मागच्या वर्षाची तारीख बदलून नव्याने सादर केलेले महापालिका अंदाजपत्रक!

प्रशासक शेखर सिंह यांच्यासमोर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागाने आपले येत्या आर्थिक वर्षाचे म्हणजे २०२३-२४ चे अंदाजपत्रक सादर केले. ७१२७.८८ कोटी रुपयांच्या या शिलकी अंदाजपत्रकात ५२९८.३० कोटी महापालिकेच्या विविध लेखशिर्षांवर होणारी जमा आणि राज्य व केंद्र सरकारांकडून मिळणारी चालू वर्षातील शिल्लक ८९३.८७ कोटींसह १८२९.५८ कोटींची अनुदाने व महापालिका हिस्सा अशी जमा बाजू या अंदाजपत्रकात दाखविण्यात आली आहे. शहरातील विकासकामांवर १८०१.५१, स्थापत्य विभागाच्या विशेष योजना ८४६, शहरी गरिबांसाठी १५८४ कोटी रुपायांच्या खर्चासह महापालिकेच्या खर्चाची बाजू दाखविण्यात आली आहे. कोणतीही दरवाढ अगर करवाढ नसलेले हे अंदाजपत्रक गेल्या चार वर्षांतील कामांचीच री ओढणारे असून कोणताही नवीन प्रकल्प अगर नवीन सुविधा या अंदाजपत्रकातून मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात हे अंदाजपत्रक म्हणजे मागच्या वेळचेच पुस्तक तारीख बदलून छापले असावे अशीच भावना निर्माण होते आहे. 

गेल्या पाच वर्षांतील पिंपरी चिंचवड महापालिकेचा भाजपाई सत्ताकाळ आणि वर्षभरातील प्रशासकीय सत्ताकाळ ही अनागोंदी आणि आराजकाचा होता याचा आरसा या अंदाजपत्रकात नागरिकांना दाखविण्यात आला आहे. भाजपने सुरू केलेले अनेक प्रकल्प या अंदाजपत्रकातही समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वर्षे रेंगाळले प्रकल्प या अंदाजपत्रकात देखील समाविष्ट आहेत आणि हीच प्रशासनाचा नाकर्तेपणा दाखविणारी बाब असल्याच्या शहरवासीयांच्या भावना झाल्यास वावगे ठरू नये. गत आर्थिक वर्ष प्रशासकाचा सत्ताकाळ देखील नाकर्तेपणाचा ठरला हे अधोरेखित करणारा हा अर्थसंकल्प आहे, हे प्रशासनानेच स्वयंस्पष्ट केले आहे. प्रशासक म्हणून सर्व अधिकार महापालिका आयुक्तांच्या हाती एकवटले असतानाही प्रशासनाचा कारभार ढिसाळच असल्याचे दिसून आले आहे. महापालिका आयुक्तांची अनुपलब्धता हे यामागचे प्रमुख कारण आहे. रेंगाळणाऱ्या नस्त्या, आळसावलेले अधिकारी आणि सुस्तावलेल महापालिका अशी पिंपरी चिंचवड महापालिकेची सध्याची अवस्था आहे.

एकात एक नाही आणि बापात लेक नाही.

गेल्या वर्षभरात मागचेच प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अनेक ठेक्याचा कालावधी संपून गेला आहे. आता मुदतवाढ आणि त्याबरोबर आपोआप येणाऱ्या दरवाढीचा मलिदा चाखण्यात ठेकेदार आणि सत्ताधारी राजकारण्यांचे बगलबच्चे मश्गुल आहेत. कोणतेही काम वेळेत पूर्ण करण्याऐवजी मुदत संपल्यावर मिळणाऱ्या मलिद्याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कोण काय करतंय आणि का करतंय याचा ताळमेळ बसायला तयार नाही. महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला करण्यासाठीच जणू प्रत्येक घटक उत्सुक असल्याचे निदर्शनास येते. हे अंदाजपत्रक तयार करतानाही कोणत्याही नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश दिसला नाही. त्याचबरोबर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना अंदाजपत्रकात नाही. मागचेच सगळे पुढे चालू अशा आशयाचे हे अंदाजपत्रक गेल्या वर्षीच्याच पुस्तकाला यावर्षीचे मुखपृष्ठ लावले असल्यासारखेच दिसते आहे नव्या मुखपृष्ठाखाली असलेले जुनेच धडे वाचून आणि त्यांचा अभ्यास करून या वर्षी तरी प्रशासकाचे प्रशासन निदान काठावर उत्तीर्ण झाले तरी पुरे. 

———————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×