भीमा कोरेगावचा विजयस्तंभ, ब्राह्मणी व्यवस्थेसाठी पोटशूळ निर्माण करणारा ठरतोय?

एका अतिशूद्र ज्ञातीने ब्राह्मणी व्यवस्थेला गाडण्याच्या केलेल्या मर्दुमकीचे प्रतीक म्हणजे, भीमा कोरेगावचा विजयस्तंभ होय! या विजयस्तंभाची उभारणी ब्रिटीश सरकारने किंबहुना, ईस्ट इंडिया कंपनीने १८२२ मध्ये केली. कॅप्टन फ्रान्सिस स्टॅटन यांच्या नेतृत्वाखाली तीनशे घोडदळ, चोवीस युरोपियन अधिकारी, सहा पावडर तोफांचे दहा लोकांचे तोफदळ आणि पाचशे महार सैनिकांचे पायदळ अशा तुटपुंज्या मनुष्यबळाने ही लढाई जिंकली. महत्त्वाचे म्हणजे पेशव्यांकडे वीस हजारांचे घोडदळ, आठ हजार पायदळ आणि मोठा तोफखाना होता. तरीही या महार सैनिकांचा मोठा भरणा असलेल्या बॉम्बे नेटिव्ह आर्मीच्या १०२ व्या तुकडीने पेशव्यांच्या सैन्याची धूळधाण उडवून त्यांना पुन्हा चाकण पर्यंत पळून जाण्यास भाग पाडले. या विजयामुळे ब्राह्मणी पेशवाई संपुष्टात आली आणि समस्त अतिशूद्रांच्या मागचा ब्राह्मणी जुलूम संपुष्टात आला. १ जानेवारी १८१८ रोजी या महार बहुल सैन्याने भीमा कोरेगाव मुक्कामी अतीव साहस, युद्धचापल्य आणि रणनीती दाखवून, संधी मिळाल्यास आम्ही काय करू शकतो, हे इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला दाखवून दिले. महारांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या या विजयस्तंभला त्यामुळे समस्त पूर्वाश्रमीची महार आणि आताची बौद्ध मंडळी अभिवादन करण्यास लाखोंच्या संख्येने जमतात. 

विजयस्तंभ ब्राह्मणी व्यवस्थेला पोटशूळ कसा?

भीमा कोरेगावच्या या लढाईत पेशवाई नेस्तनाबूत झाली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पेशवाई म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था. ही ब्राह्मणी व्यवस्था बळीराजा पासून अगदी गांधीजी पर्यंत अगदी पहिल्या बाजीराव पेशव्यासह, प्रत्येक बहुजन नेत्याला गिळंकृत करणारी ठरली आहे. यात असुर ठरवून मारलेले या भारतभूचे सुपुत्र, छत्रपती शिवराय, शंभूराजे, क्रांतीज्योती सावित्रीमाई, क्रांतिसूर्य जोतिबा, राजर्षी शाहू अशी अनेक जंत्री देत येईल. त्याचबरोबर या ब्राह्मणी व्यवस्थेने एक मोठा समाज तिरस्कृत ठरवून त्याचा जगण्याचा अधिकार मारण्याचा प्रयत्न केला आहे. मग या तिरस्कृत समाजाने आपली विजिगिशु वृत्ती जोपासून ही व्यवस्था उलथाविण्याचा प्रयत्न केला असेल तर हे तर्कसंगत नव्हे काय?

मात्र, या देशातील ब्राह्मणी व्यवस्थेला केवळ स्वहित आणि स्वाधिकार जपण्यात स्वारस्य आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यासाठी कशाचाही बळी देण्याची या ब्राह्मणी व्यवस्थेची तयारी असते. जे लोक या ब्राह्मणी व्यवस्थेचे अंग बनू इच्छित नाहीत, त्यांना वेगवेगळी नावे देऊन अगर त्यांचे वैचारिक खच्चीकरण करून त्यांना बाद ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग ती बहुजन समाजाची मानके असलेल्या विभूती असतील, विचारवंत असतील, राजकारणी असतील, समाजधुरीण असतील अगर समाजघटक असतील, या सगळ्यांना अडचणी उत्पन्न करण्याचा प्रयत्न ही ब्राह्मणी व्यवस्था करीत आली आहे.

भीमा कोरेगावचा विजयस्तंभ याच प्रकाराने बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या २०१८ पासून सुरू आहे. पूर्वाश्रमीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि आता छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन समाज विघातक भडकावण्या करणारा मनोहर विनायक कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे, त्यांचे साथीदार मिलिंद एकबोटे, कालपरवाचा करणी सेनेचा कोणतरी अजयसिंग सेंगर यांना भीमा कोरेगावचा विजयस्तंभ डोळ्यात खुपतो आहे. अनेक भानगडी करून हा अतिशूद्रांसाठी विजयाचे प्रतीक असलेला विजयस्तंभ बदनाम करण्याचे कारस्थान रचण्यात येते आहे. मग एल्गार परिषदेला शहरी नक्षली ठरविण्याचा प्रयत्न, दलित कलावंतांना माओवादी ठरविणे, मागासवर्गीय अगर समाजवादी विचारवंतांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, हे असले उद्योग करण्याचे प्रयत्न ब्राह्मणी व्यवस्थेकडून केले जात आहेत.

एका समाजघटकाला जगणे नाकारणाऱ्या पेशवाईच्या ब्राह्मणी व्यवस्थेला सुरुंग लावणारा भीमा कोरेगावचा हा विजयस्तंभ त्यामुळेच इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला पोटशूळ निर्माण करणारा ठरतो आहे. कारण हा बहुजनांचा विजय त्यांच्या पचनी पडेनासा झाला आहे. काही हजार वर्षे दाबून धरलेला आणि एकमेकांविरुद्ध शस्त्र म्हणून वापरलेला समस्त बहुजन समाज आता शहाणा होतो आहे काय, ही खरी भीती या ब्राह्मणी व्यवस्थेला आहे. त्यामुळे समस्त बहुजन मूळ प्रश्नांपासून भरकटला जाऊन एकमेकांत कसा भांडत राहील, याची तजवीज ही ब्राह्मणी व्यवस्था करीत आली आहे. आता या षडयंत्राला बाली पडायचे किंवा कसे, हे समस्त बहुजनांनी ठरवायचे आहे. आजपासून नवीन इंग्रजी वर्ष सुरू होत आहे. या नवीन वर्षात समस्त बहुजनांनी स्वतःला कोणत्याही ब्राह्मणी षडयंत्राचा भाग होण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला तरी येणारे नवीन वर्ष आनंदी आणि भरभराटीचे असेल, हे नक्की! 

१ जानेवारी १८१८ रोजी जसा जुलुमी पेशवाईचा अंत झाला, तसाच १ जानेवारी १८४८ म्हणजे पाचशे महारांनी पेशवाई बुडवल्यानंतर अवघ्या तीस वर्षात क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य जोतिबा फुले या समाज उध्दारकांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्रिशूद्रादी जातीअंताच्या लढाईत पडलेली ही पावले. त्यामुळेच १ जानेवारी हा दिवस नवीन पर्व निर्माण करणारा ठरतो! सर्वांना या १ जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा! 

———————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×