोणत्या झेंड्याला हाती घेऊ लागले तर, शहरातील समस्त भाजपाईंनी देखील वावगे वाटून घेऊ नये.
———————————————————–